DvM Special / DvM Special : कोट्यवधीचा दवाखाना पाण्यात, तरीही पूरग्रस्तांची सेवा

आपत्तीतही सांगलीतील डॉ. जयश्री आणि श्रेणिक पाटील दांपत्याचे प्रेरक कार्य

संजय चिंचोले

Aug 14,2019 09:17:00 AM IST

औरंगाबाद - अत्यंत कष्टाने उभारलेले क्लिनिक आणि त्यातील कोट्यवधींचे महागडे उपकरण डोळ्यादेखत पुरात पाण्यात गेले असतानाही एका डॉक्टर दांपत्याने हजारो पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत देत अनोखा आदर्श निर्माण केला आहे. डॉ. जयश्री आणि श्रेणिक पाटील असे या दांपत्याचे नाव असून मागील १२ दिवसांपासून ते सातत्याने पूरग्रस्तांवर उपचार करत आहेत. उपचारासोबतच तातडीने लागणारी औषधे, सॅनिटरी नॅपकिन्स तसेच खाद्यपदार्थही पूरग्रस्तांना अगदी नि:शुल्क पुरवत आहेत.


सांगतील प्रख्यात रेडिअाेलॉजिस्ट डॉ. जयश्री पाटील यांचे मध्यवर्ती बसस्थानकालगत आर. के. एक्सट येथे वेध नावाचे डायग्नोस्टिक अॅन्ड रिसर्च सेंटर आहे. पती डॉ. श्रेणिक पाटील यांच्यासह ते हे क्लिनिक चालवत आहेत. यात एमआरआय, कार्डियाॅकसिटी स्कॅन, ६४ स्लाइस अॅन्जिओग्रॉफी, एक्सरे, अशी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध होती. मात्र, कृष्णेला आलेल्या महापुरामुळे संपूर्ण सांगलीकरांसोबतच पाटील यांचे क्लिनिकही पाण्यात गेले. क्लिनिकला सुमारे १० ते १२ फूट पाण्याने वेढा घातलेला असल्याने ही सर्व महागडी उपकरणे पाण्याखाली आली. पुराचा जोर अधिकच वाढल्याने त्यांनी कुटुंबीयांसोबत लागलीच शहरातील एक हॉटेल गाठले. परंतु, अवघे शहर पाण्यात बुडालेले असताना आपण त्यांच्या मदतीला न जाणे म्हणजे हाती घेतलेल्या सेवेशी अनिष्ठा ठरेल, याचा विचार करून पाटील दांपत्य प्रत्यक्ष मदतकार्यात उतरले.

स्वतंत्र पथक बनवून लोकांची मदत
क्लिनिकमध्ये सर्वत्र पाणी आणि चिखलाचे साम्राज्य असल्याने तिथे रुग्णांची तपासणी करणे शक्य नव्हते. म्हणून डॉ. जयश्री पाटील यांनी १० ते १५ डॉक्टर तसेच आरोग्य सेवकांना एकत्र आणत पथक तयार केले. शिवाय, सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज अशी एक रुग्णवाहिकाही तयार केली. मागील १०-१२ दिवसांपासून डॉ. पाटील दांपत्य येथून रुग्णांना सेवा देत आहेत. शिवाय, पूरग्रस्तांची जेवणामुळे अाबाळ होऊ नये म्हणून येथेच भोजनाची व्यवस्था केली आहे.

मदत करणे हीच आपली संस्कृती
२००५ साली देखील सांगलीत पूर आला होता. पण, यंदाचा पूर आमचे इतके नुकसान करेल, असे मला वाटले नव्हते. या पुरामुळे आमचे सुमारे १० कोटींचे नुकसान झाले. परमेश्वर आम्हाला आमची नुकसानभरपाई नक्कीच करून देईल. पण, इतरांना मदत करणे हे काही मोठे काम नाही. ती आपली मानवी संस्कृती आहे.
- डाॅ. जयश्री पाटील, रेडिओलोजिस्ट, सांगली

X
COMMENT