आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना : जिल्ह्यात सातत्याने दुष्काळ पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीतून दिवसेंदिवस घटणारे उत्पन्न, कधी अति तर कधी पाऊसच नसल्यामुळे शेतीव्यवसाय धोक्यात आला आहे. यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारीही झाले आहेत. शहरांपासून लांब असलेल्या शेतकऱ्यांच्या या जमिनींना विक्रीसाठी ग्राहक मिळत नाही. म्हणून अशा ४०० शेतकऱ्यांनी तब्बल १६०० एकर जमीन विक्री असल्याचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाला दिले आहेत. यात कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतमजूर कुटुंबांतील गरजवंतांना या जमिनी दिल्या जात आहेत.
शासनाकडून पुरुष, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठांसाठी विविध योजना राबवण्यात येत असतात. दरम्यान, दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतमजूर कुटुंबांचे उत्पन्नाचे स्रोत वाढावे व त्यांचे शेतमजुरीवर असलेले अवलंबित्व कमी व्हावे. या उद्देशाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत या गटातील लाभार्थींना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती जमीन शासकीय दराने खरेदी करून दिली जाण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान दिले जाते. राष्ट्रीयीकृत बँकांकडून ५० टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज म्हणून उपलब्ध करून देण्यात येते. गेल्या काही वर्षांत या योजनेसाठी जमिनी उपलब्ध होत नसल्याने लाभार्थींना प्रतीक्षा करावी लागत होती. यामुळे जमिनी प्रस्तावही तसेच पडून आहेत. गेल्या वर्षातील लाभार्थींना वेळेत जमिनी उपलब्ध न झाल्याने आतापर्यंत जमिनीचे वाटप करण्यात आले नाही. यंदा परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक हिसकावून घेतले. त्यामुळे दरवर्षीच दुष्काळाचा सामना करावा लागत असून, मेहनत करूनही उत्पादन मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शेती विकून स्थलांतर करीत आहेत.
शेतजमीन मिळण्यासाठी ३५१ अर्ज
शेतजमीन मिळण्यासाठी जिल्ह्यातून ३५१ जणांनी अर्ज केले आहेत. जमीन खरेदीसाठी १७५ जणांचे प्रस्ताव हे परिपूर्ण आहेत. यामुळे बाकी अर्ज त्रुटी, मूल्यांकन, नकाशा, बॅँकेचे नो ड्यूज यामुळे प्रलंबित आहेत. शेती विकणाऱ्या शेतकऱ्यांना कोरडवाहूसाठी ५ लाख रुपये एकर तर बागायतीसाठी ८ लाख रुपये एकर भाव मिळतो. दुष्काळाची तीव्रता अशीच राहिल्यास शेती विकणाऱ्यांची संख्या अजूनच वाढत जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.