आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज एक अंडे खा, वजन कमी करा, प्रोटिन मिळवा! 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील कित्येक लोक सकाळच्या नाष्ट्याला अंडे खाणे पसंत करतात. कारण अंडे स्वादिष्ट आणि पौष्टिक असल्याने आपल्या शरीरासाठी लाभदायक असते. दररोज अंडे खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी कमी होण्यास मदत होते. मग अंड्याच्या आरोग्यदायी गुणधर्मांविषयी अधिक माहिती घेऊया. 


प्रोटिन्स मिळवण्यासाठी 
अंडे हा प्रोटिन्स मिळवण्याचा सर्वात स्वस्त पर्याय आहे. अंड्यामधून भरपूर प्रोटिन्सचा पुरवठा होत असल्याने स्नायू बळकट होतात व उतींचे कार्य सुधारून शरीर निरोगी राहण्यास मदत होते. अंड्यामुळे पुरुषांची ११%, तर स्त्रियांची १४% प्रोटिन्सची गरज भागते. एका अंड्यामधून ६ ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. 


अंड्यातील पिवळा बलक पोषक 
अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये झिंक, लोह, व्हिटॅमिन 'ए', 'बी' आणि 'डी', रायबोफ्लेविन, कॅल्शियम, फॉस्फरस, ल्युटेन आणि कोलाइन यांसारखे पोषक घटक असतात. त्यामुळे अंडे खाल्ल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. 


फॅट्स कमी असतात 
एका अंड्यामध्ये फक्त ५ ग्रॅम फॅट्स आणि जवळपास ८५ कॅलरी असतात, तर कार्बोहायड्रेट्स नसतात. अंड्यामधील अमिनो अॅसिडची रचना मानवी शरीरातील अमिनो अॅसिडप्रमाणे असते. तसेच जिमला जाणाऱ्यांसाठी अंडे अतिशय उपयुक्त आहे. कारण अंड्यामुळे शरीराची झीज लवकर भरून निघते आणि स्नायू बळकट होतात. 


अंड्यातील पांढरा भाग पौष्टिक 
तुम्हांला वजन किंवा कोलेस्टेरॉल वाढण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही केवळ अंड्याचा पांढरा भाग खा. जीलीन विद्यापीठातून पीएचडी झालेल्या झिपेंग यूच्या अभ्यासानुसार, अंड्याच्या पांढऱ्या भागात असणाऱ्या प्रोटिन्समुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. 


वजन घटण्यास मदत होते 
योग्य प्रकारे अंड खाल्ल्यास वजन घटण्यास मदत होते. मेटाबॉलिझममध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, नाष्ट्याला अंडे व अंड्याइतक्याच कॅलरी असणारा दुसरा पदार्थ खाल्ल्यास अंड्यामुळे बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते. यामुळे बीएमआय आणि कमरेचा घेर कमी होण्यास मदत होते. 


इतर फायदे 
अंडे खाल्याने रक्तदाब वाढण्यापूर्वीच नियंत्रणात राहतो, स्मरणशक्ती वाढते, मानसिक संतुलन टिकून राहते. तसेच हा 'व्हिटॅमिन डी'चा नैसर्गिक स्रोत आहे. अंड्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स हा गुणधर्म असल्याने हृदयविकार व कॅन्सरचा धोका टळण्यास मदत होते. शरीराच्या आरोग्याप्रमाणेच केसांच्या आरोग्यासाठीही अंडे लाभदायक आहे. 


अंडे खाण्याचे प्रमाण किती? 
अंड्यामध्ये कितीही आरोग्यदायी गुणधर्म असले तरी अनेक लोक त्यात कोलेस्टेरॉल असल्यामुळे अंडे खाणे टाळतात, परंतु असे करू नये. अमेरिकन हार्ट असोसिएशनने इ.स. २००० मध्ये ३०० मिलीग्रॅम/दिवस इतके कोलेस्टेरॉलचे प्रमाण निश्चित केले आहे. त्यामुळे पुरेशा व्यायामाबरोबर दररोज एक अंडे खाणे आरोग्यासाठी हिताचे आहे, परंतु तरीही तुम्हाला शंका वाटत असेल तर आठवड्यातून २ अंडी खावीत किंवा अंड्याचा केवळ पांढरा भाग खावा.