आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : ३५४ चोऱ्या, ५ खून, एसपींनी १९ जण केले निलंबित; जालना पोलिसांची आज तपासणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपर पाेलिस महासंचालक जालन्यात येणार असल्यामुळे कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात आली. - Divya Marathi
अपर पाेलिस महासंचालक जालन्यात येणार असल्यामुळे कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात आली.

जालना  - जालना जिल्ह्यातील १९ लाख ५८ हजार ४८३ लोकसंख्येसाठी केवळ दोन हजारांच्या जवळपास पोलिस आहेत. नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे वाहतूक समस्येचा प्रश्न कायम आहे. दुष्काळामुळे सहा महिन्यांत दरोडे, जबरी चोऱ्या, घरफोड्या असे ३५४ गुन्हे घडले. यात दीडशेच्या जवळपास गुन्ह्यांचा तपास लागला. गत महिन्यात पाच खुनाच्या घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. काही दरोड्यांत तर छोटा राजनसारख्या गँगच्या निगडीत आरोपी असल्याचे समोर आले. कामात हलगर्जी, गुन्हे प्रलंबित ठेवल्यामुळे ५७ जणांना एसपींनी नोटिसा तर गुन्हेगारांशी संगनमत ठेवणाऱ्या १९ जणांना एसपींनी निलंबित केले. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचे अपर पोलिस महासंचालक रजनीश शेठ हे मंगळवारी जालन्यात येऊन तपासणी करणार आहेत. तपासणीअंती ते जालना पोलिसांची पाठ थोपटवितात की रागावतात, याकडे जालनेकरांचे लक्ष लागले आहे.   


जालना हा दुष्काळग्रस्त जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी चोऱ्या, घरफोड्यांसारख्या घटना नेहमीच घडत असतात. परंतु या घटना रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, डीवायएसपी सुधीर खिराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, एडीएस तसेच सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी कार्यरत असतात. परंतु गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात पोलिस ठाण्यांची कामगिरी चांगली राहिली नव्हती. गुन्हे प्रलंबित ठेवणे, कामात कुचराई करणे असे प्रकार सातत्याने घडल्यामुळे एसपी चैतन्य यांनी १८ पोलिस अधिकारी तर ५७ पोलिस कर्मचाऱ्यांना नोटिसा दिल्या होत्या. एकाचवेळी केलेल्या या कारवाईचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक झाले. यानंतर काही प्रमाणातही बदलही झाला, परंतु काही कर्मचाऱ्यांकडून आरोपींशी सलगी ठेवणे, ठाण्यात आलेल्या तक्रारदाराशी व्यवस्थित वागणूक न ठेवणे, अरेरावीची भाषा वापरणे, वाळू माफीयांशी संलग्नता ठेवून काम करणाऱ्या आतापर्यंत बारा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या प्रकारामुळे हप्ते घेणाऱ्या पोलिसांवर चांगलाच वचक बसला आहे. परंतु अजूनही पोलिस अधीक्षकांच्या नजरेसमोर असे काही अधिकारी, कर्मचारी आहेत. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात चांगलाच दुष्काळ पडला होता. या भयावह दुष्काळात सहा महिन्यांत तब्बल ३५४ चोऱ्या, घरफोड्या, जबरी चोऱ्या असे गुन्हे घडले. या दीडशे जवळपास गुन्हे पोलिसांना उघड करण्यात यश आले आहे. दरम्यान, गत महिन्यात तब्बल पाच खुनाच्या घटना घडल्या. यात बहुतांश गुन्हे हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेच उघड केले आहे. संबंधित ठाण्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेने २०० पेक्षा जास्त गुन्हे प्रलंबित आहेत. या प्रलंबित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एसपी  चैतन्य यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना तोंडी सूचना करण्यासह लेखी नोटिसा देऊन तपासाची तंबी दिली होती. राजूर रोडवर धारदार शस्त्राने हल्ला, बंदुकीचा धाक दाखवून सोनारांची लूटमार, परतूर येथे भरदिवसा दरोडा टाकल्यामुळे तर जिल्हाच हादरला आहे. याशिवाय घरफोड्यांचे सत्रही सुरुच राहिल्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. चोऱ्या, घरफोड्या झाल्यानंतर त्याच्या तपासासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात पथके कार्यरत आहेत. परंतु त्या पथकांकडून पाहिजे तेवढ्या गुन्ह्यांचा तपास होत नाही. यामुळे चोरटे पुन्हा-पुन्हा चोऱ्या, घरफोड्या करीत आहेत. 

 


अशी झाली तपासणी 

अपर पोलिस अधिक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी सुधीर खिराडकर यांच्यासह इतर डिवायएसपींनी ठाण्यांची तपासणी केली आहे. यानंतर पोलिस अधिक्षक एस. चैतन्य यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत तपासणी केली. अपर पोलिस महासंचालक तपासणी करीत आहेत.
 

 

प्रशासनाचा हा पुढाकार प्रथम 
> पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशव्दारात समाधान केंद्र 
> कंट्रोल रुममधून पेट्रोलिंगचा तासा-तासाला घेताहेत आढावा 
> दर शनिवारी प्रत्येक पोलिस ठाण्यात तक्रार निवारणावर चर्चा
> निवडणूक काळात चांगले काम करणाऱ्यांना मिळणार रिवॉर्ड

 

सीसीटीव्हीसाठी बैठका
जालना शहरासह तालुका, बाजारपेठेची मोठी गावे, बँका आदी ठिकाणांसह  प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या घरासह दुकानांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून बैठका घेतल्या आहेत. गाव, वस्त्यांमध्ये रात्रीच्या वेळी ग्रामस्थांनी स्वतंत्र गस्त घालण्यासाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरुन पोलिस प्रशासनाला मदत होईल. 

 

नोंदवह्यावर सह्या 
जिल्ह्यातील चोऱ्या रोखण्यासाठी ३० ते ३६ पेट्रोलिंगच्या गाड्या आहेत. या गाड्या रात्रभर विविध भागात फिरत असतात. यात १३० ते १४० अधिकारी-कर्मचारी गस्त घालतात. पेट्रोलिंगवरील पथकांसाठी जागोजागी नोंदवह्या ठेवल्या आहेत. याशिवाय कंट्रोल रुममधूनही प्रत्येक तासाला प्रत्येक गाडीवर मॉनिटरिंग केल्या जात आहे.

 

चांगले काम करणारांचा गौरव
गुन्हे प्रलंबित ठेवणे, कामात कुचराईमुळे नोटिसा देऊन काम पारदर्शक होण्यासाठी प्रयत्न केला. परंतु आरोपींना मदत करणे, वाळू माफीयांशी, गुन्हेगारांशी सलगी ठेवणाऱ्या वीस जणांना निलंबित केले. चांगले काम करणाऱ्यांचा रिवॉर्ड देऊन गौरव करत आहोत. 
एस. चैतन्य, पोलिस अधीक्षक, जालना.