आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाठोडं!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायबा शहराच्या रस्त्यावर धुंडीत सुटलाय माणुसकी. ती त्याच्या हाती कुठली लागतेय! पण आस फार वेडी असते. लोक त्याच्याजवळ थांबत नव्हते. डोक्यावरची छत्री सांभाळत जो तो त्याच्याजवळून निघून जात होता. पावसाला चुकवत होता. तसं रायबालाही. कुणालाच त्याची दया येत नव्हती. 

 

रायबा दवाखान्याच्या पायरीवर बसला होता. त्याची सहा वर्षांची लेक कृष्णा त्याच्या पुढ्यात बसली होती. रायबाच्या डोक्यावर प्रश्नांचं गाठोडं. त्या गाठोड्याची गाठ त्याच्या लेकीनं सोडली.
‘दादा, आई मेली त् आता भाकरी कोण करीन?’ कपाळावर येणाऱ्या झिपऱ्या सावरत कृष्णा म्हणाली.


रायबाजवळ लेकीच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, असं नाही; पण त्याची चिंता ही वेगळी होती. ती काही तो त्याच्या लेकीला सांगू शकत नव्हता. लेकीच्या भाकरीचा प्रश्न सोडवणं त्याच्या दृष्टीने अवघड नाहीच. तोच तिच्या भाकरीसाठी माखून घेणार होता काटूटीत हात. लेकीचा प्रश्न तो सहजी सोडवणार होता. पण त्याचा प्रश्न कोण सोडवणार होतं? त्याच्या सगुणाची डेडबॉडी गावात कशी न्यायची? मगाशी दवाखान्यातल्या कर्मचाऱ्याने सांगितलं की, अॅम्ब्युलन्सचे हजार रुपये पडतील! त्याच्या खिशात दिडकी नव्हती. कुठून आणायचे पैसे? या भल्यामोठ्या शहरात आपल्या जिवाचं कोण आहे? मग कशाला कोण देईल पैसे? लोकांचे पैसे कडीकुलुपात बंद आहेत. अन् आपल्याला तर सगुणाला कुठल्याही हालतमधे गावाकडं न्यायचं आहे. जित्या माणसाला वाहून नेणारी वाहने चिक्कार. मेलेल्या कुठे कोण वाहून नेतो? रायबाची चिंता वाढत चालली होती. त्यात पावसालाही सुरुवात झाली होती. अवघड दु:खाच्या प्रसंगात पाऊस हटकून येतोच...
‘ये लवकर आटप. अजूनही इडंच का? अॅम्ब्युलन्सचं काय? आणली न्हायीस का? बॉडी कुठवर सांभाळायची आम्ही?’ वॉर्डबायने फटकारले 
‘दादा, अजूक जरा कळ काढा; बघतो म्या, काय जमतं का?’


रायबा शहराच्या रस्त्यावर धुंडीत सुटलाय माणुसकी. ती त्याच्या हाती कुठली लागतेय! पण आस फार वेडी असते. लोक त्याच्याजवळ थांबत नव्हते. डोक्यावरची छत्री सांभाळत जो तो त्याच्याजवळून निघून जात होता. पावसाला चुकवत होता. तसं रायबालाही. कुणालाच त्याची दया  येत नव्हती. तरी त्याने आशा सोडली नव्हती. कुणी तरी दिडकी ठेवीलच आपल्या हातावर. माणुसकी पार संपून गेली नाही, या जगातून. तेवढ्यात कृष्णा म्हणाली,
‘दादा, कधी जायचं आपल्या गावाला!’
‘पैसे मिळाले का मंग जायचं!’
‘कधी मिळतील दादा पैसे?’
रायबा हे कसं सांगू शकणार होता? पैशाच्या तिजोऱ्या लोकांच्या आहेत. चाव्याही त्यांच्याच. समोरून एक फेरारी येताना दिसली. तो जिवाची पर्वा न करता अगदी रस्त्याच्या मधोमध जाऊन उभा राहिला. गाडीला आडवा झाला. पावसाची तमा न करता गाडीवाला शेठ बाहेर आला.
‘काय रे भडव्या! आम्हाला मारतो का?’ असं म्हणत त्यानं मारायला सुरुवात केली. शेठ एकटा कसा असेल? चारदोन जण आणखी होतेच.
‘माझ्या दादाला मारू नका! माझ्या दादाला पैसे हवेत!’ कृष्णा रडत म्हणाली.
‘काय रे भडव्या, मौत आली का तुझी!’
‘सायब, माझी बायको मेलीय. तिचं मढं गावाकडे न्यायचंय मला. त्यासाठी अॅम्ब्युलन्सची यवस्था करायचीय. तुमचे पैसे परत करीन म्या!’

