आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावात जाण्यास रस्ताच नसल्याने महिलेची ट्रॅक्टरमध्येच झाली प्रसूती; खड्ड्यांमुळे लागणाऱ्या झटक्यांमुळे बाळंतपण सोपे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- गावात जाण्यास रस्ताच नसल्यामुळे डाॅक्टर व परिचारिकांनी समयसूचकता दाखवत एका महिलेची प्रसूती ट्रॅक्टरवर केल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हितापाडी येथे ही घटना रविवारी घडली. गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने या महिलेला ट्रॅक्टरने कसेबसे रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वाटेतच तिची प्रसूती झाली.


भामरागड तालुका मुख्यालयापासून १३ किलोमीटर अंतरावर हितापाडी हे गाव आहे. आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत या गावाचा समावेश होतो. या गावातील शांती राकेश पुंगाटी या महिलेला रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास प्रसूती कळा सुरू झाल्या. ही माहिती आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली. तिला आणण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका पाठवली. परंतु, हिदूर गावापासून हितापाडी गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसून केवळ एक पायवाट आहे. शिवाय नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पायवाटेवर चिखल साचला आहे. खड्ड्यांमुळे वाट बिकट झाल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत नेणे शक्य होत नव्हते. परंतु, प्रसवकळा वाढल्याने शांतीला तत्काळ रुग्णालयात भरती करणे आवश्यक होते. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवत ट्रॅक्टर बोलावला. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर शांतीला झोपविण्यात आले. या वेळी डॉक्टर व परिचारिकाही सोबत होत्या. 


जंगल, खड्डे व चिखलातून मार्ग काढत ट्रॅक्टर आरेवाडा गावाच्या दिशेने जात होता. मात्र, खड्ड्यांमुळे लागणाऱ्या झटक्यांनी शांतीने वाटतेच गोंडस बाळाला जन्म दिला. डॉक्टर व परिचारिका असल्याने प्रसूती सुरळीत पार पडली. महिला व बाळाची प्रकृती व्यवस्थित आहे.  


तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. सुचिता दांडगे, परिचारिका भारती, सपना, कुमरे, वाहनचालक पिंटूराज मंडलवार, एमपीडब्लू चिलबुले यांनी ही प्रक्रिया पार पाडली. या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. २९ जुलैला कुरखेडा तालुक्यातील कोटलडोह येथील सिकलसेलग्रस्त एक गर्भवती महिला प्रसूतीस विलंब होत असल्याने रुग्णालयातून गावाला परत गेली होती. त्यावेळी तहसीलदारांसह डॉक्टर व अख्खे प्रशासनच तिच्या प्रसूतीसाठी गुडघाभर पाण्यातून गावात गेले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...