आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Due To Refusing Permission To Start Speculative Generations; One Burned Station, Took The Accused Into Custody

सट्टा सुरू करण्यास परवानगी नाकारली; एकाने जाळली चौकी, आरोपीस घेतले ताब्यात

9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

जामनेर : व्यावसायिकांच्या तीन सट्टा पेढ्या सुरू असताना एका तरुणाला सट्टापेढी सुरू करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने शनिवारी (दि.२१) दुपारी १ वाजेच्या सुमारास शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील पोलिस चौकी पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली. हा प्रकार खरा असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना मान्य केले. पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून समाधान बळीराम पाटील (वय २६) असे त्याचे नाव आहे.

शेंदुर्णी येथील समाधान पाटील हा बेरोजगार आहे. गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून सट्ट्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तो शेंदुर्णी पोलिसांना परवानगी मागत होता. मात्र, गावात तीन सट्टा पेढ्या सुरू असूनही शेंदुर्णी औटपोस्टचे सहायक फौजदार उदय कुलकर्णी व इतर 'कलेक्टर' असणाऱ्यांनी समाधानला परवानगी नाकारली. त्यामुळे समाधान पाटील याने पहूर येथील सहायक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी व अतिरिक्त पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. मात्र, त्यांनी देखील शेंदुर्णीतील सट्टा बंद आहे. कुठेही सुरू असल्यास आम्ही रेड टाकून कारवाई करू, अशी स्पष्ट भूमिका घेतली. या अनुषंगाने १५ दिवसांपूर्वी कारवाई देखील झाली. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी शेंदुर्णीत पुन्हा सट्टा सुरू झाला. असे असूनही आपल्याला परवानगी मिळाली नाही म्हणून संतप्त झालेल्या समाधानने शनिवारी एका कॅनमध्ये पेट्रोल नेऊन शेंदुर्णी सहकारी जिनप्रेस शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या वरील मजल्यावर असलेली पोलिस चौकी गाठली. तेथे कुणीही नसल्याचे पाहून त्याने चौकीतील सर्व फाइल्स, टेबल-खुर्ची व अन्य साहित्य पेट्रोल टाकून पेटवून दिले. हा प्रकार लक्षात येताच काही नागरिकांनी धावपळ करून पाण्याचे टँकर मागवत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत संपूर्ण चौकीची राखरांगोळी झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी समाधानला ताब्यात घेऊन पहूर पोलिस ठाण्यात हलवले.

अवैध व्यवसायाची पार्श्वभूमी

समाधान याची पार्श्वभूमी अवैध व्यवसायाची आहे. दीड महिन्यापासून शेंदुर्णीत सट्टा सुरू करण्यासाठी तो परवानगी मागत होता. मात्र, त्याला परवानगी नाकारली. त्यामुळे त्याने संतप्त हाेऊन हा पवित्रा घेतला. पंचनामा करून त्यास ताब्यात घेतले. नियमानुसार कारवाई होईल. - राकेशसिंग परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक, पहूर