आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाच्या आदेशामुळे नगर नाका ते केंब्रिज स्कूलपर्यंत रस्त्यांच्या कामांना वेग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नगर नाका ते केंब्रिज स्कूलपर्यंत रस्त्याचे काम करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या कामाला वेग आला आहे. रस्त्यासाठी भूसंपादनाकरिता मनपाला काम करावे लागणार आहे. या कामासाठी महापौर व मनपा आयुक्तांनी उपायुक्त डी. पी. कुलकर्णी यांच्यासह उपअभियंता एम. बी. काझी आणि नगररचना विभागाचे उपअभियंता अविनाश देशमुख यांची नियुक्ती केली आहे. 

 

मनपाने नगर नाका ते केंब्रिज स्कूलपर्यंतच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याचे भूसंपादन मनपाने करून द्यावे, अशी सूचना केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत भूसंपादनासाठी मनपाला निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. उच्च न्यायालयाने या रस्त्याच्या कामाची कार्यवाही ३० दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्याने कामाला गती मिळाली आहे. त्याकरिता मनपाचे उपायुक्त डी. पी. कुलकर्णी यांच्यासह उपअभियंता एम. बी. काझी, अविनाश देशमुख यांची नियुक्ती करावी, अशी सूचना महापौर घोडेले यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती. असेे महापौर घोडेले यांनी सांगितले. 

 

भुयारी मार्गाचा प्रस्ताव तयार करणार :

शिवाजीनगर येथील रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यासाठी उच्च न्यायालयाने मनपाला दहा दिवसांत प्रस्ताव तयार करून रेल्वे विभागाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी उपायुक्त डी. पी. कुलकर्णी, उपअभियंता एम. बी. काझी, अविनाश देशमुख यांच्यावर सोपवली आहे. देवळाई चौक ते महानुभाव आश्रमापर्यंतच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा प्रस्तावही तयार केला जाईल. 

 

टीडीआरच्या संचिकेसाठी स्वतंत्र अधिकारी नेमा :

शासनाकडून टीडीआरचा दस्तऐवज मिळवण्यासाठी तत्कालीन नगररचनाचे सहायक संचालक तथा सध्याचे अतिरिक्त आयुक्त डी. पी. कुलकर्णी यांच्या नावाची शिफारस महापौरांनी केली होती. मात्र, निलंबित अधिकाऱ्याकडेच ही जबाबदारी कशी देता येईल, असा प्रश्न माध्यमांनी करताच महापौरांनी निर्णय फिरवला. शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी उपअभियंता ए.बी. देशमुख किंवा एस. एस. कुलकर्णी यांच्याकडे जबाबदारी द्यावी, अशी सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना केली. 

बातम्या आणखी आहेत...