आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील राष्ट्रपती राजवटीमुळे शंभरावे नाट्यसंमेलन अडचणीत?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या आयोजनावर आणि शासनाकडून संमेलनासाठी मिळणाऱ्या अनुदानावर प्रश्नचिन्ह उमटल्याची चर्चा नाट्यवर्तुळात आहे. विशेषत: यंदाचे नाट्य संमेलन हे शतकमहोत्सवी संमेलन असल्याने त्याची उत्सुकता रंगकर्मींमध्ये असताना संमेलनाच्या तारखा, नियोजन, अध्यक्षपदाचे नाव, आयोजन, कार्यक्रम आणि संमेलनाचा निधी अशा सर्वच मुद्द्यांवर संभ्रमावस्था दिसत आहे. मात्र, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी 'संमेलनाविषयीचे डिटेल्स लवकरच ठरवले जातील. शासकीय अनुदान मिळेल, कदाचित विलंब होईल,' असे म्हणत आहेत.


यंदा नाट्यसंमेलनाची शताब्दी असल्याने हे संमेलन नेहमीपेक्षा अधिक दिमाखदारपणे साजरे करावे ही अपेक्षा स्वाभाविक आहे. तसेच ज्या ठिकाणी नाटकाचा प्रारंभ झाला त्या नाट्यपंढरी मानल्या जाणाऱ्या सांगली येथे शंभराव्या नाट्य संमेलनाची सुरुवात व्हावी आणि सांगता मुंबईत व्हावी, असे सुरुवातीचे नियोजन होते. पण नाट्य परिषदेने शासकीय अनुदानाच्या प्राप्तीसाठी नियोजित वेळेत 'चपळाई' न दाखवल्याने अनुदान रखडणार हे स्पष्ट झाले आहे. राज्यात विधानसभा निवडणुका होणार आणि त्यासाठी आचारसंहिता लागणार याची कल्पना असूनही पदाधिकाऱ्यांनी दिरंगाई केली. दुसऱ्या बाजूला साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी आणि महामंडळाने मात्र त्वरित कारवाई करून शासकीय अनुदान आचारसंहितेपूर्वीच पदरात पाडून घेतले. ती चूक नाट्य परिषदेला आता भोवणार असे दिसते. राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे ही वेळ आली आहे.

अध्यक्षपदी कोण?
शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद कुणाकडे सोपवले जाणार, याचीही उत्सुकता नाट्य वर्तुळात आहे. अध्यक्षपदासाठी मध्यवर्ती शाखेकडे ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि अभिनेते मोहन जोशी यांची नावे सुचवण्यात आली आहेत. मोहन जोशी यांचे नाव २२ शाखांकडून सुचवण्यात आले आहे, तर मराठी रंगभूमीवर माइलस्टोन ठरलेली नाटके डॉ. पटेल यांनी दिग्दर्शित केली असल्याने त्यांना हा मान मिळावा, असाही सूर आहे. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या आगामी बैठकीत अध्यक्षपद कुणाकडे द्यायचे याचा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.

संमेलन दिमाखदारपणे पार पडेल : प्रसाद कांबळी
नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी म्हणाले, 'नाट्य संमेलनाच्या तारखा आणि स्थळ परिषदेच्या आगामी बैठकीत ठरवले जाईल. शासकीय अनुदान पन्नास लाख रुपयांचे असते. ते नक्की मिळेल. कदाचित विलंब होईल. असे याआधीही घडले आहे. पण संमेलन नक्कीच दिमाखदारपणे पार पडेल. बैठक झाल्यावर अनुदानासाठी प्रस्ताव पाठवला जाईल,'असेही त्यांनी या वेळी सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...