आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Exclusive: ‘जय श्रीराम’च्या घोषणांसाठी मारहाण हा बनाव असल्याची फिर्यादीचीच कबुली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘जय श्रीराम’चा नारा द्यायला भाग पाडत बेदम मारहाण झाल्याचे शहरात लागोपाठ दोन गुन्हे दाखल झाले. पहिल्या गुन्ह्यानंतर शहरात शांतता होती. पण रविवारी रात्री दाखल झालेल्या फिर्यादीनंतर शहरातील काही भागात मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र, ज्या प्रकारची तक्रार करण्यात आली होती, तसे काही घडलेच नसल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. संबंधित फिर्यादीनेच तसे पोलिसांकडे कबूल केले असून त्याला तशी फिर्याद द्यायला भाग पाडणारे तिघेजण पोलिसांच्या रडारवर आले आहेत. दरम्यान, या प्रकरणात सर्वांनी संयम बाळगावा, असे आवाहन सोमवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले. 


या प्रकरणात पोलिसांनी संयमाने पण योग्य दिशेने तपास केला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या घटनेबाबत काही शंकाही उपस्थित झाल्या. ही घटनाच घडली नाही, या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आणि त्यांनी फिर्यादीला विश्वासात घेऊन चौकशी केली तेव्हा हा सर्व बनाव असल्याची कबुलीच संबंधित फिर्यादीने दिली. 
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी फिर्यादीचा पुरवणी जबाब नोंदवला आहे. कारमधील तरुणांनी शिवीगाळ केल्याचा राग आल्याने 'जय श्रीराम'ची घोषणा द्यायला लावून मारहाण झाल्याचा बनाव आपण केल्याचे या फिर्यादीने सोमवारी पोलिसांना सांगितले. दरम्यान, फिर्यादीला तिघांनी मिळून हा बनाव करायला भाग पाडले असण्याचा संशय पोलिसांना आहे. 


गुरुवारी (१८ जुलै) मध्यरात्री इम्रान इस्माईल पटेल (२८, रा. मुझफ्फरनगर, जटवाडा रोड) या तरुणाने बेगमपुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती, की मी हॉटेलमध्ये काम करून घरी जात असताना हडको कॉर्नर येथे अज्ञात व्यक्तींनी अडवले आणि 'जय श्रीराम'चा नारा द्यायला लावला. घोषणा न दिल्याने मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. या घटनेनंतर रविवारी रात्री सिडको पोलिस ठाण्यात शेख आमेर शेख अकबर (२३, रा. नेहरूनगर, कटकट गेट) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, कारमधील (एमएच २० ईएल ६७७७) तरुणांनी मला व माझ्यासोबत असलेल्या अन्य एकाला थांबवून 'जय श्रीराम' म्हणायला सांगितले. आम्ही नकार दिल्यावर त्यांनी शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे आम्ही भीतीपोटी 'जय श्रीराम' म्हणालो. तेथून पुढे जाताच कारमधील ते तरुण पुन्हा आले आणि एक घाणेरडा शब्द उच्चारून निघून गेले. 


दरम्यान, रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास ही तक्रार लगेचच व्हायरल झाली. क्षणात तेथे शेकडो तरुणांचा जमाव जमला. किरकोळ दगडफेकही झाली. पोलिसांनी सर्वांना शांत केले, पण तणावाची स्थिती कायम होती. पोलिसांनी रात्रीच तपासाची चक्रे फिरवली. फिर्यादीने ज्या क्रमांकाची कार सांगितली, त्या कारमालकासह कारमधील सर्व तरुणांना सकाळी ताब्यात घेतले. संदीप साईनाथ औताडे (रा. पिसादेवी रोड, हर्सूल), सुनील परमेश्वर घाटूळ, अक्षय नवनाथ लावंड, हृषीकेश अंकुशराव पोले (तिघे रा. नारायणी हॉस्पिटलमागे, एन-६, सिडको) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. 


...आणि संशय बळावला 
लागोपाठ घडलेल्या या कथित घटनांमध्ये साम्य होते. फिर्यादीने नमूद केलेल्या घटनास्थळावरून पोलिसांनी लगेच सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले. या फुटेजमध्ये कारमधील आरोपी आणि फिर्यादी केवळ ५० सेकंद एकमेकांच्या समोर असल्याचे दिसत होते. विशेष म्हणजे कारमधून कुणीही खाली उतरले नाही आणि दुचाकीवरील फिर्यादीही दुचाकीवरून उतरला नाही. 


मग एवढ्या कमी वेळात फिर्यादीने नमूद केलेला प्रकार कसा घडू शकतो, अशी शंका पोलिसांना आली. त्यानंतर गुरुवारी घडलेल्या घटनेतील आणि रविवारच्या घटनेतील फिर्यादीच्या आजूबाजूला कोण आहेत, हे तपासले असता त्यात एकसारखेच तीन लोक आढळले. मग या दोन्ही घटनांच्या सत्यतेबाबत पोलिसांचा संशय बळावला. 
 

