आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Due To The Code Of Conduct, There Was A Rush Of People In The Ministry Decreases

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आचारसंहितेमुळे मंत्रालयात सर्वसामान्यांची गर्दी ओसरली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आचारसंहितेनंतर मंत्रालयात होणारा शुकशुकाट नवा नाही. सरकारने आचारसंहितेआधीच घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी फायलींचा प्रवासाला वेग आला असल्याचे दिसते. नवीन विषयांच्या फायली उपसचिवापर्यंतचा प्रवास करून नवीन मंत्र्यांच्या सहीसाठी वाट बघत आहेत. ऐरवी उसंत नसणाऱ्या अधिकाऱ्यांना थोडी निवांतता आली आहे. पण काम काही टळलेले नाही.

मंत्रालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राज्य निवडणूक आयोगाचे कार्यालय आहे. राज्य आयोगाच्या अखत्यारीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेतल्या जातात. यामुळे येथे सध्यातरी शुकशुकाट आहे. विधानसभा निवडणूकांची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असते. मंत्रालयाच्या मागील इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आयोगाचे कार्यालय आहे. तेथे अधिकारी वर्गाची गर्दी होती.

दरराेज ८ हजार पत्रे
मंत्रालयात बहुतांशी अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. मंत्री प्रचारात व्यस्त असल्यामुळे मंत्रालयातील त्यांची केबिन्स बंदच आहेत. सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कक्ष बंद असला तरी मुख्यमंत्री कार्यालयात नियमित उपस्थिती आहे. मंत्रालयात विविध खात्यांशी संबंधित तक्रार, सूचना, मागण्यांची दररोज सरासरी ८००० पत्रे येतात. ही संख्या कायम आहे. पत्रांचे वाचन करण्यासाठी १०-१२ जणांची टीम आहे. पत्रांची वर्गवारी करून ती संबधित खात्याकडे पाठवली जातात.

काय सुरू आहे मंत्रालयात ...?
मंत्री नसल्याने कामात निवांतता, पण सुटी नाहीच
आधी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी सुरू
जाणाऱ्या फायलींचा प्रवास उपसचिवांपर्यंत संपतोय

जुन्या कामांच्या फायली
आचारसंहितेपूर्वी जास्तीत जास्त फायली हातावेगळ्या व्हाव्यात, असा मंत्र्यांचा प्रयत्न होता. जमा झालेल्या फायलींवर प्रक्रिया सुरू आहे. त्या उपसचिवांच्या टेबलापर्यंत जातात. नवीन सरकार आल्यावर मंत्र्यांच्या स्वाक्षरीने त्या मार्गी लागतील.

अभ्यागत घटले : दररोज सरासरी ३ ते ४ हजार नागरिक मंत्रालयात येतात. आता ही गर्दी ओसरली आहे. कर्मचारी तसेच अभ्यागतांसाठी असणाऱ्या कँटीनमध्ये वर्दळ घटल्याने व्यवसाय निम्म्यावर आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.