आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Talk Show : लाेककलांना राजाश्रय ताेकडा; नगरदेवळ्याचे शाहीर शिवाजीराव पाटलांची खंत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शाहिरी ही कला अभिजात आहे. पाेवाडा गायन आणि लेखनासाठी प्रतिभा आणि साधना लागते. मात्र, लाेककलांना मिळणारा राजाश्रय अतिशय ताेकडा आहे, अशी खंत पाचाेरा तालुक्यातील नगरदेवळ्याचे शाहीर शिवाजीराव पाटील यांनी येथे व्यक्त केली.


जळगावात 'दिव्य मराठी'च्या कार्यालयात सांस्कृतिक गणेशाेत्सव अंतर्गत शनिवारी संवाद साधताना ते बाेलत हाेते. 'चरणी तुझ्या विनंती गजानना' या गीताने त्यांनी सुरुवात केली. 'श्राेता कलेला आधार खरा, तुम्हा पहिला मानाचा मुजरा' हा शाहिरी मुजराही सादर केला. त्यातून त्यांनी श्राेता असेल तर कलेला महत्त्व आहे, हे पटवून दिले. 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं' या गीतातून त्यांनी समाजकारण, राजकारणावर बाेचरी टिका केली. शाहिरी ही महाराष्ट्राची शान आहे. पाेवाड्याची साधना करण्यासाठी तरुण वर्ग तयार हाेत नाही. त्याचं कारण त्यांना सवंग लाेकप्रियता मिळणाऱ्या गाेष्टी आवडतात. शासनाकडे पाच वर्षे पाठपुरावा केला. त्यानंतर कुठे शिबिरे घेण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात आला. महापुरुषांसह लाेकनेत्यांवर ३५ पाेवाडे स्वत: रचले, गायीले. शाळा, महाविद्यालयांमध्ये या कलेचा प्रचार, प्रसार झाला पाहिजे. जनप्रबाेधनाचे प्रभावी माध्यम पाेवाडा आहे. पण त्याचे महत्व कळायला हवे. कलेचा वापर याेग्य पद्धतीने केला तर आदर्श समाज घडेल. कला कुठलीही असू द्या, त्यातून विचार मांडले गेले पाहिजे. कला ही समाजाचं संवर्धन आहे. म्हणून कलाकार हा आचारसंहितेत बसला पाहिजे, असे ते या वेळी म्हणाले. त्यांच्यासाेबत त्यांच्या साैभाग्यवती वैजयंताबाई पाटील यांची उपस्थिती हाेती.

पहाडी आवाजात पाेवाडा गायन
संवाद साधत असताना शिवाजीराव पाटील यांनी लाेकशाहीर अण्णा भाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित पाेवाडे सादर केले. अहिराणीतील प्रबाेधनपर गीतरचना म्हटल्या. क्षेत्र काेणतेही असू द्या, स्वत:ला उत्तमपणे घडवण्यासाठी कलाेपासना करायला हवी, असे त्यांनी नमूद केले.

गुरे चारताना शब्द, सूर गवसले
> काैटुंबिक परिस्थिती अतिशय बेताची हाेती. गुरे चारून आणि शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. गायरान, नदीकाठावर गुरांसाेबत हातात बासरी असायची. ती वाजवायचाे. त्यातून शब्द, सूर गवसले. कालांतराने पाेवाडे सादरीकरण आणि लेखनाचे वेड लागले.

> महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजराथ अशा विविध राज्यात पाेवाड्यांचे शेकडाे कार्यक्रम झाले. त्यातून कलाप्रेमी जाेडले गेले. महाराणा प्रताप यांच्यावर हिंदीतून पाेवाडा लिहीला आहे. ताे गायनाचा सराव पूर्ण झाला आहे. लवकरच हा पाेवाडा राष्ट्रीय स्तरावर पाेहाेचणार असा विश्वास आहे.

> ऐतिहासिक पाेवाडे सादर करताना जाे प्रतिसाद मिळताे ताे शब्दातीत आहे. मात्र, सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवरही पाेवाडे सादर केले जातात. विषयांची मर्यादा या लाेककलेला नाही. महाराष्ट्राचे वैभव असलेली ही कला टिकवून ठेवण्यासाठी नव्या पिढीने साधना म्हणून ती जाेपासावी. नव्या पिढीने या काेलकलेकडे गांभिर्याने बघायला हवे. गावागावांत शाहिरी गायनाचे कार्यक्रम हाेणे अपेक्षित आहे.
 

बातम्या आणखी आहेत...