आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अमरावतीच्या वकिलाने केली कमाल, 15 हजार प्लास्टिकच्या बाटल्यांपासून साकारले 'इकॉनॉमिकल इको-फ्रेंडली होम'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमदास वाडकर । अमरावती प्लास्टिकच्या तब्बल पंधरा हजार बाटल्यांपासून 'इकॉनॉमिकल इको फ्रेंडली होम'ची निर्मिती करण्यात आली आहे. उन्हाळ्यात थंड, तर हिवाळ्यात गरम राहणारे पर्यावरणपूरक घर अमरावतीच्या अॅड. नितीन उजगावकर या वकिलाने साकारले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बाजूला असलेल्या राजुरा येथे ७०० चौरस फूट क्षेत्रात पर्यावरणपूरक घर बांधले आहे. पिण्याच्या पाण्याकरिता वापरली जाणारी प्लास्टिकची एक बाटली नष्ट होण्यास तब्बल ४५० वर्षे लागतात. पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक असलेल्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांपासून विटा-सिमेंटप्रमाणेच घराचे बांधकाम करण्यात आले आहे. नियोेजन करताना अॅड. नितीन उजगावकर यांनी प्रचलित पद्धतीने घराचे बांधकाम करण्याचे ठरवले होते. नियोेजन करताना किमान कंपाऊंड वॉल ही रिकाम्या बाटल्यांपासून बांधत नवीन प्रयोग करावे, असे त्यांना सुचले. त्यानुसार त्यांनी एक ते दीड वर्षांपासून रिकाम्या बाटल्या गोळा करण्यास सुरुवात केली होती. काही महिला कामगारांकडून बाटल्या जमा झाल्या की त्यात माती व दगड भरले जात होते.  कंपाऊंडची भिंत तयार करण्याचे काम अॅड. उजगावकर यांनी सुरू केले असताना २३ जानेवारी २०१९ रोेजी 'दिव्य मराठी'ने नायजेरिया येथे रिकाम्या बाटल्यांपासून घराची निर्मिती केल्या जाऊ शकते, असे वृत्त प्रकाशित केले. 'दिव्य मराठी'च्या या वृत्ताने प्रभावित होत अॅड. उजगावकर यांनी संपूर्ण घराची निर्मितीच रिकाम्या बाटल्यांपासून करणे शक्य असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, अशा प्रकारच्या घराचे निर्माण तंत्र बांधकाम कामगार तसेच त्यांनादेखील माहिती नव्हते. 'दिव्य मराठी'तील वृत्ताच्या आधारे त्यांनी इंटरनेटवर बाटल्यांपासून तयार होणाऱ्या घरांची माहिती गोळा केली. माती व दगड भरल्यानंतर भिंतीमध्ये बाटली किती बाहेर व किती आत ठेवावी, सिमेंट किती प्रमाणात टाकावे, भिंत तयार करताना बाटल्या नॉयलान दोरीने कशा बांधव्यात याची संपूर्ण माहिती इंटरनेटवरून घेतली. अशा प्रकारे प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये माती व दगड भरत त्यांना एकावर एक ठेवत नायलाॅन दोरीने बांधण्यात आले. त्यानंतर सिमेंटने जोडाई करत घर उभे केले.  प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांपासून त्यांनी सहा महिन्यांत अशा अनोख्या घराची निर्मिती केली. घराचे निर्माण कार्य गतीने व्हावे म्हणून त्यांच्या हाॅटेल व्यावसायिक मित्रांनीदेखील रिकाम्या बाटल्या देत मदत केली. पर्यावरणपूरक घराचे बांधकाम करताना प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये थंड राहणाऱ्या गढीच्या पांढऱ्या मातीचा वापर करण्यात आला. गढीच्या मातीमुळे घरातील तापमान नियंत्रित होण्यास मदत होते. तापमान नियंत्रित होेत असल्याने घर उन्हाळ्यात थंड, तर हिवाळ्यात गरम राहते. घराकरिता दगडाचा पाया रचण्यात आला आहे. इमारतीचे कॉर्नर व कॉलमची निर्मिती करण्यासाठी विटांचा वापर करण्यात आला आहे. 

हिवाळ्यात गरम राहते घर 
प्लास्टिकच्या बाटल्यांपासून घराची निर्मिती करण्याचे कोणतेही तंत्र येथील कामगारांना माहिती नव्हते. 'दिव्य मराठी'च्या वृत्ताच्या आधारे अॅड. उजगावकर यांनी इंटरनेेटवरून माहिती गोळा केली. आधी स्वत: प्रशिक्षीत होत त्यानंतर बांधकाम कामगारांना या बांधकामाचे तब्बल आठ ते दहा दिवस प्रशिक्षण त्यांनी दिले. खिडक्या-दरवाजांकरिता लाकूडफाटा वापरण्यात आला. त्यामुळे उन्हाळ्यात घर गरम न होता थंड, तर हिवाळ्यात गरम राहणार आहे. एकूण २५०० चौरस फूट असलेल्या प्लॉटमधील ७०० चौरस फूट क्षेत्रावर या पर्यावरणपूरक घराची निर्मिती करण्यात आली. बाटल्याची रिसायकलिंग करण्याची नवी पद्धत झाली आहे. 

'दिव्य मराठी' तून प्लास्टिकच्या बाटल्यांचे घर बांधण्याची प्रेरणा 
नायजेरियात तेथील युवक बाटल्यांपासून घराची कशा प्रकारे निर्मिती करत आहे, याबाबत २३ जानेवारी २०१९ रोजी alt147दिव्य मराठी'ने वृत्त प्रकाशित केले होते. 'दिव्य मराठी'त प्रकाशित या वृत्तापासून प्रेरणा घेत पर्यावरणपूरक घराचे निर्माण केल्याचे अॅड. नितीन उजगावकर यांनी सांगितले. 

खर्चात ३० टक्के बचत : 
प्रचलित घराचे ७०० चौरस फूट क्षेत्रफळात बांधण्याासाठी साधारणत: १० लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र, ७ लाख रुपयांत हे बांधकाम झाले. म्हणजे ३० % बचत झाली. 

0