social / DVM Special : दादा, राखीची ओवाळणी नको, फक्त दारूविक्री थांबवा... 

हजारो पोलिसांना राख्या बांधून महिला मागताहेत कठोर दारूबंदीची ओवाळणी 

प्रतिनिधी

Sep 04,2019 09:03:00 AM IST

नागपूर : गावांमधील महिला जत्थ्याने पोलिस ठाणे, पोलिस मदत केंद्रात दाखल होतात. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधतात. ओवाळणी देऊ केल्यावर त्या नकार देतात. 'दादा, आम्हाला राखीची ओवाळणी म्हणून काहीही नको. ओवाळणी द्यायचीच असेल तर गावातील आणि परिसरातील दारू विक्री थांबवा. आपल्या भगिनींना दारूपायी होणाऱ्या त्रासातून मुक्त करा'..असा आग्रह पोलिसांकडे धरतात. त्यांच्या आग्रहाला पोलिसही प्रतिसाद देतात. दारू विक्री होऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांना देतात.


थोर समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या व्यसनमुक्तीच्या मुक्ती पथ अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या गटांनी आतापर्यंत चौदाशेवर पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधून त्यांच्याकडून अवैध दारूच्या त्रासातून परिसर मुक्त करण्याचे अभिवचन घेतले आहे. जिल्ह्यातील १ हजार ४४ महिला या उपक्रमात सहभागी झालेल्या असून हा अनोखा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरतोय. दारूबंदी लागू असलेल्या गडचिरोलीच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी सुरूच आहे. सायंकाळ झाली की दारूपायी गावात भांडणे सुरू होतात. कुटुंब उद‌्ध्वस्त होतात. हिंसक घटनाही घडतात. दारू विक्रेत्यांकडून विरोध करणाऱ्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. हा अनुभव लक्षात घेऊन महिला मुक्ती पथ अभियानाशी जुळत आहेत. मुक्ती पथ गाव संघटनांच्या महिला कार्यकर्त्यांकडून जिल्ह्यातील सर्व ३७ पोलिस ठाणी, पोलिस मदत केंद्र तसेच इतर कार्यालयांमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अद्यापही पोलिस दलाच्या अनेक कार्यालयांमध्ये हा कार्यक्रम होणे बाकी असल्याचे मुक्तीपथच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यातील अगदी भामरागडसारख्या दुर्गम भागातही या कार्यक्रमांचे आयोजन झाले. या दुर्गम परिसरातील २४ गावांतील महिलांनी यासाठी पुढाकार घेतला.


झिंगानूर व ब्राह्मणी पोलिस ठाण्यात ओवाळणी म्हणून दिली वृक्षाची भेट
ताडगाव, कोढी, नारगुंडा, धोडराज आणि लाहेरीसारख्या भागात महिला पुढे आल्या आहेत. शिवाय दीडशेवर गावांना दारूमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे. सिरोंचा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात राखीच्या कार्यक्रमात उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांनी महिलांना संघटित राहण्याचे आवाहन करताना परिसरातील दारू विक्री बंद करण्यासाठी जिवाचे रान करू.. असे आश्वासन दिले. झिंगानूर व ब्राह्मणी पोलिस ठाण्यात महिला गटांना दारू बंदी कठोरपणे लागू करण्यासह ओवाळणी म्हणून वृक्ष भेट देण्यात आले. या आंदोलनात आम्ही सदैव महिलांच्या पाठीशी राहून त्यांना संपूर्ण मदत करू..असे आश्वासन धानोरा येथील उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी दिले.

X
COMMENT