आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडी नोटीस प्रकरण : राज ठाकरेंच्या समर्थनार्थ सर्व विरोधक एकवटले, सत्ताधाऱ्यांनी केले हात वर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेना भवनासमोर माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशींनी कोहिनूर उभा करण्याचा संकल्प सोडला. परंतु त्यामागे लागलेले शुक्लकाष्ठ अजून संपलेले नाही. व्यवहाराची चौकशी करण्यासाठी  ईडीने कोहिनूरमधील माजी भागीदार व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनाही उन्मेष जोशी यांच्यासोबत नोटीस बजावली. या प्रकरणी भाजप सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप करत सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर, चूक नसेल तर घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नोटीसीबाबत काहीच माहित नसल्याचे म्हटले आहे. 

मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे म्हणाले, नरेंद्र मोदी व अमित शहा यांना लोकसभा निवडणुकीत टार्गेट केल्यानेच राज ठाकरेंवर कारवाई केली जात आहे. सरकार सूडाचे राजकारण करीत असून हा दबाव तंत्राचा भाग आहे. आम्ही अशा दबावतंत्राला भीक घालत नाही. राज यांच्यावर कारवाई झाल्यास आम्ही सरकारविरोधात रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, राज ठाकरेंच्या आवाहनानंतर मनसेचे २२ ऑगस्ट रोजीचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. 
 

सरकारविरोधात पवित्रा घेतल्यानेच कारवाई : विराेधक
राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरू केल्यानेच त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केला. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी राज यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष राज यांच्या पाठीशी आहेत, असे त्या म्हणाल्या. ईव्हीएमविरोधात सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केल्यामुळेच राज यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तर, राज सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवून ईव्हीएमविरोधात विरोधी पक्षांना एकत्रित करत आहेत. हुकूमशाहीविरोधात ते ठामपणे उभे राहत असल्यानेच नोटीस पाठवल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. 
 

विरोधकांचा आवाज बंद करण्याचे सरकारचे कारस्थान : अॅड. आंबेडकर
राज ठाकरेंना निवडणुकीपूर्वी ईडीची नोटीस येणे हेे विरोधकांचा आवाज बंद करण्याचे कारस्थान असून भाजप देशात सुडाच्या राजकारणाचा प्रघात पाडत आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.  राज यांनी ज्या पद्धतीने भाजपविरोधात लोकसभेला प्रचार केला होता, ते पाहता त्यांच्यावर ईडीची कारवाई होणे अटळ होते. भाजपविरोधी राजकीय नेत्यांना ईडीची नोटीस येणे हा शुद्ध ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. जे विकले जात नाहीत, जे दबले जात नाहीत, जे घाबरत नाहीत, त्यांनाच ईडीच्या नोटिसा पाठवण्यात येत आहेत, असा दावाही आंबेडकर यांनी  केला आहे. 
 

ईडीच्या नोटिशीत काही विशेष नाही, यावरून राजकारण नको : संजय राऊत
शिवेसना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मात्र ईडीच्या नोटिशीवरून राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया दिली. “ईडी, सीबीआय, आयकर विभाग या आपल्या देशातील स्वायत्त संस्था आहेत. त्या आपापल्या पद्धतीने काम करत असतात. त्यांना ते करू दिले पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे राजकारणाच्या दृष्टीने बघणे योग्य नाही. मला या नोटिशींमध्ये काही विशेष वाटत नाही,’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 
 

उन्मेष जोशींची झाली ७ तास चौकशी
उन्मेष जोशी यांची ईडीने सोमवारी सात तास चौकशी केली असून पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती उन्मेष जोशी यांनी दिली. उन्मेष जोशी दुपारी ईडीच्या कार्यालयात हजर झाले आणि सायंकाळी ७ वाजता ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले.
 

उद्योगात अशा गोष्टींना तोंड द्यावेच लागते : मनोहर जोशी
उद्योग-व्यवसायात उतरले की अशा प्रकारच्या गोष्टींना तोंड द्यावेच लागते. अचानक नोटीस येण्यामागे कदाचित काही काळेबेरे असूही शकते. अर्थात, पूर्ण माहिती मिळेपर्यंत त्याबद्दल काही सांगणे योग्य नाही. पूर्वी मी संस्था पाहत होतो तेव्हा असे काही झाले नव्हते. आता काही आहे का ते पाहावे लागेल, असे शिवसेना नेते  मनोहर जोशींनी म्हटले आहे. 
 

काय आहे प्रकरण? 
> राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर व मनोहर जोशींचे पुत्र उन्मेष यांनी कोहिनूर मिलची जागा विकत घेतली होती. यासाठी सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) २२५ कोटींची गुंतवणूक केली. 

> नंतर कंपनीच्या भागीदारांनी ९० कोटींना कंपनीचे समभाग विकले. त्यानंतरही कंपनीला अगाऊ कर्ज देण्यात आले. या कर्जाचा परतावा न आल्याने कोहिनूर सिटी एनएलने २०११ मध्ये काही मालमत्ता विकून ५०० कोटींचा परतावा करण्याच्या करारावर सही केली. त्यामुळे कोहिनूरला पुन्हा १३५ कोटींचे कर्ज दिले.

> २००८ मध्ये राज ठाकरेंनी कंपनीतील आपले शेअर्स विकून अंग काढून घेतले होते. मात्र, त्यानंतरही ते कंपनीत सक्रिय राहिल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणात अनियमितता झाल्याचे आढळून आल्याने ईडीने संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.