crime / सतत संशय घेत असल्याने दोरीने गळा आवळून पत्नीचा केला खून 

'साहेब, मी पत्नीला मारून टाकले' पत्नीला मारल्याची पोलिसांना दिली कबुली 

प्रतिनिधी

Aug 18,2019 10:53:00 AM IST

प्रतिनिधी | औरंगाबाद : पत्नीकडून सतत संशय घेऊन वाद होत असल्याने वादाला कंटाळून पतीने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर घराला कुलूप लावून छावणी पोलिस ठाणे गाठत निरीक्षकांच्या दालनात जाऊन 'साहेब, मी पत्नीला मारून टाकले' अशी कबुली दिली. शनिवारी कासंबरी दर्गा परिसरात ही घटना घडली. नाजनीन उस्मान शेख (३५) असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती उस्मान इस्माईल शेख (४०) याला पोलिसांनी अटक केेली.

रिक्षा चालवणारा उस्मान व नाजनीन यांना तीन मुले व दोन मुली आहेत. टाऊन हॉल परिसरात राहत असलेल्या त्याच्या वडिलांकडे त्यांची मुले राहत होती. कोंबड्या व बकऱ्या असल्याने पती-पत्नी दोघे दर्गा परिसरात राहत होते. मागील काही महिन्यांपासून नाजनीन नेहमी त्याच्यावर संशय घेत होती, असे त्याने पोलिसांना सांगितले. शुक्रवारी सायंकाळी दोघेही दुचाकीवर बसून पडेगाव भागातील घरी गेले. शनिवारी सकाळी अकरा वाजता उस्मान घराबाहेर उभा असताना तेथून एक महिला पायी जात होती. या वेळी तिने तुझ्याकडे का पाहिले, तू तिच्याकडे का पाहत होता यावरून नाजनीनने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. दोघांचे कडाक्याचे भांडण सुरू झाले व पारा चढलेल्या उस्मानने घरातील नायलॉनची दोरी उचलून पत्नीचा गळा आवळण्यास सुरुवात केली.

नाजनीनने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु संतापलेल्या उस्मानने तिचा मृत्यू झाल्यानंतरच दोरी सोडली. त्यानंतर घराला कुलूप लावून दुचाकीवरून त्याने थेट छावणी पोलिस ठाण्यात जात पोलिस निरीक्षक मनोज पगारे यांच्यासमोर मी पत्नीचा खून केला असून घराला कुलूप लावले आहे, असे म्हणत त्याने घराची चावी समोर ठेवली. उस्मानचे ऐकून क्षणभर पोलिसही थक्क झाले होते. त्यानंतर पगारे, उपनिरीक्षक गणेश सुरवसे उस्मानला घेऊन घटनास्थळी गेले.

मालमत्तेच्या वादातून खून केल्याचा आरोप : नाजनीनचा खून झाल्याचे कळताच तिच्या आई-वडिलांना घटनास्थळी धाव घेत हंबरडा फोडला. मालमत्तेच्या वादातून सासरकडील नातेवाइकांनी जीव घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरापर्यंत छावणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
कासंबरी दर्गा परिसरात खून झाल्यानंतर पोलिसांनी पाहणी केली.

X
COMMENT