आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • DvM Sepcial: Sharad Pawar Advises To Unhealthy Activists On Senior Leaders Are Leaving The Party

DvM Sepcial : एका पाठाेपाठ एक दिग्गज नेते पक्ष साेडत असल्याने अस्वस्थ कार्यकर्त्यांना कानमंत्र; कावळ्यांची नकाे, तर मावळ्यांची चिंता करा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एकामागोमाग एक असे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत. या नेत्यांवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरवरून टीकास्त्र साेडले आहे. ‘ज्यांच्याविरोधात खटले आहेत अशा नेत्यांवर सत्ताधारी दबाव आणत आहेत. त्यामुळे पक्षगळती होत आहे. आपण जर स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही. कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची करावी,’ अशा शब्दांत पवार यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. तसेच ‘निवडणुकीला सामोरे जाताना महिला व तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा. नवीन चेहरे समोर आणण्यासाठी पक्षाच्या वतीने काम केले जाईल,’ असे दुसरे ट्विट ही पवारांनी केले.

राष्ट्रवादीचे नेते रणजितसिंह मोहिते पाटील, जयदत्त क्षीरसागर, मधुकर पिचड, शिवेंद्रराजे भोसले, आमदार पांडुरंग बरोरा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आता रामराजे नाईक निंबाळकर व दिलीप सोपल हेसुद्धा पक्ष सोडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनाेधैर्य खचत असल्याच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी हे टि‌्वट केल्याचे मानले जाते.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठकही रविवारी पवारांनी मुंबईत घेतली. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी मान्यवर उपस्थित होते. 
या बैठकीसाठी नाशिक, सोलापूर, धुळे, पिंपरी-चिंचवड, चंद्रपूर यांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत या बैठकीत  विस्तृत चर्चा झाली. जिल्हानिहाय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केलेली प्रगती, तसेच निवडणुकीअगोदर हाती घ्यायचे काय असावेत, याबाबतच्या सूचना बैठकीत पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
 

आज जामखेडमध्ये घेणार तयारीचा आढावा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे साेमवारी जामखेडच्या (जि. नगर) दाैऱ्यावर येत आहेत. येथील रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालयाच्या इमारतीचे उद‌्घाटन त्यांच्या हस्ते हाेणार आहे. या निमित्ताने पवार विधानसभा निवडणुकाचा अनाैपचारिक आढावाही काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटून घेणार आहेत. जामखेड- कर्जत मतदारसंघातून पवारांचे नातू राेहित राजेंद्र पवार हे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे नेते तथा मंत्री राम शिंदे यांचे त्यांना आव्हान आहे. लाेकसभा निवडणुकीत मावळमधून पार्थ यांच्या रुपाने एका नातवाचा पराभव झाल्यामुळे ‘ताकही फुंकून पिण्या’ची भूमिका आता पवारांनी घेतली आहे. त्यामुळे जामखेडवर पवारांचे विशेष लक्ष आहे.