फिर्यादीनेच दिली बनावाची कबुली
सीसीटीव्ही फुटेज आणि फिर्यादींच्या आजूबाजूची मंडळी तपासल्यानंतर पोलिसांनी फिर्यादीला विश्वासात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने हा संपूर्ण बनाव असल्याची कबुली दिली. कारमधील तरुण फार उर्मट होते, त्यांनी शिव्याही दिल्या, कारमध्ये बसूनच माझ्या हातातील मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि ते निघून गेले. यांना चांगलीच अद्दल घडली पाहिजे आणि समाजात आपलेही नाव होईल, या हेतूने आपण ती खोटी फिर्याद दिली, अशी कबुली फिर्यादीने दिल्याचे विश्वसनीयरीत्या सांगण्यात आले. सिडको पोलिसांनी या कबुलीची पुरवणी जबाबामध्ये नोंद घेतली आहे.


बनाव करायला लावणारे तिघे रडारवर
दाखल झालेल्या दोन्ही गुन्ह्यांतील फिर्यादीच्या आजूबाजूला फिरणारे, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे तीन चेहरे पोलिसांनी हेरले आहेत. या तिघांनीच या फिर्यादींना बनाव करण्याबाबत मार्गदर्शन केलेले असावे, अशी पोलिसांना शंका आहे. त्यानुसार या तिघांवरही पोलिसांची नजर असून कुठल्याही क्षणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. किरकोळ घटनांना धार्मिक रंग देऊन आपली राजकीय पोळी भाजू पाहणारे हे तिघे आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

 

धर्माच्या नावाने राजकीय पोळी भाजू देऊ नका..

धर्माच्या नावाने या शहरातील वातावरण पेटवायचे आणि त्या पेटलेल्या वातावरणात आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, हे प्रकार कोणाच्याही बाबतीत खपवून घेता कामा नये. गेल्या काही दिवसांपासून, विशेषत: लोकसभा निवडणुकीच्या निकालांपासून सुखावलेले आणि दुखावलेले असे दोन्ही गट आगपेटी हातात घेऊनच बसलेले आहेत. काडी पेटवून भडका उडवण्याची संधीच ते शोधत आहेत. आतापर्यंत नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील त्यासाठी सातत्याने शिवसेनेच्या नेत्यांकडे बोट दाखवत होते. गेल्या दोन-तीन दिवसांत जे काही प्रकार घडल्याचे समोर आले होते त्यामुळे खासदार जलील यांचे म्हणणे अधोरेखित होत होते. पण हे प्रकार म्हणजे केवळ बनाव नव्हता तर ठरवून केलेला कट होता, असे समोर येऊ पाहते आहे. अशा परिस्थितीत खासदार जलील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ज्यांनी त्या तरुणाला असा बनाव करण्यासाठी प्रवृत्त केले असेल त्यांनाही कठोर शासन करण्यासाठी खासदार म्हणून त्यांनीच पुढाकार घ्यायला हवा. तरच त्यांना मतदान केल्याचा पश्चात्ताप औरंगाबादकरांना  होणार नाही. लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले तर या जिल्ह्यात पुन्हा रजाकारी येईल, अशी भीती निवडणूक काळात दाखवली जात होती. तरीही बहुसंख्य बिगर मुस्लिमांनी जलील यांना मतदान केले आणि म्हणून ते निवडून येऊ शकले. याची जाण पत्रकार असलेल्या जलील यांना आहेच, पण जलील यांचा विजय म्हणजे मुस्लिम समाजाच्या ताकदीचा विजय आहे असा भ्रम असलेल्यांनाही त्यांनी ती जाणीव करून दिली पाहिजे. अन्यथा, या पुढच्या ५० वर्षात पुन्हा कधीही मुस्लीम उमेदवार या शहरात खासदार म्हणून निवडून येणार नाही. तसे होणे आपल्या धर्मनिरपेक्ष देशासाठी आणि लोकशाहीसाठीही अत्यंत घातक असेल. या घटनांचे निमित्त करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार काही मुस्लीम विरोधी संघटनांकडून केला जाण्याची शक्यता आहे. ते देखील होता कामा नये. मारहाण करून श्रीरामाचे नाव घ्यायला लावणारे खरे हिंदू नाहीतच आणि म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे अशी भूमिका काही मुस्लीम धर्मांच्या नेत्यांनी शांतता समितीच्या बैठकीत घेतली. औरंगाबादकरांच्या वतीने त्यांचे अभिनंदनच करायला हवे. पण तीच संयमी भूमिका हिंदूत्ववादी म्हणवून घेणाऱ्या संघटनांनीही आता घेतली पाहिजे. भावना भडकविण्यासाठी बनाव करणारे चार चौघांचे टोळके म्हणजे काही मुस्लीम समाज नाही, या भूमिकेतून या प्रकरणाकडे पाहिले पाहिजे. या शहरात आधीच समस्यांची कमी नाही. त्यात कोणीही नवी भर घालू नये, एवढीच औरंगाबादकरांची अपेक्षा आहे.

 
दीपक पटवे

(निवासी संपादक, दिव्य मराठी)

बातम्या आणखी आहेत...