राजूर गणपती / DvM Special : ४० वर्षांपूर्वी होते अवघे दीड हजार लोकसंख्येचे गाव, राजुरेश्वराच्या महतीमुळे बदलले राजूरचे अर्थकारण

गणपतीच्या साडेतीन पीठांपैकी एक राजूरमध्ये बाप्पांनी आणली सुबत्ता
 

राम पारवे

Sep 08,2019 07:55:00 AM IST

राजूर (जि. जालना) - गणपतीच्या साडेतीन पीठांपैकी एक असलेल्या राजूर गावाचा कायापालटच झाला आहे. ४० वर्षांपूर्वी अवघ्या दीड हजार लोकसंख्येचे हे छोटेसे खेडे होते. मात्र राजुरेश्वराच्या महतीमुळे गावात नवी अर्थव्यवस्थाच उभी राहिली आहे. गावाची लोकसंख्या १० हजारांवर गेली असून विकसित शहरासारखे स्वरूप आले आहे. राजूर ही ५० हून अधिक गावांची बाजारपेठ बनली आहे. एकेकाळी निव्वळ शेतीवर अवलंबून असलेल्या राजुरात आता वर्षभर भाविकांची गर्दी असते. यातून गावाचे अर्थकारणही बदलले आहे. असंख्य दुकाने, छोटे-मोठे हॉटेल्स, कपडे, दागिने, वाहने आदींचे शोरूम, बँका, खासगी शाळा, क्लासेस आदी सुरू झाले आहेत. त्याशिवाय इतरही अनेक लहान-मोठे व्यवसाय ग्रामस्थांनी सुरू केले आहेत. त्यातून परिसरातील युवकांना रोजगार मिळाला आहे. राजूर तालुका व्हावा आणि देवस्थानाचा शिर्डी व शेगावच्या धर्तीवर विकास व्हावा, अशी मागणी केली जात आहे.

वर्षभरात कोटीच्या वर भाविक
१९७० च्या दशकात येथील टेकडीवर राजुरेश्वराचे छोटेसे मंदिर होते. त्या वेळी दर्शनासाठी भाविक बैलगाडीतून येत असत. आता राजुरात भक्तांची मांदियाळीच असते. संकष्टी चतुर्थीला ४ ते ५ लाख भाविक येतात. अंगारकी चतुर्थीला १० ते १२ लाख भाविक हजेरी लावतात. गणेश चतुर्थी, राजुरेश्वराचा जन्मोत्सव असे अनेक उत्सव येथे साजरे होतात. या माध्यमातून वर्षभरात जवळपास १ कोटी २० लाख भाविक राजूर नगरीत येतात, असे विश्वस्तांनी सांगितले.

X
COMMENT