आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाच्या हत्येनंतर 'बंद'च्या दरम्यान परतवाड्यात व्यापाऱ्यावर चाकूहल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतवाडा - अतिसंवेदनशील म्हणून आेळखल्या जाणाऱ्या परतवाडा शहरात लगेच घटनेचे पडसाद उमटतात. याचा नाहक त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागतो. मंगळवारी रात्री एका युवकाच्या जुन्या वादातून झालेल्या हत्येमुळे बुधवारी (दि. १४) एका समुदायाच्या वतीने 'शहर बंद'चे आवाहन करण्यात आलेे. मात्र त्याला गलाबोट लागले. घटनेनंतर पुकारलेल्या बंददरम्यान एका व्यापाऱ्यावर चाकू हल्ला केला गेला. यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण अाहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जुन्या वादातून तीन युवकांनी धारदार शस्त्राने हल्ला करून सल्लू सैय्यद सल्लीम उर्फ सलमान सैय्यद रहेमान (२८, रा. नवरंग गणेश मंडळाच्या मागे, पेंशनपूरा) यांची हत्या केली. झांसी उर्फ दिपक कुबलेले (रा. पेंशनपुरा) व लल्ला ठाकूर अशी दोन आरोपींची नावे आहे. तिसऱ्या आरोपीचे नाव कळू शकले नाही. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


या प्रकरणी सैय्यद रहेमान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परतवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला अाहे. घटनेनंतर काही वेळातच आरोपी झांशी याला पोलिसांनी अटक केली. दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. घटनेच्या अनुषंगाने बुधवारी शहरातील काही नागरिकांनी जयस्तंभ चौकात एकत्र येत व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. या वेळी दगडफेक करत व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न जमावाकडून करण्यात आला, तर एका व्यापाऱ्यावर चाकूने वार करून त्याला जखमी करण्यात आले. या प्रकरणी संतप्त व्यावसायिकांनी पोलिस ठाण्याला घेराव घालत दोषींवर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली. सायंकाळपर्यंत शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. यापुढे व्यापाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली.


शहरात बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आसेगाव, पथ्रोट, चांदूर बाजार, अचलपूर, अमरावती येथून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवली. पोलिस अधीक्षक दिलीप झळके यांनी शहरात भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. घटनेचा तपास एपीआय नीलेश करंदीकर करीत असल्याची माहिती ठाणेदार संजय सोळंके यांनी दिली.पूर्व वैमनस्यातून मंगळवारी रात्री झाली होती युवकाची हत्यापरतवाडा येथे घटनेनंतर परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली होती.


चाकू हल्ल्यात व्यापारी झाला जखमी
जमावाने जयस्तंभ चौक येथे एकत्रित येत दगडफेक करीत व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद करण्यास जबरदस्ती केली. यामध्ये स्नेहा बुक डेपोचे संचालक सुशिल श्रीवास्तव यांच्यावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. यामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाली. या घटनेचा निषेध म्हणून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शहरातील व्यापाऱ्यांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला होता.


बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बुधवारी पोलिसांचा असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.आणखी दोन दिवस राहणार बंदोबस्त युवकाची हत्या व त्या अनुषंगाने शहरात निर्माण झालेले दशहतीचे वातावरण पाहता आणखी दोन दिवस पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईल. तीन आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली असून, फरार असलेल्या दोन आराेपींचा पोलिस शोध घेत आहेत. संजय सोळंके, ठाणेदार, परतवाडा


अाराेपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे
मृतक व आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्यावेळी मृतक सल्लूने झांसीवर हल्ला चढविला होता. जुन्या वादातूनच सल्लूची हत्या करण्यात आल्याची चर्चा घटनास्थळी नागरिकांमध्ये होती.


मृतक सल्लू
पोलिसांनी नागरिकांना केले शांतता राखण्याचे आवाहन
घटना घडल्यानंतर बुधवारी शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन विशिष्ट समुदायाच्या वतीने करण्यात आले. दरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पोलिसांनी नागरिकांना शहरात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.


या पूर्वीही झाल्या शहरात हत्या
यापूर्वी जुन्या वादातून शहरात हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपुर्वीच बंदोबस्तावर असताना पोलिस कर्मचारी शांतीलाल पटेल यांची हत्या करण्यात आली. वाळू प्रकरणातही दोन ते तीन वर्षांपूवी पितापुत्रावर हल्ला चएवण्यात आला होता. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...