आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट : मध्यरात्रीचे औरंगाबाद तरुणींसाठी असुरक्षित, महिला वार्ताहराने मुद्दाम घेतला अनुभव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही शहराचा विकास होण्यासाठी ते सुरक्षित असणे गरजेचे असते. त्यातही मुली, तरुणी, महिलांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे. सार्वजनिक ठिकाणी अगदी मध्यरात्रीही त्यांना कोणत्याही रस्त्यावरून पुरुषांप्रमाणे सहज ये-जा करता आली पाहिजे, असा प्रमुख निकष आहे. त्यानुसार औरंगाबाद युवती, मुली, महिलांसाठी किती सुरक्षित आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ च्या माध्यमातून आम्ही एक प्रयोग केला. रात्री बारा वाजेनंतर मी एकटीच (अर्थात, एक सहकारी अंतर ठेवून मागे होता) चार रात्री शहरांच्या विविध भागांत फिरले. तेव्हा लक्षात आले की, एकट्या महिलेसाठी अजूनही आपले हे शहर सुरक्षित नाही. महाविद्यालयीन तरुण, मध्यम वयाचे पुरुष एकटी महिला पाहून पाठलाग करतात, हे मी अनुभवले. वेळ पडल्यास रात्रीच्या वेळी महिलेस एकटे बाहेर जावे लागते. अशा वेळी तिच्या मनात घराबाहेर पडताना प्रचंड भीती असते. ही भीती खरी आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी हा प्रयोग होता.
 

कसा केला हा प्रयोग
> शहरातील रात्रीच्या वेळी वर्दळीचे व निर्मनुष्य असे रस्ते आधी निवडले.   
> रात्री बाराच्या सुमारास दुचाकीवरून या रस्त्यांवर फेरफटका मारण्यासाठी म्हणून बाहेर पडले.
> एकूण चार दिवस पहाटे चार वाजेपर्यंत मोहीम सुरू ठेवली होती.
> कोणत्याही अप्रिय प्रसंगाला सामोरे जावे लागू नये, यासाठी एक सहकारी विशिष्ट अंतर राखून मागे होताच.
> सतत चार दिवस केलेल्या या प्रयोगांच्या वेळी वेगवेगळे अनुभव येत गेले. कुठे कारमध्ये बसून फिरणारे (बहुधा मद्यपी) तरुण आडवे आले तर कुठे वयस्क व्यक्तींनीच पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.
> एकदा पोलिसांना बोलावल्याचा देखावा केला तर एकदा खरेच पोलिसांना फोन केला. पण आलेला अनुभवही चिंता करावा असा होता.

 

पहिल्या दिवशी निवडले हे रस्ते :

मोतीकारंजा, गांधीनगर, खोकडपुरा, सिल्लेखाना, क्रांती चौक, एसएससी बोर्ड, अहिल्याबाई होळकर चौक, विट्स हॉटेल, स्टेशन रोड, कर्णपुरा, बाबा पेट्रोल पंप, बस स्टँड, मिल कॉर्नर, खडकेश्वर, औरंगपुरा, गुलमंडी, अंगुरीबाग. 


दुसऱ्या दिवशी हे रस्ते :

मोतीकारंजा, शहागंज, हर्षनगर, दिल्ली गेट, हिमायत बाग, हर्सूल जेल, जटवाडा रोड, परत हर्सूल जेल, जळगाव टी पाॅइंट, हर्सूल गाव, फातेमानगर, परत जळगाव टी पाइंट, टीव्ही सेंटर, पोलिस अधीक्षक कार्यालय.


तिसऱ्या दिवशी हे रस्ते :

टीव्ही सेंटर, आझाद चौक, सेव्हन हिल्स, गजानन मंदिर, सिडको बसस्टँड, मुकुंदवाडी, विमानतळ, मूर्तिजापूर.


चौथ्या दिवशी हा रस्ता : सेव्हन हिल्स ते सेंट्रल नाक्यापर्यंत. 

 

चारही दिवस आलेले अऩुभव 

> दिवस पहिला : काय आला अनुभव

1. अहिल्याबाई होळकर चौक ते विटस् हॉटेल दरम्यान  चार महाविद्यालयीन तरुणांनी पाठलाग सुरू केला. ते थोडे पुढे जायचे. त्यांच्या दुचाकीचा वेग कमी करायचे आणि माझी गाडी त्यांच्याजवळून पुढे जाईपर्यंत थांबायचे. पुन्हा वेगात पुढे निघायचे. हा प्रकार तीन वेळा झाल्यावर मी दुचाकी थांबवली. पर्समधून मोबाइल काढताच ती मुले वेगात निघून गेली. 


