DvM Special / DvM Special : पायाभूत सोयी : ढोलेरात प्रकल्पाचाच भाग, ऑरिकमध्ये स्वतंत्र

कनेक्टिव्हिटीसारख्या प्राथमिक मुद्द्यांकडे दुर्लक्ष, प्रशासनातील असमन्वयाचा फटका, अनेक महत्त्वाच्या कामांना बगल

Sep 07,2019 09:00:00 AM IST

औरंगाबाद - डीएमआयसीअंतर्गत देशभरात आठ ठिकाणी औद्योगिक वसाहती विकसित होत आहेत. यात औरंगाबादजवळची ऑरिक सिटीही आहे. याच योजनेत गुजरातमध्ये ढोलेरा सिटी विकसित होते आहे. तेथील प्रकल्पात पायाभूत सोयींना प्रकल्पाचाच भाग करण्यात आले आहे. ‘ऑरिक’ मध्ये मात्र त्या स्वतंत्र यंत्रणेचा भाग ठेवण्यात आल्या आहेत. त्या यंत्रणांतील समन्वयाच्या अभावामुळे अनेक महत्त्वाच्या कामांना बगल देण्यात येते आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय उद्योगांच्या आकर्षणावर होतो आहे.


महत्त्वाकांक्षी अशा ‘दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर’ अंतर्गत विकसित होत असलेल्या आॅॅरिक सिटीत ५४ उद्योग येत आहेत. पण त्यांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पातळ्यांवर मोठे परिश्रम घ्यावे लागले आहेत. त्याला कारण दळणवळणाच्या सुविधांकडे या प्रकल्पाचा भाग म्हणून पाहिले गेले नसल्यामुळे त्यातील उणिवा समोर येत आहेत. उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या वतीने दर महिन्याला डीएमआयसीचा प्रगती अहवाल तयार केला जातो. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार ढोलेरा प्रकल्प ऑरिकच्या तुलनेत दळणवळणाच्या दृष्टीने विकसित म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे.


ढोलेरा येथे आंतरराष्ट्रीय सुविधा असलेले विमानतळ हा त्या प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केले जाते आहे. त्यामुळे तसा प्रचार त्या वसाहतीकडे आकर्षित करण्यासाठी केला जातो आहे. मेट्रो, आठपदरी रस्त्यांपासून सगळ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा यादेखील डीएमआयसी प्रकल्पाचा भाग म्हणूनच विकसित केल्या जात आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन पूर्ण झाले अाहे. त्यांची कामेही मार्गी लागली आहेत.


ढोलेराच्या तुलनेत औरंगाबादची डीएमआयसी वसाहत कामांच्या बाबतीत किती तरी पुढे आहे. इथे जमिनीचे उद्योगांना वाटपही झाले असून काही उद्योगांचे उत्पादनही सुरू झाले आहे. मात्र, अानुषंगिक पायाभूत सुविधा या प्रकल्पाचा भाग नसल्याने त्यांचा विकास अपेक्षित वेगाने होत नाही, ही बाब मारक ठरू शकते.

वाणिज्य मंत्रालय ठेवतेय डीएमआयसीच्या कामावर देखरेख, प्रगती अहवालानुसार ‘ढोलेरा’तील सुविधा अधिक प्रभावी

1. रस्ते : सहापदरी मार्गांची गरज आणि सद्य:स्थिती

> ढोलेरा : ६ पदरीचा डीपीआर तयार
ढोलेरामध्ये अहमदाबाद ते ढोलेरा हा सहापदरी रस्त्याचा डीपीआर तयार आहे. एनएचआयने यासाठी टंेडरही काढले आहे.


> औरंगाबाद : जालनापर्यंत रस्ता हवा
आॅरिकचे उत्पादन वेगाने ड्रायपोर्टपर्यंत पोहोचायचे असेल तर जालन्यापर्यंत सहापदरी रस्ता हा आॅरिक प्रकल्पाचा भाग हवा. अन्यथा तो होणे कठीण.

2. मेट्रो : मानवी वाहतुकीचा उत्तम मार्ग दुर्लक्षित

> ढोलेरा : अहमदाबाद
ढोलेरात गांधीनगर-अहमदाबाद मार्गावर मेट्रोसाठी प्रस्ताव दाखल आहे. यासाठी भूमी अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.


> औरंगाबाद : प्रस्ताव बासनात गेला
वाळूज आणि आॅरिक सिटी यांना औरंगाबादमार्गे जोडणारी मेट्रो प्रस्तावित होती. त्याकडे दुर्लक्ष झाले असून ती झाली तरच दळणवळण सोयीचे होईल.

