आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटात अतिवृष्टीमुळे सिपना नदीला पूर, ४५ गावांचा संपर्क तुटला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - तीन दिवसांपासून सुरू असलेला सततधार पाऊस त्यातच जिल्ह्यातील मेळघाटात मागील २४ तासात झालेल्या (चिखलदरा १४८.९ मि.मी., धारणी ८५.५ मि.मी.)अतिवृष्टीमुळे सिपना नदीला पूर आला असून परिसरातील दिया व उतावलीचे पुल वाहून गेल्याने येथील ४५ गावांचा संपर्क तुटला आहे. हरिसाल येथील १०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून पुरामुळे १० घरांचे नुकसान झाले आहे. चांदूर बाजार येथे भिंत कोसळून एकाच कुटुंबातील तीन महिला जखमी झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिपना नदीला पूर आल्याने दिया व उतावली गावात पाणी शिरले. यात १० घरांचे नुकसान झाले. गुडघाभर पाण्यातून वाट काढणे गावऱ्यांना कठिण झाले हाेते. जिल्हा प्रशासनाने तातडीने बचाव पथक रवाना करून सुमारे १०० लोकांना सुरक्षित स्थळी असलेल्या शाळेत हलविले. तेथे त्यांच्या राहण्यासोबतच जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने १४ तालुक्यांमध्ये कुठे मध्यम तर कुठे मुसळधार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला असला तरी अद्याप धरणांमधील पाणीसाठ्यात हवी तशी वाढ झाली नाही. दरम्यान मुसळधार पावसामुळे चांदूर बाजार येथे भिंत कोसळून एकाच धुर्वे कुटुंबातील तीन महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ. नितीन व्यवहारे तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनात शोध व बचाव पथक पुरग्रस्त भागात बचाव कार्यात व्यस्त असून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सतर्क राहण्याचे आवाहन जनतेला केले आहे. 

 

अकाेला जिल्ह्यात नदीच्या पुरात युवक वाहून गेला 
अकोला जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने साेमवारी जाेर धरला. तेल्हारा तालुक्यातील विद्रुपा नदीच्या पुरात युवक वाहून गेल्याची घटना साेमवारी घडली. नितीन सुनील दामोदर असे त्या युवकाचे नाव आहे. ताे बकरीचा चारा आणण्यासाठी विद्रुपा नदीजवळ गेला. मात्र पाय घसरून ताे नदीत वाहून गेला. दरम्यान देवरी फाटा ते शेगाव रस्त्यावरील पूल पावसामुळे खचला असून, यामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...