आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : दुष्काळाच्या सावटाखाली पोळा साजरा करण्याचे आव्हान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - दुष्काळाचे गडद सावट, पाण्याची तीव्र टंचाई, अस्मानाला भिडलेली महागाई आणि पशुधनाला खाऊ काय घालावे या चिंतेने ग्रासलेल्या शेतकऱ्यांसाठी यंदाचा पोळा सण छातीवर दगड ठेवूनच साजरा करण्याची वेळ आली आहे. अवघ्या दोन दिवसांवर पोळा सण येऊन ठेपला असतानाही शेतकरी वर्गात काहीसे अनुत्साहाचे वातावरण आहे.     

बळीराजासाठी आनंदाची पर्वणी समजला जाणारा, आपल्या शेतीत दिवसरात्र काबाडकष्ट करून झिजणाऱ्या बैलांचे ऋण फेडण्याचा दिवस. शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस. नेहमीप्रमाणे पोळा सणानिमित्ताने शहरातील बाजारपेठ सजली आहे. बळीराजाचे दैवत आणि शेतीत राबणाऱ्या बैलांना सजवण्यासाठी आवश्यक साहित्यांच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत दीड पटीने वाढ झाली आहे. ही महागाईही शेतकऱ्यांनी आनंदाने सहन केली असती. परंतु यंदा परिस्थिती वेगळी आहे. संपूर्ण जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. पोळ्यापर्यंत पावसाने जेमतेम सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाला आहे. खरिपाचे पीक कसेबसे हाती येईल. पाऊस नसल्याने नद्या, नाले, ओढे, तलाव भरले नाहीत. पिण्याच्या पाण्याचेच दुर्भिक्ष असल्याने रब्बीसाठी शेतीला पाणी मिळणार नाही. त्यामुळे एका हंगामावर यंदा शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागणार अशी स्थिती आहे.  अनेक ठिकाणच्या नागरिकांना भटकंती करून तहान भागवावी लागत आहे. तर जनावरांना चारा टंचाईचाही  सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर यंदा पोळा सण आला आहे. शेतकऱ्यांना वाढत्या महागाईत आणि कोरड्या दुष्काळाच्या सावटाखाली हा सण साजरा करण्यासाठी कसरतच करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकरी साध्या पद्धतीने हा सण साजरा करण्याच्या तयारीत दिसत आहेत.  

मागील काही वर्षांपासून अल्प पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. जिल्ह्यात कोरडा दुष्काळ सदृश परिस्थिती व चारा - पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 

बाजारपेठेत अनुत्साह 
यंदा बैलपोळ्यासाठी लागणाऱ्या  महाराजा गोंडा, महाराणी गोंडा, काळा कंठा, कमरी, मटाटी, गजरा, घुंगर माळा, कवडी माळा, मणीमाळा, झुली, बाशिंग, सूत दोरी, नायलॉन दोरी अशा साहित्यांसह बैलांची शिंगे रंगवण्यासाठी आवश्यक असलेले विविध कंपन्यांचे वॉर्निश, बेगड, झुली यासह अनेक साहित्यांनी दुकाने सजली आहेत. या सजावट साहित्याच्या दरात यंदा दीडपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी जास्त किंमतीचे साहित्य खरेदी करण्याऐवजी कमी किंमतीचे साहित्य आणि बैलमूर्ती खरेदी करीत आहेत. त्याचेही प्रमाण तुरळक असल्याने साहित्य विक्रेते शेतकरी ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...