आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • DvM Special: 'Rasuka' Will Be Added If Adulterated In Milk; Information About Madhya Pradesh Food And Drug Administration Minister Silawat

DvM Special : दुधामध्ये भेसळ केल्यास ‘रासुका’ लावणार; मध्य प्रदेशचे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री सिलावट यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांत भेसळ केल्यास राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) लागू करण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तुलसीराम सिलावट यांनी सोमवारी ही माहिती दिली.
सिलावट यांनी विधानसभेतील आपल्या कक्षात माध्यम प्रतिनिधींना  सांगितले की, ‘दूध आणि दुग्धजन्य पदार्थांत भेसळ होत असल्याचे वृत्त माध्यमांत आल्यानंतर गेल्या दोन दिवसांत दूध, पनीर, तूप आणि खवा यांचे २५५ नमुने गोळा करण्यात आले आहेत. प्रयोगशाळांचा अहवाल आल्यानंतर त्यात भेसळ आढळल्यास संबंधितांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई केली जाईल.’ सिलावट यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे नमुने गोळा करावेत, त्यांची चाचणी करवून घ्यावी आणि भेसळ करणाऱ्यांना पकडण्यासाठी पथके स्थापन करावीत, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे नियंत्रक रवींद्र सिंह आणि संयुक्त नियंत्रक डी. के. नागेंद्र यांच्यासह उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते. अशीच एक बैठक मंगळवारी भोपाळ विभागातही घेण्यात येईल, अशी माहितीही सिलावट यांनी दिली.


मंत्र्यांनी सांगितले की, परवानाधारक दुकाने तसेच सांची दुग्ध संघ आणि सौरभ डेअरीतून दुधाचे नमुने घेण्यात आले आहेत. दूध आणि खव्यात भेसळ करण्यासाठी कुख्यात असलेल्या भिंड आणि मोरेना भागातून आठ सदस्यांचे पथक नमुने गोळा करत आहे. जबलपूर भागात तीन परवाने रद्द करण्यात आले आहेत. ग्वाल्हेर आणि चंबळ भागातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी मी ३० जुलैला या भागाच्या दौऱ्यावर जाणार आहे.
 

 

२ कारखान्यांवर छापा, ६२ जणांना भेसळप्रकरणी अटक 
मध्य प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) दोन दिवसांपूर्वी चंबळ विभागातील दोन जिल्ह्यांत कारखान्यांवर छापे टाकून दुधात भेसळ करणारे एक रॅकेट पकडले होते. तेथून दिल्लीसह पाच राज्यांना दुधाचा पुरवठा होतो. मोरेनामधील अंबाह आणि भिंडमधील लहर येथील या छाप्यांप्रकरणी ६२ जणांना अटक करण्यात आली होती. या कारखान्यांमधून उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा तसेच मध्य प्रदेशमधील ब्रँडेड आउटलेट्सना दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा केला जात असल्याचे चौकशीत उघड झाले आहे, अशी माहिती एसटीएफचे पोलिस अधीक्षक राजेश भदोरिया यांनी दिली होती. 
 

बातम्या आणखी आहेत...