आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : मराठवाड्यात पावसाची हुलकावणीच, ७६ पैकी ३२ तालुक्यांवर आताच भीषण दुष्काळाचे सावट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शुक्रवारी तेरा मिमी पाऊस पडला होता. शनिवार ते बुधवार दरम्यान मोठ्या पावसाला हुलकावणीच मिळाली.  गत सहा दिवसांत केवळ ०.५७ मिमी म्हणजेच अर्धा मिमी सर्वांत कमी पाऊस पडण्याचा विक्रम झाला आहे. मराठवाड्यात ४७.२५ टक्के पर्जन्यमान कमी झाले आहे. ७६ पैकी ३२ तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी आणि ४० तालुक्यांत ५० ते ८० टक्क्यापर्यंत पाऊस पडला.  बिजांकूर धोक्यात आले असून एकूण ७२ तालुक्यांत दुष्काळजन्य परिस्थितीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.  हवामान विभाग व हवामान शास्त्रज्ञांनी २६ जुलैपासून मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.


गत आठ दिवसांपासून आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी होत आहे. मुसळधार पाऊस पडणार असेच सर्वांना वाटते. प्रत्यक्षात नाममात्र पाऊस पडत असल्याने दररोज हिरमोड होत आहे. १८ जुलै रोजी मराठवाड्यात केवळ ४.३९ मिमी, १९ जुलै रोजी १०.२० मिमी, २० जुलै १३ मिमी आणि २१  जुलै सर्वात कमी म्हणजे ०.५५ मिमी आणि २२ जुलै रोजी त्यापेक्षा कमी ०.२ मिमी तर २३ जुलैला तर पाऊस पडलाच नाही. २४ जुलैच्या सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जेथे वातावरण निर्माण झाले तेथेच दहा मिनिटे पाऊस पडल्याची नोंद विभागीय आयुक्तालयाने घेतली आहे. दिवसभर ऊन सावलीचा खेळ सुरू असतो. पावसाची हुलकावणी मिळत आहे. १ ते २४ जुलै दरम्यान सरासरी २९८.९५ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत १५७.७१ मिमी म्हणजेच ५२.७५ टक्केच पर्जन्यमान झाले. ४७.२५ टक्का तुटीचा पाऊस पडल्याने सर्वत्र चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. 
 

३२ तालुक्यांत ५० % पेक्षा कमी पाऊस
औरंगाबाद जिल्ह्यातील :  पैठण ४७, जालना जिल्ह्यातील जालना तालुका ४९, परतूर ४९.७, घनसावंगी ४८.३, परभणीतील पालम ४८.४, पूर्णा ४९.४, सेलू ३५.५, पाथरी ४१.१,जिंतूर ४६.१, जालना ३७.२, हिंगोलीत वसमत २७, सेनगाव ४०.७, हिंगोली ४२.५, नांदेड जिल्ह्यात भोकर ४९, लोहा ४४, किनवट ३९.२, हदगाव ३३, हिमायतनगर २८.१, देगलूर ३९.९, धर्माबाद ३९.८, बीड जिल्ह्यात गेवराई ३१.०, शिरूर कासार ३९.२, वडवाणी ३३.३, अंबाजोगाई ३७.३, धारूर ४३.७, परळी ४९.२. लातूमधील  औसा ३३.५, चाकूर ३५.७, उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा ३८, वाशी ५०.३, कळंब ५०.५, उस्मानाबादमध्ये  केवळ ४८  मि.मी. पाऊस झाला. 
 

४० लाखांवर नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
> ११५३ पैकी ९५ चाऱ्या छावण्या सुरू. ६७ हजार ५५६ पशुधनाला निवारा.  
> ८७२ प्रकल्पांत केवळ ०.७९ टक्केच जलसाठा शिल्लक.
> ७९.९४ टक्के पेरणी धोक्यात आली असून संपूर्ण खरीप पेरणीच धोक्यात.

 

अशी झाली पेरणी :  

मराठवाड्यात ४९ लाख ९६ हजार १८३ हेक्टरपैकी ३९ लाख ९३ हजार ९९३ हेक्टरवर पेरणी. कापूस १४ लाख ४५ हजार ८४१.९६ हेक्टर(८१.३८ टक्के), ऊस २, सूर्यफूल ५, कारळ १५, तीळ २३.११, भुईमूग ४०.४३, उडीद ६८.८१, मूग ७०.५, तूर ६६, मका ९५.३४, रागी ००, बाजरी ४१.४७, ज्वारी १७.२५, भात ७ टक्के तर सोयाबीन सर्वाधिक १२५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे सर्व पीके कोमेजू लागली आहेत.