‘साल्या भिकारड्या तू पैसे आमच्याकडे ठेवायला दिले का?’ असं म्हणत परत एक कानफटात ठेवून दिली. गर्दी जमली होती. ट्राफिक जॅम झाला. तशी माणसाची माणुसकीही जॅम झाली होती. तीही अशीच कुठल्या तरी सिग्नलवर अडकून पडली होती. म्हणून रायबापर्यंत पोहोचत नसावी. गर्दी पांगली. रायबा हताश झाला.

 

दवाखान्यातल्या स्ट्रेचरवर त्याच्या सगुणाची बॉडी बाहेर आणली. वॉर्डबायने आवाज दिला.
‘ये रायबा, संपला तुझा एक घंटा. उचल ही बॉडी!’

जवळच घोंगडी पांघरून उभ्या असलेल्या भिकाऱ्यानं रायबाचं दु:खं ओळखलं. तो रायबाजवळ येत म्हणाला,
‘ये बघ दादा माझ्याकडे हे पोतं हाये. यक कर. या पोत्यात घाल ती बॉडी. अन् ही पाचपंचवीस रुपयाची चिल्लर असूदे वाटचालीला!’


रायबाच्या जिवात जीव आला. त्याचा प्रश्न सुटला. सगुणाचं प्रेत पोत्यात टाकलं. त्याचं गाठोडं व्यवस्थित बांधलं. अन् घेतलं खांद्यावर. सोबत, त्याची उद्याची मास्तरीण लेक. या निरागस वयातच समाजाविषयीचं खूप मोठं शिक्षण तिला प्राप्त झालं असावं! बापलेक थोडासा रस्ता चालून गेल्यावर त्यांच्याजवळ एक गाडी येऊन थांबली. गाडीतून युवक उतरला. त्याच्या हातात कॅमेरा होता. प्रेसवाला असावा. तो त्याच्याबरोबरच्या मुलीस म्हणाला,
‘रश्मी, काय गं कुठेय ब्रेकिंग निव्ज?’
‘अस्मित, कॅमेरा ऑन कर. समोरच्या गाठोड्यावाल्याला फ्रेममध्ये घे!’
‘त्याच्या गाठोड्याचं काय?’
‘वेड्या. आहेस कुठं! हीच तर ब्रेकिंग निव्ज आहे. ते नुसतं गाठोडं नाहीये. मगाशी सरांनी सांगितलं, या माणसाविषयी. ट्रॅफिक जॅममध्ये अडकले. तेव्हा सरांच्या हाती लागलाय हा मोलाचा ऐवज. आपल्या चॅनलचा टीआरपी बघ कसा, सरकन वर जाईन!’ रश्मीनं जास्त वेळ न दवडता रायबास गाठलं.
‘काका, थांबा जाऊ नका!’
‘बाई, मला पंचवीस किलोमीटर जायचंय. तेही पायी!’
‘काका, तुम्ही टीव्हीवर याल!’
‘त्यानं काय व्हईल?’
‘तुमची व्यथा साऱ्या जगासमोर येईल!’
‘जगासमोरूनच चाललोय म्या!’
तिने अस्मितला खुणवलं. त्यानं कॅमेऱ्याचा डोळा फिरवला. तिनं जवळच्या पर्समधून कंगवा काढून केस व्यवस्थित केले. बारका आरसा तोंडासमोर धरत. ओठांवर हलकीशी लिपस्टिक फिरवली. कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये अस्मितने तिला घेतलं, मी रश्मी झिंगाळकर. मी तुमच्यासमोर ठेवणार आहे माणसातली माणुसकी संपल्याची जितीजागती गोष्ट! माझ्याबरोबर आहेत. अडखळत थांबते. अन् रायबास म्हणते,
‘काका, नाव काय तुमचं?’
‘ये पोरी, काय नको माणुसकीची कथा मांडू. यक कर! तूच का देत न्हायीस, मला हजार रुपये. म्हण्जे माझ्या सगुणाचे धिंडवडे जरा तरी कमी व्हतील. माणुसकी परि माणुसकीबी ऱ्हावून जाईन!’