3. रेल्वे : दुहेरी आिण वेगवान रेल्वे वाहतूक गरजेची

> ढोलेरा : नवा रेल्वेमार्ग होतोय
भीमनाथ येथे नवीन रेल्वे स्थानक. पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद डिव्हिजनने भूमी अधिग्रहण सुरू केले आहे.


> औरंगाबाद : दुहेरी मार्गाची गरज ड्रायपोर्टला मुंबईशी जोडण्यासाठी तिथून किमान मनमाडपर्यंत दुहेरी रेल्वेमार्ग करण्याची गरज आहे. मात्र, प्रस्तावात करमाडपर्यंतच रेल्वेमार्ग प्रस्तावित असून तोही एकेरी असल्याने गैरसोयीचा आहे.

4. विमानतळ : आंतरराष्ट्रीय दर्जा असूनही धावपट्टीअभावी सुविधेपासून वंचित

> ढोलेरा : आंतरराष्ट्रीय विमानतळ बनते आहे
ढोलेरामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जाणार आहे. यासाठी पर्यावरण खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. विमानतळ प्राधिकरण आणि गुजरात सरकारमध्ये सामंजस्य करारही झाला आहे.


> औरंगाबाद : प्राधिकरणाकडे असल्याने मंद गती
आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ औरंगबादमध्ये उपलब्ध असले तरी आंतरराष्ट्रीय दळणवळण सुविधा तिथे उपलब्ध नाही. धावपट्टीही लहान आहे. ती वाढवणे आणि आवश्यक आॅफिसेस सुरू करणे गरजेचे आहे.

5. लॉजिस्टिक हब : उद्योगांच्या सुविधांसाठी गरजेचाच

> ढोलेरा : मल्टी लाॅजिस्टिक पार्क
ढोलेरामध्ये मल्टी लॉजिस्टिक पार्क तयार होत असून त्याची सानंदशी कनेक्टिव्हिटी आहे. डीएमआयसी, रेल्वे आणि गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांनी याबाबत नुकतीच एक बैठक घेतली.


> औरंगाबाद : हब तयार होण्याची गरज
औरंगाबादमध्ये आजघडीला एकही लॉजिस्टिक हब नाही. यामुळे पाचही एमआयडीसीमध्ये कंपन्यांच्या बाहेर ट्रक, कंटेनर उभे असतात. डीएमआयसीमध्ये असा हब आवश्यक आहे.

हे आवश्यक

> ऑरिकमध्ये ४० एकर जागा शैक्षणिक संस्थांसाठी राखीव आहे. येथे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, आयआयटीचे सबसेंटर सुरू करण्याची उद्योजकांची मागणी आहे.


> येथे येणारे उद्योग पाहता जर्मन, रशियन, चिनी, जपानी आणि कोरियन भाषेतील तज्ञांची गरज भासणार आहे. पण शहरात याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था नाहीत. अशा संस्था याव्यात.


> प्रमुख औद्योगिक वसाहत वाळूज आहे. याचा शेंद्र्याशी संबंध येणार आहे. यामुळे वाळूज ते शेंद्रा कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मनपा, एमआयडीसी, डीएमआयसी, सिडकोचे सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत.

> शहरात ऑरिक सिटीचा एकही बोर्ड नाही. या प्रकल्पाची माहिती देणारे होर्डिंग, दिशादर्शक, कमानी आवश्यक आहे.

कन्व्हेन्शन संेटर आवश्यक
उद्योजकांच्या उत्पादनांच्या वस्तंूचे प्रदर्शन करण्यासाठी कन्व्हेन्शन सेंटरची गरज भासते. प्रकल्पात याचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात अजून हे सेेंटर झालेले नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑरिक हॉलवरच कन्व्हेन्शन सेंटरची बोळवण करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या मदतीवर भवितव्य अवलंबून
गेल्या २ वर्षांच्या प्रयत्नातून सुमारे ५४ उद्योगांनी डीएमआयसीमध्ये पदार्पण केले, ही आनंदाची आणि तेवढीच समाधानाची बाब आहे. ही चांगली सुरुवात आहे. या उद्योगांना येथे स्वीकारण्यासाठी प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाकडून सहकार्य लागणार आहे. ते कशा प्रकारे केले जाते यावर डीएमआयसीचाचा वेग आणि भवितव्य अवलंबून आहे.'
-मुकुंद कुलकर्णी, उद्योजक तथा सदस्य, केळकर समिती

X