आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदी, पावसामुळे लालबागच्या राजाच्या पेटीत यंदा गतवर्षीपेक्षा कमी दान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी दरवर्षी मोठी रांग असते. यामुळे दानपेटीतही मोठी रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने जमा होतात. परंतु यंदा पाऊस आणि मंदीच्या लाटेमुळे दानपेटीत गेल्या वर्षीपेक्षा यंदा दीड कोटीची रोख रकमेत घट झाली तसेच सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या दानातही मोठी घट झाल्याचे दिसून आले. सोमवारी दागिन्यांचा लिलाव केला असता मंडळाच्या तिजोरीत सव्वा कोटीची भर पडली असून आणखी दोन दिवस हा लिलाव सुरू राहणार आहे.

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या गणेशोत्सवात ६.५५ कोटी रुपयांची रोख रक्कम जमा दानपेटीत जमा झाली होती, तर यंदा ५.०५ कोटी इतकी रोख रक्कम जमा झाली. तसेच गेल्या वर्षी गणेशभक्तांनी ५ किलो सोने आणि ८० किलो चांदी अर्पण केली होती. यंदा मात्र ३.७५ किलो सोने आणि ५६.७ किलो चांदी अर्पण करण्यात आली. पावसामुळे कमी भाविक आल्याचे म्हटले जात असले तरी लाडवांच्या विक्रीत मात्र वाढ झाल्याने भाविकांच्या संख्येत वाढ झाल्याचे पदाधिकारी सांगतात. गेल्या वर्षी मंडळाने १.६२ लाख लाडू विकले होते, यंदा यात वाढ होऊन १.८६ लाख लाडवांची विक्री झाली.

दानपेटीत सोन्याचे ताट आणि वाट्यांचा सेट हा यंदाची सगळ्यात महागडी वस्तू होती. याची किंमत बाजारभावाप्रमाणे १.८६ लाख रुपये आहे. तसेच एक किलो वजनाचा सोन्याचा पट्टाही दानपेटीत एका भक्ताने टाकला होता.यंदा तीन दिवस लिलाव सुरू राहणार असून यापूर्वी एका दिवसात लिलाव केला जात असे. लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंचा सोमवारी लिलाव करण्यात आल्याची माहिती देऊन मंडळाचे कोषाध्यक्ष मंगेश दळवी यांनी सांगितले की, सोन्याचे दागिने, सोन्याची ताट-वाटी (ज्याचे वजन १२३७ ग्रॅम होते) याला सर्वात जास्त म्हणजे ४३ लाख रुपयांची बोली लागली, तर चांदीची गदा, हार, मूर्ती, मोदक, साखळ्या, सोन्याचा मुलामा चढवलेले चांदीचे पाय आणि इतर वस्तूंच्या लिलावातून मंडळाच्या तिजोरीत सव्वा कोटीची रक्कम जमा झाली. एक किलो सोन्याचा पट्टा एका भाविकाने ३९ लाख ५१ हजार रुपयांना घेतला. 
 

साेन्याच्या हाराला १ लाखाची बोली
सोन्याचा मुलामा असलेल्या ५०० ग्रॅम चांदीच्या पावलांना ६६ हजार रुपये मिळाले. एका सोन्याचा हाराला एक लाख ५ हजार रुपयांची बोली लागली. मोठा चांदीचा हार एक लाख आणि सोन्याची साखळी एक लाख पाच हजार रुपयांना विकली गेली. एका हिरेजडित सोन्याच्या अंगठीला ९४ हजार रुपये मिळाल्याचेही मंगेश दळवी यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.