Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | During heavy monsoon Ghatshil Pargaon dam is dried

भर पावसाळ्यामध्ये घाटशीळ पारगाव धरण कोरडे ठणठणीत

प्रतििनधी | Update - Aug 27, 2018, 11:39 AM IST

भंडारदरा धरण भरले, मुळा धरण येत्या काही दिवसांत भरेल. मात्र, घाटशील धरण अजून कोरडेठाक आहे.

 • During heavy monsoon Ghatshil Pargaon dam is dried

  पाथर्डी- भंडारदरा धरण भरले, मुळा धरण येत्या काही दिवसांत भरेल. मात्र, घाटशील धरण अजून कोरडेठाक आहे. धरणात पाण्याचा एकही थेंब नाही. ऑगस्ट महिना संपत आला, तरी पाथर्डी परिसरात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर तालुका उभा अाहे. अधूनमधून पडणाऱ्या भीज पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळून चाऱ्याचा प्रश्न काही काळापुरता सुटला आहे.


  गेल्या वर्षी पाथर्डी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला होता. या पाणीसाठ्यावर आतापर्यंत पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची जेमतेम गरज भागली. उपलब्ध पाण्यावर ऊस व फळबागांचे क्षेत्र वाढले. दरम्यान, यंदा पावसाने ताण दिल्याने चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर उसाला दुभत्या जनावरांच्या मालकांकडीन मागणी वाढत आहे.


  पाथर्डी तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ५७९ मिलीलिटर असून पावसाळा ऐन भरात असून निम्म्यापर्यंत खंडित पाऊस झाला. आज अखेर पाथर्डी येथे २८२, टाकळी मानूर २०७, करंजी १७९, मिरी २९७, माणिकदौंडी २४७, कोरडगाव ३०२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ज्या धरण व पाझर तलावांमध्ये जेमतेम पाणी आहे, त्यामध्ये विद्युतमोटारी लावून पाणी ओढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. प्रशासनाचे त्याकडे लक्ष नाही. काही शेतकऱ्यांनी अशा पाण्यावर शेततळी भरून घेतली आहेत. भूजल पातळी वेगाने घटत असून बोअर खोदणाऱ्या गाड्यांची वर्दळ वाढली आहे. बीड-नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेले घाटशिळ पारगाव धरण ठणठणीत कोरडे अाहे. आष्टी, पाथर्डी तालुक्यातील नद्यांचे पाणी या धरणात जाते. सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावरील शेती या धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. शेकडो हेक्टर अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ या धरणामुळे होई. यावर्षी मात्र पावसाअभावी पावसळ्यातच दुष्काळाची चाहूल लागली आहे.


  ७२ मधील धरण ९५ नंतर निकामी
  १९७२ मध्ये घाटशीळ धरण बांधण्यात आले. या धरणाची साठवण क्षमता ४४० दक्षलक्ष घनफूट आहे. १९९५ नंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जलसंधारणाची जास्त कामे झाली. शिवाय पावसाचे प्रमाण घटले. काही अपवाद वगळता धरण त्यानंतर पूर्ण क्षमतेने भरले नाही. या वर्षी धरणात अजिबात पाणी नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. जगण्यासाठी यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊसतोडणीसाठी स्थलांतर अटळ आहे.
  - डॉ. तुकाराम नेहरकर, स्थानिक रहिवासी व शेतकरी.


  फळबागांना फटका
  सध्या भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. पालेभाज्यांना मात्र कवडीमोल भाव मिळत आहे. दूध दरात वाढ झाली असली, तरी चारा महागला आहे. डाळींना भाव नाही. कपाशीची पावसाअभावी पूर्ण क्षमतेने वाढ झालेली नाही. संत्रा व मोसंबीला ग्राहक नाही. त्यामुळे फळबागमालकांनी अडचण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे रोगराई वाढली आहे. पुरेसा पावसाअभावी दलदल वाढली आहे. एकूणच पावसाअभावी सर्वत्र चिंतेचे वातावरण असून बाजारपेठा सणासुदीच्या दिवसांत ओस पडल्या आहेत.

Trending