आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Due To The Global Financial Meltdown, There Is A Huge Slowdown In The Indian Market

जागतिक आर्थिक मंदीच्या भीतीने भारतीय बाजारात मोठी घसरण; अमेरिकी ट्रेझरी यील्डमध्ये मंदीची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - जगभरातील बाजारात आर्थिक मंदीचे सावट दिसून आल्याने आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी मोठी घसरण नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ३५५ अंकाच्या घसरणीसह ३७,८०८ अंकाच्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी १०२ अंकाच्या घसरणीसह ११,३५४ या पातळीवर बंद झाला. 

 


मुंबई शेअर बाजाराची सुरुवातच लाल निशाण्यावर झाली. सुरुवातीपासूनच सुरू झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे दिवसभर बाजारात घसरण दिसून आली. दिवसभरात सेन्सेक्स ३७,८८२ या उच्चांकी, तर ३७,६७४ या नीचांकी पातळीवर गेला होता. मिडकॅप शेअर १६० अंकांच्या घसरणीसह १४९१६ या पातळीवर बंद झाले, तर स्मॉलकॅप शेअर १७१ अंकाच्या घसरणीसह १४५८७ या पातळीवर बंद झाले. सेन्सेक्समध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, युटिलिटी, पॉवर आणि तेल व वायू क्षेत्र सोडल्यास इतर सर्वच क्षेत्रातील निर्देशांक घसरणीसह लाल निशाणीवर बंद झाले. 

 


राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टीमध्ये समावेश असलेले १३ शेअर सोडल्यास उर्वरित सर्व शेअर लाल निशाण्यावर बंद झाले. निफ्टी-५० मिडकॅप ०.२६ टक्क्यांच्या घसरणीसह ४८८४ अंकावर, तर स्मॉलकॅप १.६६ टक्क्यांच्या घसरणीसह ३१३८ या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये सर्वच क्षेत्रातील निर्देशांक घसरणीसह लाल निशाण्यावर बंद झाले.

 

अमेरिकी ट्रेझरी यील्डमध्ये मंदीची शक्यता  
अमेरिकी ट्रेझरी यील्ड मागील वर्षीच्या नंतर नीचांकी पातळीवर आला अाहे. यील्डमध्ये झालेल्या घसरणीमुळे जागतिक बाजारात आर्थिक मंदी येण्याची शक्यता पुन्हा एकदा व्यक्त होत असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले. ऑस्ट्रेलियाचा १० वर्षांचा बाँड यील्डदेखील विक्रमी नीचांकी पातळीवर दिसत आहे. चीनमधील शांघाय कंपोझिट, जपानचा निक्की, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि हाँगकाँगचा हँगशँग बाजारदेखील दबावामध्ये दिसत आहे. याचा परिणाम भारतीय बाजारावरदेखील दिसून येत आहे.

 

 

या कंपन्यांच्या शेअरमध्ये नोंदवली तेजी  

सेन्सेक्समध्ये जेट एअरवेजमध्ये १२.६९ टक्के, आरईसी लिमिटेडमध्ये ९.७९ टक्के, पीएफसीमध्ये ५.२१ टक्के, टीटीके प्रेस्टिजमध्ये ५.०८ टक्के आणि आयओसीमध्ये ४.७२ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली. निफ्टीत आयओसीमध्ये ४.५२ टक्के, ओएनजीसीमध्ये ४.३६ टक्के, हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये २.४८ टक्के, कोल इंडियामध्ये २.२६ टक्के आणि पॉवरग्रिडमध्ये १.५९ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली.  
 

बातम्या आणखी आहेत...