आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकाची वंचितकडे उमेदवारीची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी नागपूर मतदारसंघातून समीर कुलकर्णी या संघ स्वयंसेवकाने वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागितल्याची माहिती आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अण्णासाहेब पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 


येथील विश्राम भवनात पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, समीर कुलकर्णी यांनी आपण संघातही वंचित घटक असल्याचे सांगितले. त्याने आपले नाव जाहीर करण्यासही सांगितले. समीर कुलकर्णींना देवेंद्र फडणवीसांच्या विरोधातच निवडणूक लढण्याची प्रबळ इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. वंचित आघाडीने उमेदवारीबाबत काही निकष ठरवले आहेत. त्यात उमेदवार उच्चशिक्षित असावा, त्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी, समाजसेवेची त्याला मनापासून इच्छा असावी या निकषावर उमेदवारांची कसोटी लागणार आहे. समाजातील सर्व स्तरातल्या डाॅक्टर, वकील, शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ अशा विविध स्तरातील इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना अशा राजकीय पक्षातील माजी मंत्री, माजी आमदार-खासदारांनीही वंचितकडून उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखती दिल्या असल्याचेही अण्णासाहेब पाटील यांनी सांगितले. 


नांदेड जिल्ह्यातील ९ मतदार संघाकरिता सायंकाळपर्यत १०३ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. अद्यापही मुलाखती सरू असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नागपूर विभागात ११ जिल्ह्यांतील एकूण ६५० इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. उस्मानाबाद, बीड, लातूर येथील मुलाखती झाल्या आहेत. येत्या ३० तारखेपर्यंत मराठवाड्यातील मुलाखती पूर्ण होतील. त्यानंतर उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याचेही पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पार्लमेंटरी बोर्डाच्या रेखाताई ठाकूर, अशोक सोनुने, प्रवक्ते फारुख अहमद, गोविंद दळवी, श्याम कांबळे, एमआयएमचे मराठवाडा अध्यक्ष फेरोजलाला  आदी उपस्थित होते.

 

काँग्रेसचे पत्र मिळाले, उत्तर दिले 
काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षांनी अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना पत्र लिहून आघाडी करण्याबाबत चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. चार दिवसांपूर्वी त्यांचे पत्र मिळाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्ष वंचित आघाडीला भाजपची बी टीम म्हणत होता. त्याबाबत खुलासा करावा, आम्हाला मिळालेल्या ४२ लाख मतदारांची माफी मागावी नंतरच आपण चर्चेला बसू असे उत्तर अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी दिल्याचेही अण्णासाहेब पाटील यांनी सांगितले. 

 

मानेंचा बोलविता धनी वेगळाच 
लक्ष्मण माने यांनी काँग्रेस सोबत आघाडी करण्यासाठी हेकड भूमिका घेतली. तरी त्यांना वंचित आघाडीतून काढले नाही. मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. पण पक्षात याबाबत पुरेशी चर्चा न करताच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली हे योग्य नाही. काँग्रेस नेत्यांचे त्यांच्यावर ऋण आहेत. त्यामुळेच त्यांचा काँग्रेसकडे ओढा आहे. त्यांचा बोलविता धनी कोणी वेगळाच असावा, असेही पाटील म्हणाले. वंचित आघाडीची महिलांना ३० टक्के उमेदवारी देण्याची इच्छा आहे. तथापि त्यासाठी इच्छुक महिलाच नाहीत, असेही त्यांनी सांगितले.