आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसातून फक्त दोन वेळा जेवा, तीन महिन्यांत वजन कमी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दिवसातून फक्त दोन वेळा जेवा अवघ्या तीन महिन्यांत वजन कमी होईल, पोटाचा घेर कमी होईल, डायबेटिस दूर होईल, अशी जाहीर हमी सुप्रसिद्ध डायट सल्लागार डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिली. आपल्या 'वेट लॉस प्लॅन'मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले आणि सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक लाइक्स मिळविणाऱ्या डॉ. दीक्षित यांनी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफले. त्यावेळी 'स्थूलत्व आणि मधुमेह मुक्ती' या विषयावर ते बोलत होते. 

 

कडक भूक लागेल तेव्हा खा, दिवसातून फक्त दोन वेळा जेवणाचा आनंद घ्या, अगदी पिझ्झासकट काहीही, कितीही खा, एक पदार्थ खा किंवा दहा पदार्थ खा काहीही फरक पडत नाही, मन मारू नका - हवे ते खा, दोन वेळच्या जेवणाचे स्वतःचे पॅटर्न ठरवा, फक्त ५५ मिनिटांच्या आत मात्र जेवण संपवा, जेवणात गोड कमी खा, साखर-गूळ-मध याचे व्यसन लावू नका, नारळ पाणी प्या पण नारळातली तसेच दुधावरची मलई खाऊ नका, भरपूर पाणी प्या, दुधाचा चहा प्यायचा असेल तर २५ टक्के दूध व ७५ टक्के पाणी टाकून प्या पण शक्यतो बिनसाखरेचा चहा घ्या, ग्रीन टी- ब्लॅक टी प्या, दोन वेळच्या जेवणाच्या मध्ये भूक लागली तर एखादा टोमॅटो खा, ४५ मिनिटे चाला, अशा अनेक मोलाच्या टिप्स डॉ. दीक्षित यांनी दिल्या. सवय नसल्याने सुरुवातीला याचा त्रास होईल पण आठवडाभर नियमितपणे दिवसभरात दोन वेळेच्या जेवणाचे पॅटर्न पाळले की याचीही सवय होईल आणि अवघ्या तीन महिन्यात वजन किमान ८ किलो कमी होईल, पोटाचा घेर किमान २ इंचाने कमी होईल, टाईप टू चा डायबेटिस दूर होईल, असे त्यांनी अगदी खात्रीपूर्वक सांगितलं. 

 

चुकीच्या आहारामुळे आता लहान मुलांना 'टाइप वन'चा डायबेटिस होतो तर ज्येष्ठांना 'टाइप टू'चा. भारतात २० टक्के लोकांना डायबेटिस आहे. बिनकामाचे इन्शुलिन्स निर्माण झाल्याने डायबेटिस होतो. इन्शुलिन्सची लेव्हल वाढली की शरीरातील पेशी विरोध करतात. यामुळे इन्शुलिन्सचे योग्य माप शरीरात निर्माण व्हायला हवे. माप रिकामे झाले की भरायला ५५ मिनिटे जातात. रक्तातले ग्लुकोज पेशीत पोहोचते, पेशी ग्लुकोज साठवतात आणि अनावश्यक चरबीच्या स्वरूपात निर्माण झालेल्या फॅटी सीडला रोखण्याचे काम करतात. वारंवार खात राहिलात तर इन्शुलिन्स लेव्हल वाढेल. यामुळे दोन वेळा जेवा आणि खाणे-पिणे ५५ मिनिटात आटोपा. ६ ते ८ तास झोप घेतल्यावर दिवसातून दोन वेळा जेवताना जेवणाआधी एक तास अगोदर पाणी प्या, जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्या, गरज वाटलीच तर जेवताना घोटघोट पाणी प्या, जेवल्यानंतर एक तास झोपू नये, दुपारी अर्ध्या तासापेक्षा जास्त झोपू नये, दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्या, दिवसातून सव्वा ते दीड लिटर लघवी होईल इतके पाणी प्या, असा सल्लाही डॉ. दीक्षित यांनी दिला. 

 

आपल्याकडे दोनवेळच्या जेवणाची प्रथा होती. आपणाकडे कधीही नाश्ता करण्याची पद्धत नव्हती. राम-कृष्ण नाश्ता करत असल्याचा उल्लेख पुराणात नाही. आपले पूर्वज नाश्ता करत असल्याचा कोणताही उल्लेख वेदात नाही की ग्रंथात नाही. नाश्ता हा प्रकार ब्रिटिशांनी आणला त्यांनी चहा आणला आणि फुकट वाटला. तेव्हापासून चहा-नाश्ता हा प्रकार सुरू झाला. दिवसातून दोन वेळा जेवा असा उल्लेख आयुर्वेदत आहे. दोन वेळा जेवा पुण्य मिळेल असे आयुर्वेदात म्हटले आहे. जैन धर्मात बेसना ही पद्धत आहे. म्हणजे दोन वेळा बसून जेवा. गौतम बुद्धांनी तर एकदाच जेवा, रात्री जेवू नका असे म्हटले आहे. ग्रीकमधील नागरिक सर्वात तंदुरुस्त समजले जात. कारण ते दोनदाच जेवत. आपल्याकडे संतांनी सांगितले आहे की एक वेळा जेवणारा योगी, दोन वेळा जेवणाच भोगी, तीन वेळा जेवणारा रोगी व चार वेळा जेवणारा महारोगी. आता यातून योग्य तो बोध घ्या, असे सांगून डॉ. दीक्षित म्हणाले की, अधिकचे खाण्याने जास्त लोक मरतात पण उपाशी राहिल्याने कोणी मरत नाही. आपण ६० दिवस उपाशी राहू शकतो. आपले पूर्वज शिकार मिळायची तेव्हाच खायचे नाहीतर उपाशी रहायचे. 

 

शालेय विद्यार्थ्यांसाठी आता विशेष अभियान 
शालेय विद्यार्थी जागृती अभियानाद्वारे आठवी, नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना, 'चार वेळा खा, गोड कमी खा, कोल्ड्रींग पिऊ नका, मोबाइलवर फुटबॉल न खेळता मैदानावर खेळा, असे सांगत आहोत तर डायबेटिस रिव्हर्स सेंटरद्वारे ठाण्यात दर गुरुवारी सकाळी ८ ते १२ या वेळेत सहयोग हॉल, घंटाळी येथे मोफत सल्ला केंद्र सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्यामुळे प्रेरणा मिळाली आणि जिचकार यांनी सुरू केलेला हा प्रयोग आपण पुढे नेत आहोत, अशी कृतज्ञता व्यक्त करून तुमचं आरोग्य तुमच्या हाती आहे. मानवतेच्या सेवेसाठी दिवसातून दोन वेळा जेवणाचा प्रयोग सुरू करा, असे आवाहन शेवटी डॉ. दीक्षित यांनी केले. 
 

बातम्या आणखी आहेत...