आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधमाशांमुळे दुष्काळातही शेतीच्या उत्पादनात १५० टक्क्यांपर्यंतची वाढ; विद्यापीठाच्या प्रयोगामुळे ३०० शेतकऱ्यांसाठी शेती झाली सुलभ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्याला दुष्काळाच्या झळा बसत असताना ३०० शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या उत्पादनात १५० टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे. शेतात मधमाशा पाळल्याने परागीकणाच्या प्रक्रियेला वेग आला आणि त्यामुळे शेतीमालाचा दर्जा आणि पोषक मूल्येही वाढली. शेतकऱ्यांना सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आणि हे सर्व सेंद्रिय शेतीतून शक्य झाले. मधमाशा संपल्या तर जगाचा ४ वर्षांत विनाश होईल, असे विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन म्हणाले होते. मधमाशांचे हे महत्त्व ओळखूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागातील प्रा. डॉ. भालचंद्र वायकर २२ वर्षांपासून मधमाशांवर संशोधन करत आहेत. मधमाशांचा वापर फक्त मध मिळवण्यासाठी नसून त्या निसर्गाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. दुष्काळ, रासायनिक खतांचा अत्याधिक वापर, अधिवासावर हल्ला, मोबाइल लहरी आणि पारंपरिक पद्धतीने मध काढल्यामुळे १२-१५ वर्षांत भारतीय सातेळी मधमाशांची संख्या ६० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. शेतीमालाचे उत्पादन घटण्यात मधमाशा नसणे हेसुद्धा मोठे कारण आहे. या प्रश्नाच्या अभ्यासासाठी डॉ. वायकर यांच्या “सस्टेनेबल रूरल डेव्हलपमेंट थ्रू बी कीपिंग’ या प्रकल्पाला केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीची मंजुरी मिळाली. प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.


सव्वादोन कोटीचे अतिरिक्त उत्पन्न : दोन वर्षांत अतिरिक्त उत्पादनामुळे उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. निरीक्षण केलेल्या १३६ शेतकऱ्यांचा एकत्रित विचार केला तर त्यांना पूर्वीपेक्षा २ कोटी २३ लाख ४७ हजार ७२० रुपयांचा अतिरिक्त नफा झाला आहे. हा नफा काढताना बांधावरचे दर मोजण्यात आले. बाजारातील दर लावले तर या रकमेत किमान ३० ते ३५ टक्के वाढ होऊ शकते, असे प्रा. वायकर यांनी सांगितले.


मधमाशांमुळे परागीकरण गतिमान : डाळिंबाच्या फळाला  फुले येतात. पण ती गळून पडतात. कांद्याला फुली पडते. पण फळधारणा होत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे परागीभवनाची (पॉलिनेशन)  खंडित झालेली प्रक्रिया. ती गतिमान करण्यात मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावतात. ताशी ५० किलोमीटर वेगाने प्रवास करणारी मधमाशी मिनिटात २० ते २५, तर तासाभरात १२०० ते १५०० फुले, रोपट्यावर बसते. मध गोळा करते. सूर्याेदयाच्या तासभर आधीपासून सूर्यास्तानंतरही बराच वेळ तिचे काम सुरू असते. यामुळे परागीभवनाची प्रक्रिया झपाट्याने होते. या प्रक्रियेमुळे शुद्ध आणि उत्पादक बियाण्यांची निर्मिती होते. त्यामुळे उत्पादन वाढते. शेती आणि मधाशिवाय पोळ्यातून पराग, राजअन्न, विष आणि रोगन या पदार्थांची निर्मिती होते. त्यांचा औषधी निर्मितीसाठी उपयोग होतो.


मधासाठी मेहनत फार : ४५० ग्रॅम मधासाठी ११५२ मधमाशांना १८०२४६ किलोमीटर प्रवास करावा लागतो. या मधमाशा ४५ दशलक्ष फुलांवरील मध गोळा करतात. म्हणजेेच एक मधमाशी १५६ किलोमीटरचा प्रवास करते.
 

 

शेतीमालात ५० टक्क्यांनी वाढ : प्रकल्पासाठी २०१६ ते २०१८ या दोन वर्षांत औरंगाबाद जिल्ह्यातील ८ तालुक्यातल्या ३०० शेतकऱ्यांची निवड केली. त्यांना आधी विद्यापीठात, नंतर शेतात प्रशिक्षण दिले. प्रत्येकी ५.५ हजार रुपयांची मधुमक्षिका पेटी देण्यात आली. ती कोठे बसवावी, तिची स्वच्छता, मधमाशांची कार्यपद्धती याबाबतची माहिती समजावून सांगितली. महिन्यातून एकदा भेट देऊन शेतीची पाहणी केली. ३०० पैकी १३६ शेतकऱ्यांच्या शेतात मधुमक्षिका पेटी बसवण्यापूर्वी आणि नंतरच्या उत्पादनाची नोंद घेतली. यातून शेतमालात सरासरी ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. काही पिकांचे उत्पादन १५० टक्क्यांपर्यंत वाढले.  

 

दुष्काळाच्या स्थितीवर मात करण्याचा उत्तम पर्याय
मधमाशा शेतकऱ्यांच्या मित्र आहेत. कितीही खत, पाणी आणि औषधे फवारली तरी शेती मधमाशांशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही. मधमाशांमुळे परागीकरणाची प्रकिया गतिमान होऊन उत्पादन तर वाढतेच, पण आंतरराष्ट्रीय निकषात बसणारा दर्जेदार आणि पोषक मूल्ये असणारा माल तयार होतो. वाढती लोकसंख्या आणि दुष्काळाच्या स्थितीवर मात करण्यासाठी मधमाशाच्या साहाय्याने शेतीला पर्याय नाही. 
-प्रा. डॉ.भालचंद्र वायकर, प्राणिशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...