आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांसाठी आली सुलभ गीता, कठीण श्लोक वाचण्यासाठी सोपे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरखपूर - श्रीमद्भगवद्गीतेतील कठीण श्लोक वाचणे सोपे व्हावे यासाठी सुलभ गीतेचे प्रकाशन होत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला गोरखपूरच्या गीता प्रेसने विशेषत्वाने मुलांसाठी अशी गीता तयार केली आहे. त्याअंतर्गत संस्कृतच्या मूळ श्लोकांतील दीर्घ शब्दांचे उच्चारण सोपे करण्यासाठी त्यांच्यात अंतर (- हे चिन्ह) ठेवले आहे. मूळ श्लोकांसोबतच लाल-काळ्या रंगात हे श्लोक प्रकाशित करण्यात आले आहेत.  


याबाबत गीता प्रेसचे निर्मिती व्यवस्थापक डॉ. लालमणी तिवारी यांनी सांगितले की, अजूनही आपल्या समाजातील बहुतांश लोक गीतेतील श्लोक योग्य उच्चारांसह वाचू शकत नाहीत. हे लक्षात घेऊन सुलभ गीता तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच जण विशेषत: मुले हे श्लोक सहजपणे वाचू शकतील. सुलभ गीतेशिवाय विविध संस्कार पद्धतीही प्रकाशित केल्या जात आहेत. मार्चअखेरीस विवाह संस्कार, उपनयन संस्कार पद्धतीचे प्रकाशन सुरू होईल.  


गीता प्रेस हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, नेपाळीसह १५ भाषांत १८०० प्रकारच्या पुस्तकांचे प्रकाशन करत आहे. स्थापनेपासून २०१८ पर्यंतच्या ९५ वर्षांत सव्वाचौदा कोटींपेक्षा जास्त गीता प्रतींचे आणि तीन कोटी ३५ लाखांपेक्षा जास्त रामचरित मानसच्या (रामायणासहित) प्रतींचे प्रकाशन गीता प्रेसने केले आहे.  


संस्कारांवरील पुस्तक प्रकाशनाबाबत तिवारींनी सांगितले की, १६ संस्कारांबाबत आपण जागरूक नाही. यज्ञोपवीत (उपनयन), विवाह आणि अंत्यसंस्कार हे तीन संस्कारच प्रामुख्याने उरले आहेत. जी संस्कृती विकसित होत आहे तीत मंत्रांपेक्षा जास्त यंत्रांचा वापर वाढला आहे. विवाहाचे संस्कार तर अर्ध्या-एक तासातच होत आहेत. संपूर्ण फोकस वरमाला आणि फोटो काढणे एवढ्यावरच आहे. संस्कारांची ही पुस्तके लोकांना त्यांचे महत्त्व आणि विधी यांची माहिती देतील. दोन वर्षांपूर्वी संस्कार प्रकाश पुस्तक प्रकाशित केले होते, त्यात सर्व संस्कारांबाबत संक्षिप्त माहिती होती; पण पूर्णपणे विधी नव्हते. गीता प्रेसने २०१८ मध्ये श्रीमद्भागवत महापुराण श्रीधरी टीका गुजरातीत आणि महाभारत तेलगूत प्रकाशित केले होते. आता २०१९ मध्ये मल्याळममध्ये भागवत महापुराण प्रकाशित होईल. 


आर्थिक अडचणीसारखी कुठलीही गोष्ट नाही. ती फक्त अफवा आहे. गेल्या चार वर्षांत २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची यंत्रे सुमारे दोन लाख चौरस फूट परिसरात लावली आहेत. 

बातम्या आणखी आहेत...