DvM Special / DvM Special : ‘सीएनपी’ रेशो नियंत्रणाबाहेर गेल्याने पाऊस गायब; आता ‘पर्यावरण हेल्थ कार्ड’ची गरज

यावर वेळीच उपाय न केल्यास वातावरण बदलामुळे दुष्काळाचे संकट गडद होऊ शकते,

अतुल पेठकर

Jul 26,2019 07:28:46 AM IST

नागपूर - जुलै महिना संपत आला तरी मराठवाडा व विदर्भात सरासरीच्या निम्माही पाऊस पडलेला नाही. चक्क उन्हाळ्यासारखे कडक ऊन जाणवते आहे. अनेक भागात पाणीटंचाईचे संकट असून दुबार पेरणीमुळे शेतकरीही चिंताग्रस्त झाला आहे. पर्यावरणाचा “सीएनपी’ रेशो नियंत्रणाबाहेर गेल्यामुळेच ही परिस्थिती आेढवल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. आता प्रदेशनिहाय “एन्व्हायर्नमेंटल हेल्थ कार्ड’ तयार करणे हाच त्यावर एकमेव उपाय आहे, अशी माहिती राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेचे (नीरी) मुख्य अभियंता तसेच क्लायमेट चेंज अँड स्किलिंग डिव्हिजनचे िवभागप्रमुख जयशंकर पांडे यांनी “दिव्य मराठी’ला दिली.

प्रत्येक माणसाची उंची आणि वजन वेगवेगळे असते. प्रदेशनिहाय ते बदलत जाते. तसेच स्वयंपाकातील मिठासह इतरही पदार्थांचे प्रमाण ठरलेले असते. ते जराही कमी-जास्त झाले तर स्वयंपाक बिघडतो. त्याचप्रमाणे अमर्याद औद्योगिकीकरण, वाढलेली बांधकामे आणि व्यावसायिकीकरणामुळे पर्यावरणातील कार्बन, नायट्रोजन व फाॅस्फरसचे (सीएनपी रेशो) प्रमाण नियंत्रणाबाहेर गेले आहेच. परिणामी पावसाने काही भागात अनिश्चितकालीन दडी मारल्याचे प्रकार होत आहेत. यावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर पुढील काळात दुष्काळाचे आणखी भीषण संकट घोंगावण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पांडे म्हणाले.

...अन्यथा दुष्काळाचे संकट गडद
हायड्रोलाॅजिकल सायकल, कार्बन सायकल, नायट्रोजन तसेच फाॅस्फरस सायकल ही पर्यावरणातील महत्त्वाची साखळी आहे. गावात कॅल्शियम, मॅग्नेशियम सायकल असतात. त्यांना मायक्रो सायकल म्हणतात. अलीकडे ही साखळी बिघडली असून पर्यावरण व्यवस्थापन हाताबाहेर चालले आहे. यावर वेळीच उपाय न केल्यास वातावरण बदलामुळे दुष्काळाचे संकट गडद होऊ शकते, असे जयशंकर पांडे म्हणाले.

प्रदेशनिहाय पर्यावरणाची कुंडली तयार करावी लागेल : पांडे
जमिनीच्या आरोग्यासाठी “साॅइल हेल्थ कार्ड’ असते. मानवी आरोग्यासाठी “ह्युमन हेल्थ कार्ड’ असते. त्याचप्रमाणे पर्यावरण आरोग्यासाठी “एन्व्हायर्नमेंटल हेल्थ कार्ड’चा पर्याय महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला सुचवला आहे. मंडळाच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण “नीरी’त घेण्यात आले. त्या वेळी प्रदेशनिहाय “एन्व्हायर्नमेंटल हेल्थ कार्ड’ तयार करण्यास सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने ग्रामपंचायतपासून िवधिमंडळापर्यंतच्या लोकप्रतिनिधींपर्यंत याविषयी जागृती करायला हवी. जशी आर. सी. बुकमध्ये गाडीची संपूर्ण माहिती असते त्याप्रमाणे “एन्व्हायर्नमेंटल हेल्थ कार्ड’मध्ये त्या त्या प्रदेशातील पर्यावरणाची संपूर्ण कुंडली राहील. त्यामुळे “एन्व्हायर्नमेंटल हेल्थ कार्ड’ पाहून संबंधित प्रदेशात उद्योग उभारायचा की नाही हे लगेच समजेल, असे पांडे यांनी सांगितले.

X
COMMENT