आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - निवडणुकीच्या काळात चौकीदार शब्द चर्चेत आहे. राजकारणात सरकारने ‘मीही चौकीदार’ मोहीम सुरू केली आहे, तर दुसरीकडे विरोधक राहुल गांधी प्रत्येक सभेत ‘चौकीदार चोर आहे,’ ही घोषणा देत आहेत. पण त्यामुळे व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांची चांदी झाली आहे. देशभरात ‘चौकीदार’ घोषणेचे हजारो टी-शर्ट आणि टोप्या रोज विकत आहेत. द क्लोथिंग मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएमएआय) ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, या निवडणूक काळात दीड महिन्यात सुमारे १००० कोटी रुपये किमतीच्या चौकीदार टी-शर्टची विक्री होईल. तामिळनाडूच्या तिरुपूरमध्ये अशा प्रकारचे टी-शर्ट मोठ्या प्रमाणावर ऑर्डर झाले आहेत. म्हणजे प्रति शर्टची सरासरी २५० रुपये किंमत मानली तर सुमारे ४ कोटी टी-शर्ट विकतील. ते म्हणाले की, दरवर्षी उन्हाळ्यात टी-शर्टची मागणी वाढते.
२०१४ मध्ये चायवाला मोहीम सर्वात आधी सुरू करणारे भाजपचे दिल्ली प्रदेश प्रवक्ता तजिंदरपालसिंह बग्गा यांनीही ‘देशाचा चौकीदार’ ही मोहीम सुरू करून टी-शर्ट वाटण्यास सुरुवात केली आहे. बग्गा म्हणाले की, जेव्हा राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर आरोप केला तेव्हा मी माझ्यातर्फे टी-शर्ट तयार केले, त्यावर मोदींच्या छायाचित्रासह ‘देशाचा चौकीदार’ ही घोषणा लिहिली. हे टी-शर्ट घालून मी रात्री ११ ते ३ वाजेपर्यंत सोसायटी, मॉल, रुग्णालय यांसारख्या ठिकाणी जाऊन सुरक्षा रक्षकांशी चर्चा करत होतो आणि त्यांना सांगत होतो की, तुम्ही सोसायटीचे संरक्षण करता आणि मोदी देशाचे चौकीदार आहेत. नंतर बग्गा यांनी एक वेबसाइट (टीशर्टभय्या डॉट कॉम) तयार करून हे टी-शर्ट ऑनलाइन विकण्यास सुरुवातही केली. बग्गांना मोदींच्या १६ मार्चच्या ‘मीही चौकीदार’ मोहिमेच्या आधी दररोज १००-१५० टी-शर्टची ऑर्डर मिळत होती, ती वाढून २५०० पर्यंत झाली आहे. बग्गांना एकट्याला सुमारे १० लाख रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. बग्गा म्हणाले की, हा माझा व्यवसाय नाही, पण ऑनलाइन विक्रीतून जी रक्कम मला नफ्याच्या रूपात मिळते, त्यातून मी खऱ्या चौकीदारांना मोफत टी-शर्ट देतो.
मुंबईचे उत्पादक सुरजित दुग्गल म्हणाले की, माझ्या अंदाजानुसार, संपूर्ण देशात सुमारे १० कोटींपेक्षा जास्त ‘मीही चौकीदार’चे टी-शर्ट तयार होतील. मी जे टी-शर्ट तयार केले त्यांची गुणवत्ता खूपच चांगली आहे. एका टी-शर्टची किंमत प्रिंटिंगसह सुमारे १४० रुपये आहे. मी आतापर्यंत ५ हजार टी-शर्ट विकले आहेत आणि एप्रिलअखेरपर्यंत ५० हजार टी-शर्टची ऑर्डर पूर्ण करायची आहे.
नमो मर्केंडाइजद्वारेही ६ महिन्यांत १९ कोटींची कमाई
भाजप अध्यक्ष अमित शहांनी ४ मार्चला नमो मर्केंडाइजच्या नमो रथाला पक्ष मुख्यालयातून हिरवी झेंडी दाखवून रवाना केले होते. त्याचे २०० रथ देशभर फिरत आहेत. त्यावर नमो अगेन, कीप कॉम ट्रस्ट नमो स्लोगनसह मास्क, बॅजेस, की रिंग, टी-शर्ट, हुड्डीजची विक्री होत आहे. मीही चौकीदार मोहिमेनंतर टी-शर्ट आणि टोप्या दोन्ही नमो मर्केंडाइजवर उपलब्ध आहेत. निवडणूक मोहिमेव्यतिरिक्त हा एक व्यवसायही झाला आहे, तो ६ महिन्यांत १९ कोटींपर्यंत गेला आहे. मीही चौकीदार मोहिमेच्या एक दिवस आधीच नमो मर्केंडाइजला टी-शर्ट आणि टोप्यांची ४-५ लाख रुपयांची ऑर्डर मिळाली. नमो ब्रँडद्वारे सुरू असलेला व्यवसाय पूर्णपणे प्रमोशनल आहे. त्याची सुरुवात सप्टेंबर २०१८ ला झाली होती. भाजपच्या युवा मोर्चा कार्यकारिणीचे सदस्य आणि नमो मर्केंडाइजचे समन्वयक मनोज गोयल यांनी ते सुरू केले होते. आधी त्याची थीम-नमो अगेन अशी होती.
ट्विटरवर इंप्रेशन, कॉलर ट्यूनही आली
राहुल गांधींच्या ‘चौकीदार चोर आहे’ या घोषणेला भाजपकडे आधी प्रत्युत्तर नव्हते. पीएम मोदीही या मोहिमेमुळे नाराज होते. राहुल यांच्या आरोपांवर मोदींच्या व्यावसायिक चमूने सर्व्हे केला आणि त्याचा परिणाम काय हे जाणून घेतले. त्यात फीडबॅक असा मिळाला की चौकीदार समूहात त्यामुळे नाराजी आहे आणि लोक संतप्त आहेत. त्यानंतर मोदींचे ओएसडी डॉ. हिरेन जोशींनी सूत्रे हाती घेतली. दोन दिवस-रात्र पीएमओमध्ये काम चालले आणि १६ मार्चला ‘मीही चौकीदार’ मोहीम लाँच होईपर्यंत कोणालाही पत्ता नव्हता. मोदींची ही मोहीम सोशल मीडियावर पहिल्या दिवशी जगभरात पहिल्या क्रमांकावर ट्रेंड झाली, भारतात सलग दोन दिवस क्रमांक एकवर राहिली. या टॅगलाइनसह २० लाख लोकांनी हॅशटॅग ट्विट केले. १६८० कोटी ट्विटर इम्प्रेशन मिळाले, तर १ कोटींवर लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि फॉरवर्ड केला. १ कोटी लोकांनी नमो अॅप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘मीही चौकीदार’ ही शपथ घेतली. भाजप अध्यक्ष शहांसह सर्व केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, भाजप नेते, पदाधिकाऱ्यांनी ट्विटर हँडलच्या नावाआधी चौकीदार शब्द जोडला. तीन दिवसांनंतरच भाजपने ‘मीही चौकीदार’ ही कॉलर ट्यून बाजारात आणली. ती आज भाजप नेते-कार्यकर्त्यांच्या मोबाइलची कॉलर ट्यून आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.