आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Economical Downturn Due To Incorrect GST Imposed As Well As Notebandi Supriya Sule

पुत्रप्रेमापाेटी अर्ध्या वयाच्या लोकांपुढे झुकणाऱ्या वडिलांबद्दल वाईट वाटते; पक्ष सोडून जाणाऱ्यांचा खासदार सुप्रिया सुळेंंनी घेतला समाचार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव  - आमचा पक्ष साेडून जाणाऱ्यांविषयी मला मुळीच वाईट वाटत नाही. जाणाऱ्यांनी अजूनही खुशाल जावे; परंतु केवळ पुत्रप्रेमापाेटी उतारवयात वडील त्यांच्यासाेबत जाऊन अर्ध्या वयाच्या लोकांपुढे नतमस्तक हाेऊन नमस्कार करतात, त्यांच्याविषयी नक्कीच वाईट वाटते. या अर्थाने मुले असलेल्या वडिलांपेक्षा मुले नसलेले किंवा मुली असलेले वडील नशीबवान असल्याचे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मांडले. 

खासदार सुप्रिया सुळे बुधवारी जळगाव दाैऱ्यावर आल्या हाेत्या. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पक्षातील मेगा गळतीविषयी त्यांना विचारले असताना त्या म्हणाल्या की, मला जाणाऱ्यांचे मुळीच वाईट वाटत नाही. माझ्या वडिलांच्या वयाचे लाेक त्यांच्या पुत्रप्रेमापाेटी आज स्वाभिमान गमावून अपमानास्पद वागणुकीला सामाेरे जात आहेत. पवारसाहेबांसह ज्या राजकारण्यांना मुले नसून मुली आहेत हे त्याअर्थाने आज नशीबवान आहेत, किमान वडिलांच्या स्वाभिमानाचा तरी मुली विचार करीत असल्याचे खासदार सुळे म्हणाल्या. काँग्रेस सत्तेत असताना विरोधकांनी ५० वर्षे संघर्ष केलाच आहे. आपण केवळ ५ वर्षे विरोधात हाेताे. निवडणुका जिंकणे म्हणजेच यश असे नाही. तर लढत राहणे हा स्वभाव असला पाहिजे. ज्यांना हे पटते ते पक्षात आहेत, पक्ष साेडणाऱ्यांना तर आमच्या शुभेच्छा आहेत. पक्षात राहावं म्हणून आम्ही कुणालाही विनवण्या करणार नाही. जाणाऱ्यांसाठी रस्ते माेकळे आहेत, असेही त्यांनी सांगितले. 
 

जीएसटी चुकीच्या पद्धतीने लादल्याने तसेच नोटबंदीमुळे मंदी
पारोळा | “एक देश एक कर’ ही संकल्पना चांगली असली तरी टप्प्याटप्याने तिची अंमलबजावणी गरजेची होती. तसेच गरज नसताना नोटबंदी केल्याने देशात व राज्यात प्रचंड मंदी आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त करीत माेदी सरकारवर टीकास्त्र सोडले. संवाद दाैऱ्यासाठी त्या पाराेळा येथे आल्या होत्या. या वेळी त्यांनी पारोळा येथील चोरवड रस्त्यावर विजया लाॅन्सवर सुसंवाद यात्रेदरम्यान नागरिकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, “मेक इन इंडिया’ हा फेक कार्यक्रम असून या सरकारने माहितीच्या अधिकाराची धार बोथट केली आहे. राज ठाकरे यांचा एकही आमदार किंवा खासदार नाही, तरी ईडी प्रकरणात ते वाहिन्यांवर दिसत हाेते. तर आमच्या पक्षाचे नेते फुटत असताना आम्हाला तर सतत वाहिन्यांवर प्रसिद्धी दिली जात आहे. त्यामुळे आमच्या दोघांचा टीआरपी वाढला आहे. सत्ता कोणाचीही येवो, मंत्री आमचेच हाेतील. भाजप-सेनेत जे गेले ते कारखाने, ‌बँक प्रकरणे, चौकशीच्या भीतीपोटी गेले. आमच्यावर नाराज म्हणून गेले नाहीत. राज्यात सत्तेसाठी हव्यास सुरू आहे. आमच्या काळात आम्ही देशात प्रथम महिला आरक्षण, रोजगार हमी, माहिती अधिकार, डान्सबार बंदी असे अनेक चांगले निर्णय घेतले होते, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...