DvM Special / DvM Special : जखमी माेराचा शेतकऱ्याने २५ तास सांभाळ करत घरगुती उपचार केला अन् वन विभागाच्या कर्मचाऱ्याने गोणीत कोंबला

आम्हाला इतरही कामे असतात, येवढेच काम नाही : वन विभाग 
 

दिव्य मराठी

Aug 20,2019 09:22:04 AM IST

टा. जिवरग - येथील किसन बाजीराव जिवरग यांच्या शेतात (गट नंंबर २२९) त्यांचा मुलगा अंकुश जिवरग हे शुक्रवारी त्याच्या शेतात शेळ्या चारण्यासाठी गेले असताना ४ वाजेच्या सुमारास दुखापत झालेल्या अवस्थेत त्यांना गवतामध्ये मोर आढळला. जवळ जाऊन पाहिले तर माेर तडफडत हाेता. तेव्हा त्यांनी माेराला घरी नेऊन घरगुती उपचार केले. वन विभागाला फाेन केला असता वन विभागाच्या कर्मचारी सुवर्णा थाेरहाथे यांनी वेळ मिळाला की येऊ, असे उत्तर दिले.


शनिवारी वनरक्षक सुवर्णा थाेरहाथे व साहेबराव साबळे हे अाले. त्यांनी माेराला उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी काेणताही पिंजरा अाणला नव्हता. त्यांनी माेराला एका गाेणीत घातले. तेव्हा शेतकऱ्याने विचारले गाेणीत तर हा जखमी माेर गुदमरून मरेल. थाेरहाथे म्हणाल्या अाम्हाला नका शिकवू अाम्ही बघून घेऊ असे सांगत माेर घेऊन गेले.


साबळे शेतकऱ्याला दटावत म्हणाले, तुम्ही सारखे फाेन करू नका, अाम्हाला कामे असतात. जखमी माेर अाहे. तर संभाळा असे सांगत त्यांच्यावर राग काढला. एकूणच जखमी अवस्थेतील माेर नेण्यासाठी वन विभागाला तब्बल २५ तास लागल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण अाहे.

तुम्ही पकडून का ठेवला ?
आम्ही नेहमी असे पक्षी गाेणीत टाकून नेतो. त्याला काही फरक पडत नाही. तुम्ही आम्हाला आमच्या पद्धतीने काम करू द्या. आम्हाला मोरांना कसे घेऊन जायचे ते आम्ही आमच्या पद्धतीने नेऊ, तुम्ही पकडून ठेवल्यामुळे आणखी आजारी पडला नाही तर आतापर्यंत माेर ठिक झाला असता.
-साहेबराव साबळे, वनरक्षक

मोर गोणीत टाकणे चुकीचे आहे
कोणताही पक्षी किंवा प्राणी जखम किंवा दुखापत अवस्थेत असल्यास त्याला मोटारसायकल असल्यास दोघांच्यामध्ये पकडून आणले पाहिजे. बंद गोणीत टाकणे चुकीचे आहे. फोन आल्या नंतर घटनास्थळी जेवढा वेळ तिथे जाण्यासाठी लागतो तेवढयाच वेळेत जाणे गरजेचे आहे.
-अण्णा वाघ, वनपाल

X