Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Due to the scarcity of the seedlings, soybean flourished

चाराटंचाई निर्माण झाल्याने विदर्भातील सोयाबीनचे भूस आले मराठवाड्यात

प्रतिनिधी | Update - Nov 07, 2018, 11:17 AM IST

पशुधन जगवावे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

 • Due to the scarcity of the seedlings, soybean flourished

  साेयगाव देवी - यावर्षी भोकरदन तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच हिवाळ्यातच पाणीटंचाई आणि चारा टंचाई जाणवत आहे. पशुधन जगवावे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील शेतकरी भगवान लोखंडे यांनी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून सोयाबीनचे भुस ट्रेकटरच्या सहाय्याने खरेदी करून आणले आहे.


  भुसाशी गंजी दोन ते तीन हजार रुपये व ट्रॅक्टरचे भाडे ४ हजार असा एकूण ७ ते ८ हजार रुपये खर्च झाला आहे. यासाठी शंभर किलोमिटर अंतर पार करावे लागत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. विदर्भात विशेष करुन सोयाबीन पिक घेण्याचे प्रमाण जास्त असल्याने भुस सहज उपलब्ध होत आहे. तसेच मका चाऱ्याची गंजी चार हजार रुपये भावाने मिळत असल्याने शेतकऱ्यांना पशुधन कसे सांभाळावे असा प्रश्न पडला आहे. दुष्काळ पडल्याने खरिपाची पिके हातातून गेली असून रब्बीची पेरणी झालेली नाही. मोठ्या प्रमाणात पाणी व चारा टंचाई जाणवत आहे.


  पशुधन विक्रीला काढले तर बाजारामध्ये कवडीमोल भावाने विक्री होत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता शासनाने त्वरित चारा छावण्यासह दुष्काळी उपाययोजनांची अमलबजावणी सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान, दुष्काळ पडल्याने जनावरांना पाणी व चारा टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना चारण्यासाठी परिसरात कुठेही चरण उपलब्ध नसल्याने जनावरे सांभाळण्याचे मोठे आव्हान आहे. परिसरात चारा उपलब्ध नसल्याने विदर्भातून महागडा चारा विकत घ्यावा लागत असल्याने आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

  त्यातच बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने सर्व बाजूने कोंडी झाल्याचे बरंजळा येथील शेतकरी भगवान लोखंडे यांनी सांगीतले. खरीप हंगामातील पिकांचा पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांतून केली जात आहे.

  चारा छावण्या सुरू करण्याची गरज

  दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन शासनाने त्वरित चारा छावण्या सुरु करण्याची गरज आहे. तालुक्यात पाणीसाठा खालावत चालला असून त्वरित गावोगावी टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा. तसेच दुष्काळी उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करून मजूर, महिला, शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.
  शंकर राऊत, सामाजिक कार्यकर्ते, बाभुळगाव

Trending