आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल इकॉनॉमीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीत बदल शक्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात प्रतिपादन 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शेतकरी सावकाराच्या दारात जाऊ नये आणि बँकेत त्याची पत पुन्हा तयार व्हावी म्हणून कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी केलेली तात्पुरती उपाययोजना आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी या शासनाने शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यावर भर दिला आहे. डिजिटल इकॉनॉमी ही रुरल इकॉनॉमिशी जोडली तरच शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 


वानाडोंगरी येथील यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयात मुख्यमंत्र्यानी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिलीत. यावेळी संस्थेचे संस्थापक माजी खासदार दत्ता मेघे, आमदार समीर मेघे, प्राचार्य डॉ.उदय वाद्ये, अभिनेते निपुण धर्माधिकारी उपस्थित होते. शेती आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मोदी सरकारने स्वामिनाथन आयोग लागू केला. याशिवाय शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव दिला. एवढ्यावरच न थांबता हमी भावाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने तीन वर्षात साडे आठ हजार कोटी धान्याची खरेदी केली आहे. याशिवाय भाजीपाला नियमन मुक्त केल्यामुळे शेतकरी कुठेही भाजीपाला विकू शकतात. शेती क्षेत्रातील गुंतवणूक या शासनाने दुपटीने वाढवली असून त्याचा परिणाम म्हणजे १६ हजार गावे जलयुक्त शिवारमुळे दुष्काळमुक्त झालीत. यावर्षी २६ टक्के पाऊस कमी पडूनही उत्पादकता वाढली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी स्मॉल अर्बन सेंटर तयार करण्याचं काम होत आहे. शहरी भागाची गरज ग्रामीण भागातून पुरवली जाईल असे उद्योग ग्रामीण भागात उभे राहिले तर ग्रामीण अर्थव्यवस्था बदलेल. याशिवाय मनोरंजन क्षेत्र आणि संधीचं विकेंद्रीकरण झालं तर ग्रामीण भागातून स्थलांतर होण्याचं प्रमाण कमी होईल असा आशावाद फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. 


बेरोजगारी वाढतेय या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले उद्योगात सेवा क्षेत्राचा वाटा वाढतोय. देशात सुरू झालेल्या एकूण स्टार्ट अप पैकी २५ टक्के स्टार्टअप एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यातही युवा पिढीचा सर्वात जास्त फोकस हा कृषी क्षेत्रातील स्टार्टअपकडे आहे, याचा अर्थ निश्चितच रोजगार वाढलेत. देशात प्रॉव्हिडेंट फंड ची खाती वाढलीत, त्यातही महाराष्ट्रातील खाती सर्वात जास्तअसल्याचे त्यांनी सांगितले.मिहान हा प्रकल्प रखडला नसून इथे ९० उद्योगांनी जागा घेऊन ठेवली आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...