आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उतावीळपणा नडला, उजनीचे पाणी हिप्परग्यात आणण्याचा प्रयत्न फसला 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी । सोलापूर : काहीही करून उजनी धरणातून हिप्परगा तलावात पाणी आलेच पाहिजे असे अविचारी नियोजन झाल्याने हिप्परगा तलावात पाणी येईल, थेट पंप हाऊसवरून जॅकवेलद्वारे भवानी पेठ जलशुध्दीकरण केंद्रात पाणी येईल, या आशेवर पाणी फेरले गेले. कारण उपसा सिंचन योजनेतून क्षमतेने पाणी येणे शक्य नाही. अडथळे खूप आहेत. शेवटी या अडथळ्यांनी महापालिका पाणी आणण्याच्या प्रयत्नात अगदी तोकडी पडली.  उजनी धरणातून एकरुख उपसा सिंचन योजनेतून कारंबा पंप हाऊस आणि हिप्परगा तलाव जॅकवेलजवळ पाणी उपसा करून रुपाभवानी येथे आणण्यासाठी महापालिकेने जोरात घोषणा केली. त्यासाठी जॅकवेलजवळ दोन दिवस उपसा करण्यात आला. भवानी पेठ जलशुध्दीकरण केंद्रात पाणी आले. हौदही भरला. केंद्र सुरू होण्यापूर्वी पाणी उपसा बंद झाला. महापालिकेचा उतावीळपणा नडला.    पाणी उपशासाठी ५५ लाख  एकरुख उपसा सिंचन योजनेतून शहरास पाणी उपसा करण्यासाठी महापालिका सभागृहात ५५ लाखांच्या कामास मंजुरी देण्यात आली होती. महापालिकेने कारंबा पंप हाऊस व हिप्परगा तलावजवळील जॅकवेलजवळ पंपिंग करण्यासाठी विद्युत माेटार बसविली. जॅकवेलजवळ दोन दिवस पाणी उपसा केला, पण त्यास वारंवार व्यत्यय आला. कारंबा पंप हाऊस येथे वीज पुरवठा आणि तेथे असलेली पाणी पातळी पाहता पाणी उपसा झालाच नाही. महत्प्रयासाने रुपाभवानी पेठ पंप हाऊस येथे तीन एमएलडी पाणी आले. ते पाणी हौेदात राहिले, शुध्दीकरण झाले नाही.  दोन दिवस प्रयत्न करूनही पुरेसे पाणी आलेच नाही    दोन ठिकाणी बसवले पंप  कारंबा पंप हाऊस येथे दहा एचपीचे दहा पंप बसवण्यात आले. तलावाच्या जॅकवेलजवळ ३० एचपीचे एक आणि दहा एचपीचे दोन पंप लावले होते. ते पंप दोन दिवस चालले. तेथे ग्रामीण वीज पुरवठा असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता. पाणी कमी असल्याने पंप बंद पडत होते. चार दिवसांनंतर पुरेसे पाणी आले नाही. प्रयत्न करूनही उपयोग झाला नाही    महापालिका आयुक्तांची चर्चा  महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी सिंचन विभागाचे धीरज साळे यांच्याशी चर्चा केली. उजनी धरणातून पाणी सोडण्याबाबत मागणी केली. आठ दिवसात पाणी सोडण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. उजनीचे पाणी हिप्परग्यात आणण्यासाठी आयुक्तांकडे राजकीय रेटा लागला होता, अशी चर्चाही रंगली आहे.   

बातम्या आणखी आहेत...