आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्या निवासस्थानी अब्दुल सत्तारांची भेट, बंद दाराआड झाली चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन  - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीला वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज रविवारी सकाळी ९ वाजता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. 


स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आमदार अब्दुल सत्तार व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाली असल्याचे कळते. त्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे मात्र कळू शकले नाही. मात्र, सद्यःस्थितीत होत असलेल्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. ते जरी सध्या काँग्रेसमध्ये नसले तरी त्यांना मानणारा दोन्ही जिल्ह्यात, जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवकांचा मोठा गट आहे. सदर निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक यांची संख्या सर्वात जास्त आहे. दोन्ही जिल्ह्यावर सध्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे प्रभुत्व आहे. त्यांची भूमिका ही किंग मेकरची असणार आहे. सिल्लोडच्या काही स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्तारांच्या प्रवेशाला विरोध आहे. अशा स्थितीत होत असलेल्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार काय भूमिका घेतात. त्यांच्याकडे असलेल्या नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांची मते कुणाच्या पारड्यात पडतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या बाबतीतही चर्चा झाली असावी, असा अंदाज कार्यकर्त्यांतून वर्तवण्यात येत होता. 

 

८० हजारांचे मताधिक्य मिळाले होते हे विसरता येणार नाही
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सिल्लोड विधानसभा  मतदार संघात सत्तार यांनी त्यावेळी घेतलेली भूमिका व रावसाहेब दानवे यांना या मतदार संघातून मिळालेले सर्वाधिक ८० हजारांचे मताधिक्य मिळाले होते. हे विसरून चालणार नाही. त्यांचा मोठा प्रभाव मतदार संघावर आहे. आमदार अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत.

बातम्या आणखी आहेत...