2. रेल्वेस्टेशन ते जवळपास मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत ३० ते ३५ वयाच्या एका माणसाने पाठलाग केला. तो अगदी माझ्या दुचाकीच्या जवळ त्याची दुचाकी आणत होता. बसस्थानकाजवळ बऱ्यापैकी गर्दी होती. ती पाहून तो वेगाने पुढे गेला. 
 

3. बाबा पेट्रोल पंपाच्या उड्डाणपुलावरून जात असताना एका कारचालकाने गाडीचा वेग कमी केला. काचा खाली केल्या आणि तो मला ‘हाय...हॅलो...हाय’ असे म्हणू लागला. तेवढ्यात मागून काही कार येत असल्याचे लक्षात आल्याने काचा वर करून तो निघून गेला.
 

4. मिल कॉर्नरला एक वयस्क कारचालकाने ‘कहा जा रही हो’ म्हणत लगट करण्याचा प्रयत्न केला. चौकात लोक असल्याने तो निघून गेला. 
 

पेट्रोलिंग सुरू होते
शासकीय दूध डेअरी, बीएसएनएल रोड, एसएससी बोर्ड, आरटीओ ते बाबा पंप, बाबा ते बसस्टँड आणि पुढे मिल कॉर्नर ते खडकेश्वर हा भाग रात्री १२.३० ते १.१५ या वेळेत सामसुम होता. गांधीनगर, काला चबुतरा आणि रेल्वेस्टेशन येथे मात्र पेट्रोलिंग करताना पोलिस व्हॅन दिसली.

 

> दिवस दुसरा : काय आला अनुभव
1. यातील बहुतांश ठिकाणी रस्त्यावर लोक मद्यप्राशन केलेले होते, असे त्यांच्या एकूण अाविर्भावावरून लक्षात येत होते. एकटी युवती रात्री साडेबाराच्या सुमारास दुचाकीवर जात असल्याचे पाहून चारचाकीच्या काचा खाली करून निरखून बघत होते. मात्र, कोणीही आवाज दिला नाही. एकाही दुचाकी-चारचाकीस्वाराने ‘हाय...हॅलो’ म्हटले नाही. 

 

तिथेही पोलिस व्हॅन होती
सिडको एन ७ येथे पोलिस व्हॅन होती. हर्सूल जेल ते जटवाडा रोड आणि हर्सूल जेल ते फातेमानगर रस्ता खूपच सामसूम आहे. मात्र, तेथे ये-जा करण्यात कोणताही धोका जाणवला नाही.

 

> दिवस तिसरा : काय आला अनुभ‌व
दुचाकी, चारचाकीचालक प्रचंड वेगाने जात होते. कोणीही मला रोखण्याचा, आवाज देण्याचा प्रयत्न केला नाही. मुकुंदवाडी ते विमानतळापर्यंत प्रचंड सामसूम होती.

 

हातगाड्या
खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या मोजके चौक वगळल्यास कुठेही नव्हत्या.

 

> दिवस चौथा     काय आला अनुभव

कारमधील तीन तरुणांनी गाडीच्या काचा खाली केल्या. गाडीत मोठ्या आवाजात गाणी लावली. त्यात स्वत:चा आवाज मिसळून त्यांनी माझ्या दुचाकीजवळ त्यांची गाडी आणली. सहारा हॉटेलच्या पुढे गेल्यावर ते आणखीनच जवळ आले. काही क्षणात दुचाकीसमोर आणून कार थांबवली आणि इशारे करू लागले. तेव्हा रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. मी तत्काळ मोबाइल काढला आणि १०० नंबर डायल करून मोठ्या आवाजात ‘हॅलो...पोलिस’ असे म्हटले. पण त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. पोलिसांना चारचाकीचा क्रमांक सांगून मुलांनी दुचाकी रोखल्याचे सांगितले. तेवढ्यात एका तरुणाने कारचा दरवाजा उघडून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मी दुचाकी काढून वेगाने बायजीपुऱ्याकडे नेली. तरुण पाठलाग करत, आवाज देत सिडको स्मशानभूमीपर्यंत आले. तेथे काही जण असल्याचे लक्षात आल्यावर सिडको एन-६कडे ते वेगाने निघून गेले.

 

पोलिस म्हणाले,

घरी पोहोचल्यावर मी पुन्हा १०० नंबर डायल करत पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी ‘तुम्ही घरी सुरक्षित पोहोचला ना,’ असा प्रतिप्रश्न केला. तुमची गाडी आलीच नाही, असे सांगितल्यावर उत्तर मिळाले, ‘कदाचित व्हॅनला पोहोचण्यास थोडासा उशीर झाला असेल. असे कधी कधी होऊ शकते. पण आम्ही महिलांची काळजी घेतो.’

बातम्या आणखी आहेत...