आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील दुर्ग संवर्धन समितीची ६० कोटींची कामे पूर्ण, दुर्ग संवर्धन समितीचा दावा, तावडेंनी लक्ष द्यावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यांना पुनर्वैभव मिळवून दिले, जे किल्ले नव्याने उभारले, ज्यांची दुरुस्ती करून ते वापरात आणले, अशा राज्यातील अनेक दुर्गांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकारने उपलब्ध केलेल्या निधीपैकी ६० कोटींची कामे पूर्ण झाल्याचा दावा दुर्ग संवर्धन समितीने केला आहे. समितीने उर्वरित निधीच्या विनियोगासाठी समितीचे अध्यक्ष विनोद तावडे यांच्याकडे महत्त्वपूर्ण सूचना व शिफारशी केल्या आहेत. तसेच संवर्धनाच्या कामाशी संबंधित विविध विभागांच्या सचिवांबरोबर एकत्रित बैठक लवकरात लवकर आयोजित करावी, अशी मागणीही केली आहे. 

 

राज्य शासनाच्या वतीने २०१५ मध्ये विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली दुर्ग संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली. समितीमध्ये राज्याच्या विविध भागांतील दुर्ग अभ्यासकांचा समावेश आहे. समितीच्या कामांसाठी राज्य शासनाने शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला होता. समितीच्या कार्याला पाच वर्षे पूर्ण होत असताना, यापैकी ६० कोटींची कामे विविध गडांवर पूर्ण झाली आहेत, अशी माहिती समिती सदस्यांनी 'दिव्य मराठी'ला दिली. उर्वरित ४० कोटींच्या विनियोगासाठी समितीने तावडे यांना महत्त्वपूर्ण सूचना व शिफारशी केल्या आहेत, असे समिती सदस्य डॉ. सचिन जोशी यांनी सांगितले. 

 

समितीचे सदस्य आणि राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे म्हणाले,'दुर्ग संवर्धन समितीचे काम समाधानकारक पद्धतीने सुरू आहे. मात्र, समितीची एकत्रित स्वरूपात प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पहिली बैठक ५ डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील कोरीगडावर (लोणावळ्याजवळ) झाली. कोरी गडावरील तटबंदीचे काम पूर्ण झाले आहे. दरवाज्यांची उभारणीही करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील निधी २८ दुर्गांसाठी वापरण्यात येत आहे. नजिकच्या काळात ही सर्व कामे पूर्ण होऊन, दुर्गप्रेमींसाठी हे दुर्ग खुले होतील,". या गडांवर सुरू आहे. सध्या कोरीगड पुणे, रांगणा, विशाळगड - कोल्हापूर, वैतालवाडी - औरंगाबाद, अंदाई टंडाई, गालना, स्वाल्हेर - मुल्हेर - नाशिक खर्डा - नगर याशिवाय औसा, उदगीर, परंडा, बणकोट, पूर्णगड येथेही काम सुरू असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. 

 

साठ टक्के निधीची कामे पूर्ण 
कोरीगडावर बुधवारी झालेल्या बैठकीत दुर्ग संवर्धन समितीच्या सर्व कामाचा आढावा घेण्यात आला. सध्या राज्यातील २८ दुर्गांवर जतन-संवर्धनाचे काम सुरू आहे. त्यासाठी नियमानुसार निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यापैकी ६० टक्के निधीची कामे पूर्ण झाली आहेत. समितीच्या सूचनेनुसार अध्यक्ष विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधून विविध विभागांच्या सचिवांसह एकत्रित बैठकीविषयी विनंती करणार आहे. डॉ. तेजस गर्गे, संचालक, राज्य पुरातत्त्व विभाग 

बातम्या आणखी आहेत...