आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special: मराठवाड्यात देहविक्रीच्या नावाखाली अनेकांना घातला ऑनलाइन गंडा! ‌‘दिव्य मराठी’ने गुन्हे शाखेच्या मदतीने या बदमाशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एस्काॅर्ट सर्व्हिस अर्थात देहविक्रय करणाऱ्या तरुणींची सेवा देण्याच्या नावाखाली  गंडवण्याचे अनेक प्रकार औरंगाबादच नव्हे, तर राज्यभरात घडत आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कॉलगर्ल्सची सेवा देण्याचा दावा करत लोकांना गंडवणाऱ्या बदमाशांचा माग घेण्याचा ‘दिव्य मराठी’ने शुक्रवारी प्रयत्न केला. या रॅकेटमधील एक बदमाश औरंगाबादेतच असल्याचे भासवत राजस्थानातील उदयपूर जिल्ह्याच्या एका गावातून व्हॉट्सअॅपवर संवाद साधत फसवेगिरी करत असल्याचे उघड झाले.  ‌‘दिव्य मराठी’ने  गुन्हे शाखेच्या मदतीने या बदमाशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. 
 
महाराष्ट्रात औरंगाबाद शहरासह मराठवाड्यातील काही शहरांत  वेबसाइट तसेच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एस्कॉर्ट सेवा देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात नेटसॅव्ही लोकांची फसवणूक होत आहे. दहा दिवसांपूर्वी जालना येथेही अशीच एक घटना उघडकीस आली. एस्कॉर्ट सर्व्हिससाठी गंडवल्या गेल्याने अनेक जण बदनामीच्या भीतीने अशा प्रकरणांची कोणाकडे वाच्यताही करत नाहीत. पोलिसांत जाणे तर दूरच. लोकांची ही मानसिकता लक्षात घेऊनच अशा प्रकारची भामटेगिरी करणाऱ्यांचे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पीक आले आहे. 

कसे अडकतात तरुणॽ
कोणी शरीरसुखाच्या लालसेने एस्कॉर्ट सर्व्हिस असे इंटरनेटवर सर्च केल्यास त्यांच्यासमोर अनेक लिंक्स येतात. शिवाय अनेक फोन नंबर आणि व्हॉट्सअॅप नंबर त्यांच्या पुढ्यात येतात. त्यातील एखादा नंबर निवडून कॉल किंवा व्हॉट्सअॅप संदेश केल्यानंतर ती व्यक्ती या बदमाशांच्या जाळ्यात पुरती अडकून जाते.

पैसे उकळण्याचा फंडा
ग्राहकाने निवडलेल्या नंबरवर कॉल केल्यानंतर त्यांना पुढील व्यक्ती सदरील नंबरवरील व्हॉट्सअॅपवर हाय किंवा हॅलो करण्यास सांगते. हाय किंवा हॅलो केल्यानंतर पुढील बदमाश व्हॉट्सअॅपवरच त्यांना रेटकार्ड अर्थात एका तास, दोन तास, पूर्ण दिवस किंवा रात्र सेवा देण्याबाबतची रक्कम टाईप स्वरूपात किंवा व्हॉइस ऑडिओ स्वरूपात कळवतो. सोबतच काही तरुणींची छायाचित्रे पाठवून त्यातील एकीची निवड करण्यास सांगतो. एकदा ग्राहकाने तरुणीची निवड करून रिप्लाय देताच त्याला  मोबाइल नंबर पाठवून त्यावर पेटीएम, गुगल पे किंवा फोनपेद्वारे २५ टक्के बुकिंग रक्कम (सेवेसाठी ठरलेल्या रकमेच्या) भरण्यास सांगतो. उर्वरित रक्कम सेवा देणाऱ्या कॉलगर्लला देण्यास सांगतो. उदा. सेवेचा दर २००० हजार रुपये ठरलेला असेल तर त्यातील ५०० रुपये प्रथम द्यायचे आणि उर्वरित दीड हजार रुपये कॉलगर्लला देण्यास सांगतो. ही बुकिंग रक्कम भरल्यानंतर त्याचा स्क्रीन शॉट पाठवण्यास सांगितले जाते. रक्कम जमा झाल्याची खात्री झाल्यानंतर बदमाश सेवेचे ठिकाण कळवतो. हे ठिकाण म्हणजे एखादे थ्री स्टार हॉटेल असते. त्यानंतर लगेच आणखी एक संदेश पाठवून संपूर्ण रक्कम तुम्हाला ऑनलाइनच द्यावी लागेल, असे कळवतो. यासाठी तो मेम (कॉलगर्ल) सेवेसाठी अजून तयार झाली नाही. त्यांना आधी रक्कम हवी, असा बहाणा सांगतो. ग्राहकाने उर्वरित रक्कम जमा केल्यानंतर आता तुम्हाला सेक्युरिटी चार्ज जमा करावा लागेल, असे सांगत तीन ते चार हजार रुपये आणखी जमा करण्यास सांगतो. ही रक्कम तुम्हाला रिफंडेबल म्हणजे परत केली जाईल, असा विश्वास देतो. ग्राहकाने जर ही रक्कम भरण्यास नकार दिला किंवा घासाघीस केली तर बदमाश त्याला व्हॉट्सअॅपवरच त्याचे बनावट असलेले आधार कार्ड तसेच ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र पाठवून विश्वास संपादित करतो. एकदा का ग्राहकाने हे पैसे भरले की पुढील बदमाश फोन बंद करून ठेवतो. यानंतर मात्र गंडवली गेलेली व्यक्ती बदनामीच्या भीतीने कोणाकडे दाद मागते ना पोलिसांत फिर्याद देते.
 

अशी केली ‘दिव्य मराठी’च्या पथकाने पाहणी
> दुपारी १ वाजून १५ मिनिटांना ८८७५९५२०८१ या क्रमांकावर काॅल करून सेवेची मागणी केली. समोरील व्यक्तीने याच क्रमांकाच्या व्हॉट्सअॅपवर  ‘हाय’, असा संदेश पाठवण्यास सांगितले.
 
> तासाभराने ३ वाजून ६ मिनिटांनी मॅपसह शहरातील एका नामांकित हॉटेलचे लोकेशन पाठवून उर्वरित पैसेही ऑनलाइन भरण्याचा आग्रह धरत  ७३५७५८६३९४ या नंबरवर फोनपेवरून पैसे भरण्याचा संदेश पाठवला.
 
> त्यानंतर तरुणीची निवड करण्यापासून ते पुढील संभाषण करत २ वाजून ६ मिनिटांना बदमाशाने सांगितलेल्या खात्यावर ५०० रु. बुकिंग रक्कम भरली.
 
> ५ वाजून १७ मिनिटांना त्याच्या खात्यावर २ हजार रु. जमा केल्यावर सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून आणखी ३ हजारांची मागणी केली. पण हा फसवणूक करणारा आहे, ही  खात्री पटताच त्याच्यासोबतचा व्यवहार थांबवला.
 

अशी होती पाहणी करणारी टीम
‘दिव्य मराठी’ने या पाहणीबाबत पोलिसांना कळवून त्यांची मदत घेतली.  सहायक पोलिस आयुक्त हनुमंत भापकर, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल, पोलिस हेड कॉन्स्टेबल शिवाजी झिने, पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र साळुंखे, प्रभाकर राऊत, संदीप क्षीरसागर, संजय जाधव, महिला पोलिस कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे, किंगमेकर सेक्युरिटी सर्व्हिसचे अक्षय गुरव आदींनी ‘दिव्य मराठी’च्या टीमला सहकार्य केले.