‘मी कसे द्यायचे?’
‘मग माझा टाइम का घेऊन ऱ्हायली!’
तो कॅमेऱ्याला पाठ दाखवत तडातडा पावलं उचलत निघाला. त्याच्या गावची स्मशानभूमी येईपर्यंत त्याला चालत राहायचं होतं.


‘दादा, तुला खूप लागलं का रे?’ रायबाच्या कपाळावरची जखम कुरवाळीत कृष्णा म्हणाली.
कपाळाला झालेली जखम काय आज न् उद्या भरणारच आहे; पण रायबाच्या काळजाला झालेली जखम कशी भरून येणार? कसं जग आहे? म्हणे जग श्रीमंत झालं! कसं श्रीमंत म्हणावं या जगाला? हे तर भिकाऱ्यापेक्षा निपतरी. भिकाऱ्याला आपली दया आली. तोच खरा श्रीमंत. त्याने वेळ सांभाळली. 


बापलेकाच्या पदयात्रेचं प्रक्षेपण पाहत होतं, उघडं जग. म्हणजे आजूबाजूची झाडे, आभाळ, डोंगर, नदीनाले. एवढं बरं की, या झाडा-झुडपांकडे कॅमेरा नव्हता; नाही तर त्यांनी रायबाची शोकयात्रा कॅमेऱ्यात शूट करून उघड्या आभाळाच्या स्क्रीनवर फुकटचं प्रक्षेपण साऱ्या जगाला दाखवत बसले असते. आभाळाच्या टीव्ही चॅनलचा टीआरपी कोण वाढला असता! 


रायबा नुसता चालतोच आहे. बरं तरी चालायला पैसे पडत नाही. नाही तर रायबासाठी किती मुश्किल झालं असतं. सगुणाचं ओझं त्याला जड वाटत नसलं, तरी त्यानं त्याच्या काळजावर भार दिला होता. तो भार फार जड होता. चालून चालून लहानगी कृष्णा थकली. 


‘दादा, आजूक किती चालायचं?’
‘आपल्या गावालोक..’
‘आपलं गाव कितीक लांबय आजूक?’
किती सांगायचं? रायबा विचारात पडला. अनंत मैलाचं अंतरय. ते लांब लांब आणखीनच लांब चाल्ललंय. हे लेकीला कसं सांगायचं?


...असे जोरात निघाले बापलेक की, त्यांनी त्यांचं गाव गाठलंच! थेट स्मशानभूमीतच त्यानं सगुणाचं गाठोडं उतरवून ठेवलं. त्याच्या जातीपातीचे चार भाऊबंद लोक धावत आले. रायबाच्या खांद्यावरचं ओझं उरतलं होतं, तरीही त्याचे खांदे जडच होते. गाठोडं झालेली सगुणा भुरूभुरू जळून गेली. तरीही त्याच्या खांद्यावर ओझं होतंच. त्या ओझ्याला सतीगती लावता येत नाही. ते भार वाढवणारच! आपल्याला वाटलं की, आपण ही कथा वाचून संपवली; पण नाही!
तुमचेही खांदे चाचपून पाहा, खूप भार आहेत. ते तुम्ही कुठे उतरवून ठेवाल? 

 

लेखकाचा संपर्क : oviaishpate@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...