आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेप्रति समर्पण यावे म्हणून आई ‘बैजू’ म्हणून हाक मारायची... मी फाेटाेग्राफीत जीव ओतून भरभरून जगलाे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘एखादी उत्कृष्ट कलाकृती किंवा घडामोड कॅमेऱ्यात कैद केली म्हणजे फोटोग्राफी नव्हे, तर ताे क्षण जगता आला पाहिजे. फोटोग्राफीत मी काय केले यापेक्षा फोटोग्राफीने मला काय दिले हे जास्त महत्त्वाचं. फोटोग्राफीचं वेड नसतं तर डोंगर-दऱ्या, घनदाट जंगल, पाण्याखालचं विस्मयकारी जग मला कधीच अनुभवता आलं नसतं. केवळ छंद म्हणून नव्हे तर फाेटाेग्राफीचं मी स्वत:ला अक्षरश: वेड लावून घेतलं. त्यामुळे आयुष्याभर पुरेल इतक्या आठवणी आणि आनंद मला यातून मिळाला. मी भरभरून फोटोग्राफी जगलो, अशी भावना आैरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार बैजू पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केली. वाइल्डलाइफ फोटोग्राफीत त्यांना आजवर ३६ आंतरराष्ट्रीय आणि ६२ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मिळाले आहेत. 


‘वर्ल्ड फोटोग्राफी डे’निमित्त बैजूंनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत
….
‘माझं खरं नाव विनोद पाटील. आईला सिनेमाची आवड हाेती. ‘बैजू बावरा’ चित्रपट तिला फारच आवडला. ‘बैजू’ला गीत-संगीताचं प्रचंड वेडं असतं. आपल्या बाळानेही एखाद्या कलेप्रति असंच समर्पित असावं असं आईला वाटत असे, म्हणून ती मलाही बैजू म्हणून हाक मारायची. तेव्हापासून बैजू हीच माझी ओळख बनली. जळगाव जिल्ह्यातील कुंभारीत आमची शेती. लहानपणी शेतात जायचाे तेव्हा तेथील निसर्ग, पशु-पक्ष्यांबद्दल आवड निर्माण झाली. चित्र काढण्याचाही छंद हाेता, त्यामुळे रंगसंगतीची उत्तम जाण होती. बारावीचं शिक्षण झालं तोपर्यंत मी आपसूकचं फोटोग्राफीकडं वळालो होतो. सोबतचे मित्र इंजिनिअरिंग, मेडिकलमध्ये करिअर करत होते. पण मी बी. कॉम. शिकलाे आणि फोटोग्राफीवर विशेष लक्ष केंद्रित केलं. हा छंद जाेपासताना एक तर मी खूप माेठं नाव करेन किंवा रस्त्यावर येईन, अशा दोनच शक्यता होत्या. कुटुंबीयांसाेबतच मित्रमंडळीही नावं ठेवायची. पण मी मात्र त्याकडे लक्ष न देता आपले काम सुरू ठेवले. कारण मला माझ्या गुणवत्तेवर आणि कलेवर विश्वास होता. त्यामुळेच आज हे यश मिळवू शकलाे. फोटोग्राफीत मला पैसा कमी मिळाला, पण अनेक मोठमोठ्या, दिग्गज माणसांचा सहवास लाभला, माझ्या दृष्टीने हीच खरी संपत्ती आहे.

आता ‘अंडरवाॅटर’वर भर : 
‘व्हिडिओग्राफी, शॉर्टफिल्मवर काम का केले नाही?’ असेही मला लाेक विचारतात. पण २८ वर्षांच्या करिअरमध्ये माझा पूर्ण फोकस फक्त वाइल्डलाइफ फोटोग्राफीवरच हाेता. एकाच गोष्टीत सातत्य ठेवले नाही तर तुम्ही कधीही यश मिळवू शकत नाही, असे माझे ठाम मत आहे. त्यामुळे फोटोग्राफीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत ‘वाइल्डलाइफ’ हीच आवड जोपासण्यावर मी पूर्णपणे भर दिला. याच क्षेत्रात आता मी अंडरवॉटर फोटोग्राफीवर लक्ष केंद्रित केले आहे.

सर्वाेत्कृष्टतेबाबत तडजाेड नकाे : 
पूर्वीच्या तुलनेत आताच्या फोटोग्राफीत प्रचंड बदल झाले आहेत. या क्षेत्रात तंत्रशुद्ध शिक्षण घेतले तरच वेगळी ओळख निर्माण करता येईल. ‘लहान शहरात राहून इतकं मोठं काम कसं काय शक्य आहे का?’ असाही प्रश्न नेहमी विचारण्यात येतो. पण यावर मी एकच म्हणेन की, ‘सर्वोत्कृष्ट कामासाठी तुम्ही तडजोड करत नाही हे जेव्हा समजेल तेव्हा लोक तुमच्याकडे वळतील. उदा. अजिंठा व वेरूळच पाहा. तेथे जाण्यासाठी, राहण्यासाठी सुविधा नाहीत, पण तरीही जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक तेथे येतातच ना!’

अविस्मरणीय क्षण : 
अविस्मरणीय फोटोंबद्दल बोलताना बैजू म्हणाले की, ‘गेल्या २८ वर्षांत मी जंगलात विविध प्राणी, पक्ष्यांचे हजारो फोटो काढले. ३५० वर फोटो अजूनही मी जगासमोर आणले नाहीत. वाइल्डलाइफ फोटोग्राफीत मला लासूरजवळ सरड्यांच्या भांडणाचा टिपलेला क्षण कायम लक्षात राहण्यासारखा आहे. तोच माझा आवडता फोटो आहे. तर दोन वर्षांपूर्वी ‘सेव्ह टायगर’ मोहिमेअंतर्गत लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये माझ्या फोटोंचे भरलेले प्रदर्शन माझ्यासाठी अविस्मरणीय असा क्षण आहे. जगातील प्रमुख १० फोटोग्राफरमध्ये देशातून माझे एकट्याचे वाघांचे फोटो तेथे प्रदर्शित करण्यात आले होते.’

बातम्या आणखी आहेत...