आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : २०१४ पासून लाेकांसाठी जीवनदायीनी ठरली १०८ रुग्णवाहिका; आतापर्यंत ४२ लाख रुग्णांना मिळाले जीवदान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत करण्यासाठी सुरू झालेली १०८ ही सेवा राज्यभरातील लाखोंना जीवनदान देणारी ठरली आहे. पूरग्रस्त भागातही या रुग्णवाहिकांमुळे हजारो नागरिकांना मदत झाली आहे. ९३७ रुग्णवाहिकांद्वारे २०१४ पासून जुलै २०१९ पर्यंत ४२ लाख ४४ हजार २२२ रुग्णांना जीवनदान देण्याचे काम या सेवेमुळे शक्य झाले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ही सेवा नागरिकांसाठी मोफत उपलब्ध  करून दिली आहे. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेत सुमारे ३३ हजार बाळंतपण सुखरुपपणे पार पडले आहेत. गेल्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या पूरग्रस्त भागात देखील या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सुमारे हजारो नागरिकांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

२०१४ ते जुलै २०१९ पर्यंत सुमारे ३ लाख ४६ हजार रस्ते अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम या रुग्णवाहिकेमुळे शक्य झाले आहे. अपघातग्रस्तांना लगेचच आवश्यक ती प्राथमिक उपचार सेवा मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. आतापर्यंत विविध १३ प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीतील रुग्णांना वेळेत उपचार मिळाले आहेत. रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकेची ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे.
 

चाकावरचे प्रसूतीगृह, ३३ हजार गर्भवतींचे बाळंतपण
रुग्णवाहिका चाकावरचे प्रसूतीगृहही ठरले आहे. मागील पाच वर्षांत सुमारे ३३ हजार गर्भवतींचे सुखरुप बाळंतपण करण्यात यश मिळाले. या सेवेंतर्गत ९३७ रुग्णवाहिका राज्यात चालवल्या जात आहेत. तसेच दोन वर्षांपूर्वी राज्यात मुंबईमध्ये बाइक ॲम्ब्युलन्स सुरू करण्यात आली. त्या माध्यमातून आतापर्यंत २२ हजार रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. या सेवेचा विस्तार करत मुंबईमध्ये १८, पालघर, अमरावती येथे प्रत्येकी पाच तर सोलापूर आणि गडचिरोली येथे प्रत्येकी १ अशा ३० बाइक ॲम्ब्युलन्स सध्या कार्यरत आहेत.