आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्च दाबामुळे दुकानांमधील वीज उपकरणे जळून खाक; सीसीटीव्ही, मीटरही पडले बंद...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- विजेच्या उच्च दाबामुळे बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकालगत असलेल्या मीनाताई ठाकरे मार्केटमध्ये असलेल्या दुकानामधील विजेचे उपकरण जळाले आहे. ही घटना रविवार, २० जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये वीसहून अधिक दुकानांत कार्यान्वित असलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य, मोबाइल शॉपमधील इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाइलचे चार्जर, सीसीटीव्ही अडॅप्टर, टीव्ही अडॅप्टर आदी साहित्यासह विजेचे मीटर, बोर्ड व वायरिंग जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. याच मार्केटमध्ये साधारण पन्नासहून अधिक विविध दुकाने आहेत. विजेच्या उच्च दाबामुळे विजेची उपकरणे जळाली असली तरी सुदैवाने मोठी घटना टळली. 


महाराणा प्रताप चौकातील मीनाताई ठाकरे मार्केटमधील काही दुकानांना पोस्ट ऑफिसजवळ असलेल्या विजेच्या रोहित्रामधून वीजपुरवठा केला जातो. रविवारी सकाळी मार्केटमधील दुकान मालक नियमितप्रमाणे दुकान उघडून कामाला लागले. दरम्यान, ११.३० वाजेच्या सुमारास रोहित्राचे न्यूट्रल कट झाल्याने विजेचा दाब वाढला. विजेच्या उच्च दाबामुळे अनेक दुकानांतील विजेची उपकरणे बंद पडली. तसेच मोबाइलच्या व इतर इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकलच्या दुकानांत असलेल्या विजेच्या बोर्डामध्ये एकाच वेळी अचानक मोठा आवाज झाला. त्यामुळे दुकान मालक व इतर लोक घाबरून दुकानातून बाहेर पळाले. काही वेळ कुणालाच काहीच कळत नव्हते.

 

त्यामुळे सर्व जण गोंधळून गेले. काही वेळाने मार्केटला वीजपुरवठा करणाऱ्या महाराणा प्रताप चौकाजवळील रोहित्रातून वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर दुकानातील लाइट बंद झाली. 
या रोहित्रावर जोडलेले वीज कनेक्शन बंद पडल्याने दुकान मालकांनी सर्व काही आलबेल आहे की नाही, याची निरखून पाहणी केली. मात्र अनेकांच्या दुकानातील मोबाइल चार्जर, टीव्हीचे अडॅप्टर जळाले. तर जय मोबाइल शॉपमधील सीसीटीव्हीचे अडॅप्टर जळाल्याचे दिसले. तसेच विजेच्या उच्च दाबामुळे मृणाल मोबाइल शॉपमधील विजेचे मीटर बंद पडले. दुकानाला वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य बोर्डाची वायरिंग जळाली. दरम्यान, वीज बंद होताच भारत जाधव यांनी तत्काळ महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या पाहणीवरून पोस्ट ऑफिसजवळच्या असलेल्या रोहित्रावरून विजेचे कनेक्शन घेतलेल्या अनेक दुकानांतील कार्यान्वित असलेली उपकरणे जळाल्याचे आढळून आले आहे. या पाहणीत रोहित्राचे न्यूट्रल कटल्याने विजेचा दाब वाढल्यामुळे ही घटना घडल्याचे समोर आले. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे अनेक दुकानांतील साहित्य जळाले. या घटनेमुळे दुकानातीळ साहित्याला आग लागली असती तर मार्केटमधील दुकाने आगीत जळून खाक झाली असती. त्यामुळे महावितरणने याची खबरदारी घ्यायला हवी, अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे व्यावसायिकांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. तसेच या घटनेत दुकानातील साहित्य जळाले असून महावितरणने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी व्यावसायिकांनी या वेळी केली. 


२० पेक्षा अधिक मोबाइल शॉपी व इलेक्ट्रॉनिक दुकानांतील साहित्याचे नुकसान 
मीनाताई ठाकरे मार्केटमधील अनेक दुकानांमधील विजेचे साहित्य जळून वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती महावितरणला सकाळी मिळाली. त्याच क्षणी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व दुकानाची पाहणी केली. तसेच रोहित्राचे न्यूट्रल जोडून वीजपुरवठा सुरळीत केला. त्यानंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पुन्हा पाहणी केली व झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. 


महावितरणकडून घटनास्थळाची दोनदा पाहणी 
मीनाताई ठाकरे मार्केटमधील अनेक दुकानांमधील विजेचे साहित्य जळून वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती महावितरणला सकाळी मिळाली. त्याच क्षणी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व दुकानाची पाहणी केली. तसेच रोहित्राचे न्यूट्रल जोडून वीजपुरवठा सुरळीत केला. त्यानंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पुन्हा पाहणी केली व झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. 


नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू 
दुकानांना वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्राचे न्यूट्रल (अर्थिंग) कट झाल्याने विजेचा दाब वाढला. त्यामुळे ही घटना घडली आहे. या घटनेत ज्या दुकानातील मीटर बंद झाले आहे, ते बदलून दिले जाईल. तसेच इतर दुकानांतील नुकसानीचा पंचनामा करण्यात येईल व त्यानंतर नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. - जी. आर. राठोड, सहायक अभियंता महावितरण, बजाजनगर. 

बातम्या आणखी आहेत...