आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special: मिनगिरेच्या लाचखोरीचा आकडा पाहून समाजकल्याण खात्याची लक्तरे वेशीवर, बड्या अधिकाऱ्यांत अस्वस्थता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - अपंग शाळेतील कर्मचाऱ्याचे ४७ लाख ३३ हजारांचे थकीत वेतन अदा करण्याच्या बदल्यात खासगी व्यक्तीमार्फत सात लाखांची  लाच घेणाऱ्या लातूर जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्याला पकडल्यानंतर या खात्याचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. समाजकल्याण खात्यात चालणारी लाचखोरी अन् त्याचे आकडे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 


अनुसूचित जाती-जमातींच्या नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवणारे खाते म्हणून समाज कल्याणची ओळख आहे. मात्र या खात्याने मागास समाजाचे कोणते कल्याण केले याची उकल अद्याप व्हायची आहे. समाजकल्याण खात्याऐवजी मधल्या काळात सामाजिक न्याय असे संबोधन करण्यात आले. परंतु यामुळे सामाजिक उतरंडीत मागे राहिलेल्यांना या खात्याकडून न्याय मिळाल्याचे ऐकीवात नाही. उलट या खात्यात काम करणाऱ्यांचे कसे कोटकल्याण होत आहे याचे सुरस किस्से ऐकायला मिळतात. त्यामध्ये आता मंगळवारच्या शिवानंद मिनगिरे या अधिकाऱ्याने घेतलेल्या सात लाख रुपयांच्या लाचेच्या घटनेची भर पडली आहे. मंगळवारी रात्री ही कारवाई झाल्यानंतर या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली. बुधवारी सकाळपासून जिल्हा परिषद आणि समाजकल्याण खात्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळाली. विशेष करून समाजकल्याण विभागामध्ये तर ही अस्वस्थता अधिकच होती. तेथील कर्मचारी एकत्र बसून मंगळवारच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कारवाईची चर्चा करीत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कमी-जास्त तणाव होता. आपले साहेब असे रंगेहाथ पकडले जातील यावर कुणालाच विश्वास वाटत नव्हता. तर काहींनी कशा पद्धतीने खुलेआम पैसे मागितले जात होते यावर मागील अनुभव सांगत प्रकाश टाकला. यापूर्वी उपमुख्य अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह वर्ग एक दर्जाच्या सहा ते सात अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने अटक झाली होती याची खुमासदार चर्चाही जि.प. आवारात रंगली होती.
 

काय आहे प्रकरण :

एका अपंग शाळेतील कर्मचाऱ्यांचे ४७ लाख ३३ हजार रूपयांचे थकीत वेतन काढण्याच्या मोबदल्यात समाजकल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे याने आपला हस्तक उमाकांत तपशाळे याच्या मार्फत २० टक्के प्रमाणे ९ लाख ४० हजारांची लाच मागितली होती.  यासंबंधीची तक्रार मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक माणिक बेद्रे यांनी सापळा रचून ७ लाख रुपयांसह तपशाळे याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर समाजकल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे यालाही ताब्यात घेण्यात आले.   
 

 

सोशल मीडियावर मिनगिरे देशभक्त; सुविचारांच्याही अनेक पोस्ट
लाच घेताना पकडलेल्या समाजकल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे याचे फेसबुकवर खाते आहे. त्यावर देशप्रेम, समाजिक कार्याचा उल्लेख असलेल्या पोस्ट मिनगिरे याने केल्या आहेत. एकीकडे सामाजिक काम, देशभक्ती आणि सुविचारांच्या पोस्ट करणाऱ्या मिनगिरेला तब्बल सात लाखांची लाच घेताना पकडण्यात आल्यामुळे सोशल मीडियावरील दिखावेगिरीचाही पर्दाफाश झाला आहे.

 

बड्या अधिकाऱ्यांत अस्वस्थता
गेल्या वर्षभरात २२ अधिकारी कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आले होते. या वर्षात सहा महिन्यांतच १८ अधिकारी कर्मचाऱ्यांवर ही कारवाई झाली आहे. गेल्या महिन्यात अहमदपूरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर एक लाखाची रक्कम मागणाऱ्याला अटक करण्यात आली होती. तसेच दोन नायब तहसीलदारांनाही पकडण्यात आले. मागील काळात कारवाई झालेल्या वर्ग एक दर्जाच्या अधिकाऱ्यांची प्रकरणे सध्या सुनावणीवर आहे. या सगळ्या प्रकरणांमुळे बड्या अधिकाऱ्यांत अस्वस्थता आहे. खासगीत मोठ्या अधिकाऱ्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कारवाईबाबत फारशा सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या नाहीत, हे विशेष. ही घटना वाईट असल्याचे बहुतांश अधिकाऱ्यांचे मत आहे.
 

बातम्या आणखी आहेत...