आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीड एकरात सात पिकांचे उत्पादन घेत साधली आर्थिक समृद्धी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री तालुक्यात संजय पवार यांची ही निशिगंधाची फूलशेती. त्यांनी १० गुंठ्यात निशिगंधाची लागवड केली असून त्यातून प्रगती साधली आहे. - Divya Marathi
फुलंब्री तालुक्यात संजय पवार यांची ही निशिगंधाची फूलशेती. त्यांनी १० गुंठ्यात निशिगंधाची लागवड केली असून त्यातून प्रगती साधली आहे.

फुलंब्री तालुक्यातील संजय नामदेव पवार यांनी २०१७ मध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठाने प्रकाशित केलेला फुलशेती विषयावरील लेख वाचला आणि निशिगंधाच्या फुलशेतीला प्राधान्य दिले. विशेष म्हणजे उधारीवर बेणं आणून लागवड केली. आज ते यशस्वी फूलशेती करत आहेत. दीड एकरात सात पिकांचे उत्पादन घेत त्यांनी आर्थिक समृद्धी साधली असून, शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. 
 

औरंगाबाद - हवामान बदलामुळे पारंपरिक पीक पद्धती मारक ठरत आहे. यावर मात करायची असेल तर कमी पाण्यात व कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे व प्रतिकूल परिस्थितीत चांगले येणारे पीक शोधून त्याची लागवड करणे व विक्री व्यवस्थापनाद्वारे यशस्वी शेती करण्यावर शेतकऱ्यांनी भर देणे काळाची गरज बनली आहे. याबाबत कृषी विद्यापीठ शिक्षण विस्ताराचे कार्य करते. कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना माहिती देत असतात. अशाच प्रकारे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने फुलशेतीविषयी लेख प्रसिद्ध केला होता. त्याचे संजय यांनी वाचन केले व निशिगंध फूलशेती करण्याचा निश्चित केला. आर्थिक चणचण असल्याने  किनगावचा मित्र दत्ता तावडे यांची मदत घेतली. उधारीवर लागवडीसाठी बेणं आणले व बदनापूर कृषी संशोधन विभागाचे प्रमुख तथा कृषी शास्त्रज्ञ आचार्य डॉ. संजय पाटील, कृषी शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे व फूलशेती करणारे मित्र तावडे यांच्या सल्ल्याने २०१७ मध्ये २० गुंठ्यात निशिगंध फुलशेती करण्यास सुरुवात केली. स्वत: शेती पिकवणे व विक्रीचेदेखील त्यांनी नियोजन केले. त्यानुसार फूल परिपक्व झाले की ते औरंगाबादमध्ये स्वत: विकण्यास सुरुवात केली. यामुळे मधल्या दलालीला चाप बसला व उत्पन्नात वाढ करणेदेखील त्यांना शक्य झाल्याचे ते सांगतात. गत दोन वर्षांत त्यांना २ लाख ९० हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे. यंदा सुरुवातीला तीन महिने पाऊस अत्यल्प पडला. पाण्याच्या अडचणीमुळे दहा गुंठे क्षेत्र कमी करून केवळ १० गुंठे क्षेत्रातच लागवड केली होती. गणपती व दिवाळी उत्सवात एका फुलकाडीस ३ रुपये किंमत मिळाली. पूर्ण सीझनमध्ये ३० हजार रुपये महिना मिळाल्याचे संजयचे म्हणणे आहे.  

संजय यांच्याकडे केवळ दीड एकर शेती आहे. निशिगंध १० गुंठे, सहा गुंठ्यात शेवगा आंतरपीक म्हणून घेतले. ३० गुंठ्यात मका तर दहा गुंठ्यात यंदा बिजली फूलशेतीला प्राधान्य दिले आहे. उर्वरित क्षेत्रात कापूस, लसूण, घास असे विविध सात पिकांचे उत्पादन घेऊन शेती उद्योग यशस्वी करत आहेत. विशेषत: निशिगंध फूलशेतीमुळे त्यांना आर्थिक समृद्धीचा मार्ग गवसला व परिश्रमाच्या जोडीने ते साध्य करणे शक्य झाल्याचे ते अभिमानाने सांगतात. त्यांचा आदर्श काही शेतकरी घेत आहेत. 

बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन, काढणीपश्चात विक्री 

लागवडीपूर्व मशागत, एक ट्रॅक्टर सेंद्रीय खत, १९: १०: २६: २६  बेडवर टाकले आणि  गौचो कॅनोन बुरशीनाशक या द्रावणामध्ये कंद दहा मिनिटे बुडवून लागवड केली. पूर्ण उगवण झाल्यानंतर ड्रिप केले. बेडचे अंतर साडेचार फूट आहे. गणेशोत्सवात फूल उत्पादन चालू झालेे. सुरुवातीला तीनशे, चारशे स्टिक मिळाल्या. एका स्टिकला तीन रुपये दर मिळाला.  दिवाळीनंतर सातशे-आठशे स्टिक निघाल्या.  सध्या १ हजारापर्यंत स्टिक निघत आहेत. दर दोन दिवसाआड निशिगंधाची फुले काढणीस येतात.