आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : बुद्धिबळाच्या पटावर मन गणक पद्धतीने सुटतील गणिते; प्राध्यापकाचे संशोधन, पेटंटही मिळवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - गणिताची भीती अनेक विद्यार्थ्यांना असते. त्यामुळे हा विषय खेळाच्या माध्यमातून शिकवता आला तर विद्यार्थ्यांचा गणिताकडे ओढा वाढेल. ही बाब लक्षात घेऊन धुळे येथील प्रा. बाळकृष्ण तांबे यांनी बुद्धिबळ पटाचा वापर करून गणित सोडवण्यासाठी मन गणक ही सोपी पद्धत विकसित केली अाहे. या पद्धतीचे त्यांनी पेटंटही 
मिळवले आहे.

प्रा. तांबे यांनी पंधरा वर्षे संशोधन करून मन गणक पद्धत विकसित केली आहे.  ते व्यवसायाने अभियंता आहेत. मूळ धुळ्याचे रहिवासी असलेले प्रा. तांबे नोकरीनिमित्त पुणे येेथे स्थायिक झाले आहेत.  मन गणक साधनात मुख्यत: दोन प्रकारची मूळ तंत्रे आहेत. दोन्ही तंत्र पध्दतीत अनेक प्रकार उपलब्ध आहेत. ही पद्धत अबॅकसला हा मोठा पर्याय ठरू शकते. मन गणक हे एक सुलभ तंत्र आहे. हे तंत्र सापशिडीच्या खेळाप्रमाणे आहे. त्यामुळे हे साधन वापरताना खेळण्याचा आनंदही मुलांना मिळतो. मन गणक पद्धतीत बुद्धिबळ पटाचा अगदी शिताफीने वापर करण्यात आला आहे. मन गणकाप्रमाणेच प्रा. तांबे यांनी ६४ घरांचे बुद्धिबळ पट शंभर घरांचे केले आहे. या शंभर घरांच्या पटाचा उपयोग गणित सोडवण्यासाठी करता येतो. या साधनाचा उपयोग करून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सुलभतेने करता येतात.

यामध्ये तुम्हाला एकदा मन गणकाची पद्धत समजली की मनातल्या मनात गणिते सोडवता येतात. या तंत्राचा वापर करून केवळ दोन बोटांचा वापर करून चारअंकी संख्यांची बेरीज व वजाबाकी करता येते. जास्त अंकी संख्या असेल तरीही गणित सोडवता येते.
 
 

गणित सोडवण्याची पद्धत
मन गणकाचा वापर करून ३४ अधिक १३ या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी एक बोट बुद्धिबळाच्या पटावरील ३४ या आकड्यावर ठेवावे. आता त्यात प्रथम १३ पैकी १० मिळवावे. त्यासाठी हे एक बोट घर खाली सरकवून ४४ वर ठेवावे. त्यानंतर त्यात ३ मिळवण्यासाठी हे बोट एक एक करत तीन घरे डावीकडे सरकवावे. जसे ४५, ४६ आणि ४७. तर ४७ हे आलेले उत्तर आहे. याच पध्दतीने वजाबाकीची गणितेही करता येतील. 
 

बुद्धिबळ पटात शंभर घरे, ४० मोहरे 
बुद्धिबळाच्या पटात ६४ घरे आणि ३२ मोहरे असतात. मात्र, प्रा. तांबे यांनी शंभर घरे आणि ४० मोहऱ्यांच्या बुद्धिबळची निर्मिती केली आहे. त्यांचेही पेटंट त्यांच्या नावावर आहे. या खेळात त्यांनी आधुनिक काळाप्रमाणे काही बदल केले आहेत. रणगाडा, बॉम्बर, तोफ, ड्रोन, सेनापती, अध्यक्ष, सैनिक, कमांडो अशी नावे त्यांनी मोहऱ्यांना दिली आहेत. या बुद्धिबळ पटात १०० घरे आणि ४० मोहरे असल्याने चाली रचण्यासाठी ६० घरे मिळतात. त्यामुळे बुद्धिबळ खेळणे अधिक रंजक, गतिमान होते. या बुद्धिबळाचे पेटंटही त्यांनी मिळवले आहे.
 
 

बातम्या आणखी आहेत...