आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Due To Offence It Is An Opportunity For National Congress Party To Prove There Innocence

गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादीला निर्दोषत्व सिद्ध करण्याची संधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'शिखर बँक घोटाळा प्रकरणात हायकोर्टाच्या आदेशाने गुन्हे दाखल झाले आहेत. यानिमित्ताने राष्ट्रवादीला तसेच घोटाळ्यातील सर्व आरोपींना आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची संधी आहे. भाजपने हे घडवून आणले आहे, या आरोपात कोणतेही तथ्य नाही,' असे स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिले. भाजप राजकीय हेतूने ही कारवाई करत असल्याच्या अाराेपावर ते बाेलत हाेेत.

भंडारी म्हणाले, 'ज्यांच्यावर संशय आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मनी लाँडरिंगच्या नवीन कायद्यानुसार शंभर कोटींपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा असेल तर ईडी आपोआप गुन्हा दाखल करते. कोर्टाची ऑर्डर स्पेसिफिक आहे. त्यानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि ईडीनेही गुन्हा दाखल केला. त्यासाठी वेगळ्या एफआयआरची गरज नसते. भाजपने हे घडवून आणले आहे, असा आरोप विरोधक करतात, पण आम्ही निवडून येणारच हे आमच्यासह विरोधकांनाही माहिती आहे. त्यामुळे आम्हाला असे करण्याची काहीच गरज नाही आणि असे करणे हे पण चुकीचेच आहे. शिवाय ईडी ही केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेली स्वतंत्र संस्था आहे. तिचा राज्याशी तसा संबंध येत नाही. न्यायालयीन प्रक्रियेवर कोणाचाच ताबा नसतो, आमचाही नाही आणि तो असूही नये. उलट हा गुन्हा दाखल झाल्यामुळे ते जर निर्दोष असतील तर त्यांना ते सिद्ध करण्याची संधी आहे. ते सिद्ध करून त्यांनी महाराष्ट्राला तसे दाखवून द्यावे,' असे अाव्हान भंडारींनी दिले.

निवडणुकीच्या तोंडावरच हे प्रकरण आल्यामुळे संशय व्यक्त होतोय, पण आपल्या देशात निवडणुका कायमच असतात. नुकतीच लोकसभा झाली, आता विधानसभा, नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. त्यामुळे या निवडणुकीच्या तोंडावर हे उघड झाले, असे म्हणता येणार नाही. आत्ताच का हा प्रश्न विचारला जातो, पण सगळ्या घोटाळ्याची चौकशी करून गुन्हा दाखल होण्यापर्यंत प्रवासात मोठा वेळ गेला, या प्रक्रियेला जो वेळ लागला तो कशामुळे लागला त्या यंत्रणांवर कोणाचा दबाव होता का, असे प्रश्न यानिमित्ताने पुढे येतात, असे भंडारी म्हणाले.

भाजप- शिवसेना युतीबाबत...
'खरे तर अामची युती आधीपासूनच आहे. वेगळी घोषणा करण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपमध्ये झालेल्या इनकमिंगच्या पार्श्वभूमीवर निष्ठावानांचे काय होणार याबद्दल चर्चा आहे. पण मागच्या विधानसभेतून सुमारे १४ आमदारांनी राजीनामे दिले. त्यातील काही खासदार झाले. नऊ- दहा आमच्याकडे आले, पण ते असेच लोक आहेत जिथे आमची ताकद कमी होती आणि आलेले सगळे लोक कोणत्याही कमिटमेंटशिवाय आलेले आहेत. त्यामुळे कोणावर अन्यायाचा आणि कोणाचे पुनर्वसन करण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही', असे भंडारी म्हणाले.

अाता अामची जाणीव हाेऊ लागलीय
'एकीकडे युतीची चर्चा सुरू असताना सर्वच मतदारसंघांमध्ये आम्ही मेळावे आणि मुलाखती घेतल्या, पण यात नवीन काहीच नव्हते. १९८० पासून आम्ही प्रत्येक मतदारसंघात मेळावे आणि मुलाखती कायमच घेत आलो आहोत. तेव्हा आमचे अस्तित्व कमी होते, त्यामुळे आमचे मेळावे, मुलाखती हे इतरांना दिसत नव्हते, आता सगळे लक्ष आमच्याकडेच असल्यामुळे ते दिसू लागले आहेत,' याकडे भंडारींनी लक्ष वेधले.

राणे आमचेच खासदार
नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. त्यांचा अाणि मुलांचा भाजपत प्रवेश कधी हाेणार? या प्रश्नावर भंडारी म्हणाले, 'ते तर आमचे खासदार आहेत, मग वेगळा पक्ष प्रवेशाचा प्रश्नच येत नाही. अन‌् मुलांबाबत काय निर्णय घ्यायचा हा राणेंचा प्रश्न अाहे.'
 

बातम्या आणखी आहेत...