आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखुलताबाद - तालुक्यातील पिंपरी शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाला असून पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. बिबट्याचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार केले. बिबट्याचा मृत्यू वन अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच झाला असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
खुलताबाद वन विभागाला वन्यप्राण्यांचे गांभीर्य नाही का, असा प्रश्न वन्यजीव तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात अाहे. तालुक्यात वन्यजीव सुरक्षेसाठी प्रशासनाने ९९ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा उभा केला आहे. परंतु हे वन विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांनी अडचणीच्या वेळी संपर्क साधला असता प्रतिसाद देत नाहीत, अशी ओरडही शेतकऱ्यांमधून होत आहे. एकूणच या घटनेमुळे वन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मृत बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून दोन-तीन दिवसात अहवाल आल्यानंतरच मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट होईल. शेतकरी अंकुश राजाराम अधाने हे त्यांच्या पिंपरी शिवारातील गट नंबर ६१ मध्ये शेतात सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास काही कामानिमित्त गेले होते. तेव्हा त्यांना तेथे अंदाजे बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला. ही माहिती वनाधिकारी वाय.सी.दिलपाक यांना देण्यात आली.
वनाधिकारी यांच्यासह सहायक वनसंरक्षक औरंगाबाद ए. एम. सोनवणे यांच्यासह ताफा घटनास्थळी पोहोचला. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत बिबट्याचे घटनास्थळी शवविच्छेदन केले व बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन येथील वन विभागाच्या कार्यालयाच्या परिसरात अंत्यसंस्कार केले. दरेगाव येथील बाबासाहेब गायकवाड यांच्या शेतात रविवारी दुपारी एकच्या सुमारास काही कुत्री हरणाच्या पिल्लावर हल्ला करत होते.
खुलताबाद वन विभागाचे वन्यप्राणी सुरक्षेकडे दुर्लक्ष
खुलताबाद तालुक्यात अनेक वन्यप्राणी आहेत. या सर्व वन्यप्राण्यांची देखरेख करण्याची जबाबदारी वन विभागाची आहे. खुलताबाद वन विभागात वन अधिकारी १, वनपाल ५, वनरक्षक १९, वनमजूर ७३ (एकूण ९९) असा मोठा ताफा प्रशासनाने या ठिकाणी नियुक्त केला आहे. तरीही वन्यप्राण्यांची सुरक्षा या तालुक्यात वन विभागाच्या वतीने व्यवस्थित केली जात नाही. वन विभागाच्या वतीने वन्यप्राण्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे झालेल्या घटनेमुळे दिसून येत आहे, असे राजाराम घुसळे यांनी सांगितले आहे.
वन विभाग बिबट्याच्या बाबतीत झाले सुस्त
वन परिसरात मोठ्या प्रमाणावर वन्यप्राणी आहेत. यापैकी चार ते पाच बिबटे हे शूलिभंजन, म्हैसमाळ, निरगुडी पिंपरी, आखतवाड तांडा, मंबापूरवाडी डोंगर परिसरात वावरत असतात. अनेकदा या बिबट्यांनी शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ला करून जनावरांचे फडशे पाडून शेतकऱ्यांची हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. अनेकदा शेतकऱ्यांनी याविषयी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. परंतु संबधित अधिकाऱ्यांनी या बिबट्याला पकडण्यासाठी कुठल्याही प्रकारची तयारी दाखवली नाही. बिबट्याच्या धास्तीने अनेक शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जाणे आजही टाळत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.